.

फंडांमेंटल ऍनालिसिस ची संपूर्ण माहिती मराठीत | Complete fundamental analysis information in Marathi

फंडांमेंटल ऍनालिसिस म्हणजे काय?

Fundamental Analysis


एखादी कंपनी कशी काम करते, त्या कंपनी ची आर्थिक स्थिती कशी आहे, ती कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत किती प्रगती करते, कंपनी वर काही कर्ज आहे का, कंपनी चे वार्षिक उत्पन्न कसे आहे, ते कमी होत आहे कि वाढत आहे, हे जाणून घेणे म्हणजेच फंडामेंटल अनालिसिस होय. थोडक्यात सांगायचे झाले तर कंपनी चे मागचे रेकॉर्ड पाहून कंपनीच्या भविष्यातील प्रगतीचा आढावा घेणे.


यासाठी आपण एक सोपे उदाहरण पाहूया. जर आपल्याला पाचवीमध्ये 60 टक्के मार्क पडले, सहावी मध्ये 70 टक्के मार्क पडले, सातवी मध्ये 80 टक्के मार्क पडले तर आठवीमध्ये आपल्याला 90 टक्के मार्क पडण्याची शक्यता जास्त असते. कारण मागच्या रेकॉर्ड प्रमाणे आपण प्रत्येक इयत्तेमध्ये दहा टक्क्यांची वाढ करत आलेला आहात. फंडांमेंटल ऍनालिसिस मध्ये सुद्धा याच प्रकारे मागच्या रेकॉर्डवरून भविष्यातील किमतींच्या हालचालींचा अंदाज बांधला जातो आणि बर्‍याच वेळा हा अंदाज अचूक ठरतो.

बरेच जण स्टॉक खरेदी करताना त्याची वास्तविक किंमत पाहत नाहीत आणि मार्केट मध्ये सध्या जो भाव चालू आहे त्या भावामधे तो खरेदी करतात. सामान्यपणे जर एखादा स्टॉक चर्चेत असेल तर लोक मिळेल त्या भावाला तो खरेदी करतात आणि त्या स्टॉक चा वास्तविक भाव आणि सध्याचा भाव या मध्ये तफावत वाढत जाते. फंडामेंटल ऍनालिसिस आपल्याला त्या स्टॉक ची खरी किंमत काढण्यास मदत करते आणि तो स्टॉक स्वस्त आहे कि महाग हे आपल्याला समजते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या वस्तूची किंमत १० रुपये आहे पण दुकानदार ती वस्तू १५ रुपयाना विकत आहे आणि तरीही लोक ती वस्तू घेत आहेत म्हणजेच लोकांना त्या वस्तूच्या मूळ किमतीचे ज्ञान नाही किंवा ते त्या कडे दुर्लक्ष करतात कारण जर साठा संपला तर ती वस्तू परत मिळणार नाही अशी भीती त्यांना असते. स्टॉक चे सुद्धा असेच आहे. बऱ्याच जणांना स्टॉक च्या मूळ किमतीचे ज्ञान नसते. फंडांमेंटल ऍनालिसिस द्वारे आपण स्टॉक ची मूळ किंमत काढू शकता आणि एखादा स्टॉक किती किमतीला खरेदी करायचा हे ठरवू शकता.

स्टॉक च्या वास्तविक किमतीला फेअर वॅल्यू असे म्हटले जाते तर सध्या भाव चालू आहे त्याला मार्केट प्राईस असे म्हटले जाते. जर कोणताही स्टॉक त्याच्या फेअर वॅल्यू च्या आसपास मिळाला तर तो अवश्य खरेदी करावा कारण सामान्यपणे स्टॉक ची मार्केट प्राईस हि स्टॉक च्या फेअर वॅल्यू पेक्षा जास्त असते.

प्रत्येक स्टॉक विषयी रोज काही ना काही बातम्या येत असतात आणि त्या नुसार तो स्टॉक कमी जास्त होत राहतो. बरेच जण मार्केट मध्ये फक्त ट्रेडिंग साठी येत नाहीत तर ते लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा करतात कारण त्यांना तो स्टॉक काही वर्षांसाठी होल्ड करायचा असतो. अशावेळी त्या स्टॉक ची भविष्यातील प्रगती समजण्यासाठी फंडांमेंटल ऍनालिसिस मदत करते.

कंपनी ला जर मागच्या काही वर्षांपासून सातत्याने नफा होत असेल तर कंपनी च्या स्टॉक ची किंमत वाढण्याची शक्यता सुद्धा वाढते आणि असे स्टॉक आपण खरेदी करून होल्ड करू शकता.

कंपनी च्या फंडामेंटल विषयी जाणून घ्याचे असेल तर आपण कंपनी चा वार्षिक फंडामेंटल रिपोर्ट वाचला पाहिजे. हा रिपोर्ट कंपनी च्या वेब साईट वर किंवा आपल्या ब्रोकर कडे आपल्याला मिळू शकतो. बऱ्याच तिऱ्हाईत स्क्रीनर वेब साईट वर सुद्धा हा फंडामेंटल रिपोर्ट आपण पाहू शकता.

हा रिपोर्ट साधारणतः ४ ते ५ पानांचा असतो पण आपण त्यातील फक्त काही महत्वाच्या गोष्टी पाहू शकता जसे कि, १. पुढील काही वर्षांचा वित्तीय आराखडा
२. मॅनेजमेंट डिस्कशन आणि डिसिजन
३. डायरेक्टर चा रिपोर्ट
४. प्रॉफिट ऍनालिसिस
५. कर्जाचा आराखडा
६. फ्युचर प्लांनिंग
सुरुवातीला हा रिपोर्ट समजण्यास कठीण जाऊ शकतो पण थोड्या सरावाने एकाच रिपोर्ट मध्ये कंपनी बद्दल बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेऊ शकता आणि त्याचा उपयोग चांगले स्टॉक निवडण्यासाठी करू शकता.

टेक्निकल ऍनालिसिस आणि फंडांमेंटल ऍनालिसिस मध्ये काय फरक आहे?

Difference between technical and fundamental analysis

फंडामेंटल अनालिसिस मध्ये कंपनी च्या आर्थिक बाबींचा विचार केला जातो जसे कंपनी चे मार्केट कॅपिटलाईझशन, वाढ, फायदा, कर्ज, प्रतिस्पर्ध्यांची गुणवत्ता, वेगवेगळे आर्थिक रिपोर्ट, नफा किंवा तोटा या मधील सातत्य या गोष्टींचा विचार केला जातो तर टेक्निकल अनालिसिस मध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, वोल्युम अनालिसिस, टाइम फ्रेम अनालिसिस, ऐतिहासिक चार्ट यांचा विचार केला जातो.

फंडांमेंटल ऍनालिसिस करून आपण एखाद्या स्टॉकची खरी किंमत काढू शकता तर टेक्निक चार्ट चा अभ्यास करून आपण एखाद्या स्टॉक च्या भविष्यातील किमतीचे अनुमान लाऊ शकता.

फंडांमेंटल ऍनालिसिस हे आर्थिक निकषांवर केले जाते जसे वित्तीय डेटा, सेक्टर चा डेटा, कंपनी ची प्रगती इत्यादी. तर टेक्निकल अनालिसिस कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, वोल्युम डेटा या वर केले जाते.

फंडांमेंटल ऍनालिसिस हे जास्त कालावधी साठी गुंतवणूक करायची असेल तर केले जाते पण टेक्निकल अनालिसिस हे कमी कालावधी साठी गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करायची असेल तर केले जाते.

फंडांमेंटल ऍनालिसिस हे लॉन्ग टर्म इन्वेस्टर्स साठी योग्य आहे तर टेक्निकल अनालिसिस हे शॉर्ट टर्म ट्रेडर्स साठी योग्य आहे.

फंडामेंटल अनालिसिस चे प्रकार कोणते?

Type of fundamental analysis

फंडामेंटल अनालिसिस चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

१. क्वालिटेटिव्ह अनालिसिस
२. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस

क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये तुलनात्मक गुणवत्तेवर भर दिला जातो म्हणजे प्रॉडक्ट ची गुणवत्ता, ब्रँड परफॉर्मन्स, मॅनॅजमेण्ट बोर्ड इत्यादी. उदाहरणार्थ, मारुती आणि महिंद्रा या दोन कंपन्यांची जर तुलना केली तर आपण म्हणतो मारुतीच्या गाड्या चांगल्या आहेत म्हणजेच आपण दोन्ही कंपन्यांच्या प्रॉडक्ट ची तुलना करून एक प्रकारे क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो.

म्युच्युअल फंड च्या अ आणि ब या दोन कंपन्यांची जर तुलना केली तर आपण म्हणतो अ कंपनी चा फंड मॅनेजर हा ब कंपनीच्या फंड मॅनेजर पेक्षा चांगला आहे म्हणजेच आपण गुणवत्तेविषयक तुलना करतो यालाच क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हटले जाते. फंडामेंटल अनालिसिस चा हा एका महत्वाचा पण काहीसा दुर्लक्षित प्रकार आहे कारण बरेच जण हे फक्त कंपनीच्या रिपोर्ट मधील आकड्यांना महत्व देतात पण एक चांगले अनालिसिस करण्यासाठी आपल्याला क्वालिटेटिव्ह अनालिसिस ची गरज भासते.

क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आकड्यांचे विश्लेषण केले जाते म्हणजेच, कंपनी चे मार्केट कॅप, प्रॉफिट रेशो, कर्जाची रक्कम, PE, EPS. या मध्ये कंपनी चा वार्षिक रिपोर्ट पाहून कंपनी पुढे कशी काम करेल याचा अंदाज बांधला जातो.

फंडामेंटल अनालिसिस करण्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत.
१. टॉप डाउन अनालिसिस
२. बॉटम टॉप अनालिसिस

पहिल्या प्रकारात कोणताही स्टॉक निवडण्यापूर्वी त्याच्या सेक्टर चे आणि कॅटेगरी चे विश्लेषण केले जाते तर दुसऱ्या प्रकारात आधी स्टॉक निवडला जातो आणि नंतर त्याच स्टॉक चे बारकाईने विश्लेषण करून तो पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट केला जातो.

EPS म्हणजे काय?

What is EPS

EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. कोणत्याही कंपनी कडे लाखो शेअर्स असतात. त्यापैकी प्रत्येक सिंगल शेअर वर कंपनी किती नफा कमावते याला EPS असे म्हटले जाते.

EPS मार्फत आपण कोणत्याही कंपनी चा बिझनेस कसा चालला आहे ते आपल्याला कळू शकते. ज्या वेळी कंपनी ला नफा होतो त्या वेळी कंपनी च्या एका शेअर वर सरासरी किती नफा झाला आहे ते EPS मुळे कळते.

EPS कसा कॅलक्युलेट केला जातो?
कोणत्या हि कंपनी चा EPS जाणून घेण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते.
१. कंपनी चा निव्वळ नफा
२. कंपनीच्या शेअर्स ची संख्या


या दोन गोष्टी आपल्या जवळ असतील तर खालील सूत्रानुसार कंपनी चा EPS काढला जातो.

या मध्ये कंपनी चा निव्वळ नफा हा त्रैमासिक किंवा वार्षिक असू शकतो.

आता EPS चे एक सोपे उदाहरण पाहूया.
असे मानूया कि ABC नावाच्या कंपनी चे मार्केट मध्ये १ लाख शेअर्स आहेत आणि एका वर्षात कंपनी ने ५० लाख रुपये कमावले तर कंपनी चा EPS असेल ५० रुपये. ( EPS = ५००००००/१००००० ) याचाच अर्थ कंपनीने एका शेअर वर ५० रुपये कमावलेले आहेत.

EPS चा वापर प्रामुख्याने कंपनी च्या कामगिरी ची तुलना प्रतिस्पर्धी कंपनी च्या कामगिरी बरोबर करण्यासाठी केला जातो. जर कंपनी चा EPS प्रतिस्पर्धी कंपनी च्या EPS पेक्षा जास्त असेल तर तर कंपनी ची कामगिरी चांगली आहे आणि जर EPS कमी असेल तर कंपनी ची कामगिरी प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत खराब आहे असा त्याचा अर्थ होतो.

तर थोडक्यात काय, जर आपलयाला एखाद्या सेक्टर मधील आघाडीच्या कंपनी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर EPS द्वारे आपण त्या सेक्टर मधील सर्व कंपन्यांची कामगिरी तपासू शकता आणि ज्या कंपनी चा EPS जास्त, त्या कंपनी मध्ये गुंतवणूक करू शकता.

PE रेशो म्हणजे काय?

What is PE ratio?
PE रेशो चा अर्थ होतो प्राईस टु अर्निंग रेशो.
PE रेशो म्हणजे आपण एखाद्या कंपनी च्या शेअर मधून एक रुपयाचा नफा मिळवण्यासाठी त्या कंपनी मध्ये किती रुपयांची गुंतवणूक करत आहात.
जर कंपनी चा PE रेशो १०० असेल तर आपण १ रुपया नफा मिळवण्यासाठी त्या कंपनी मध्ये १०० रुपयांची गुंतवणूक करत आहात असा त्याचा अर्थ होतो.

PE रेशो काढण्यासाठी आपल्याला कंपनी चा EPS (अर्निंग पर शेअर) रेशो माहित असायला हवा जो आधीच्या लेखात आपण पहिला आहे. कोणत्या हि कंपनी चा PE रेशो खालील सूत्राप्रमाणे काढता येतो.

EPS = कंपनी चा निव्वळ नफा / कंपनीकडे असलेल्या शेअर्स ची संख्या
वरील सूत्रानुसार आपल्याला EPS प्राप्त होतो त्यावरून खालील प्रमाणे PE काढला जातो.

P /E रेशो = कंपनी च्या एका शेअर ची सध्याची किंमत / EPS

हे आपण आता एका सोप्या उदाहरणाने पाहूया.

असे मानूया कि ABC कंपनी च्या शेअर ची सध्याची किंमत १०० रुपये आहे आणि कंपनी कडे सर्व मिळून एक लाख शेअर्स आहेत. वर्षाच्या शेवटी जर कंपनी ला चार लाख रुपयांचा नफा झाला तर,
कंपनी चा EPS = ४०००००/१००००० म्हणजेच ४ रुपये.
कंपनी चा P /E रेशो = १००/४ म्हणजेच २५ रुपये.
PE रेशो मुळे दोन एकसारख्या कंपन्यांपैकी कोणत्या कंपनी मध्ये गुंतवणूक करणे स्वस्त आहे याची माहिती मिळते.
पण प्रत्येक वेळी स्वस्त गुंतवणूक फायद्याची नसते कारण त्या गुंतवणुकीमधून किती नफा मिळतो हे सुद्धा महत्वाचे असते. PE रेशो मुळे आपल्याला योग्य गुंतवणुकीची संधी कोठे उपलब्ध आहे हे समजते.

याचे एक उदाहरण पाहूया.
आपल्याला एक दुकान खरेदी करायचे आहे. शहरांमधे त्या दुकानाची किंमत १ कोटी रुपये आहे तर उपनगरात तेवढ्याच आकाराच्या दुकानाची किंमत ८० लाख रुपये आहे. पण जर आपण दुकान भाड्याने द्यायचे ठरवले तर १ कोटी वाल्या दुकानाचे भाडे ५० हजार रुपये प्रति महिना मिळेल तर ८० लाख वाल्या दुकानाचे भाडे ३० हजार प्रति महिना मिळेल म्हणजेच जर आपण १ कोटी रुपये गुंतवले तर आपल्याला त्याचा परतावा जास्त मिळेल. या प्रकारे PE रेशो मुळे फक्त स्वस्तच नाही तर योग्य स्टॉक शोधण्यास सुद्धा मदत होते.

थोडक्यात काय तर, जर एखाद्या कंपनी चा PE रेशो ५० असेल तर त्या स्टॉक मधून एक रुपया कमावण्यासाठी आपल्याला ५० रुपये गुंतवावे लागतील त्याच प्रमाणे जर एखाद्या कंपनी चा PE रेशो १०० असेल तर त्या स्टॉक मधून एक रुपया कमावण्यासाठी आपल्याला १०० रुपये द्यावे लागतील.

PE रेशो चा वापर करून कोणत्या कंपनी मधील गुंतवणुकीपासून आपल्याला जास्त परतावा मिळेल याचा अंदाज लावला जातो.

PE रेशो पाहून कंपन्यांची तुलना करताना त्या कंपन्या एकाच सेक्टर मधील असतील याचे भान ठेवणे गरजेचे आहे. जर आपलयाला ऑटोमोबाईल सेक्टर मधील एखादा स्टॉक घ्यायचा असेल तर त्याच सेक्टर मधील दुसऱ्या कंपन्यांचा PE रेशो पहिला पाहिजे.
विरुद्ध सेक्टर मधील PE रेशो कधीही पाहू नये कारण वेगवेगळ्या सेक्टर मधील कंपन्यांचा PE रेशो हा वेग वेगळ्या रेंज मध्ये असतो. जसे कि FMCG सेक्टर मधील कंपन्यांचा PE रेशो बाकी इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक असतो म्हणून विरुद्ध सेक्टर तुलना कधीही करू नये.
काही कंपन्यांच्या शेअर ची किंम्मत हि स्वस्त असते म्हणजेच त्यांचा PE रेशो कमी असतो पण त्यांची प्रगती सुद्धा संथ याला "लो PE लो ग्रोथ" कंपनी असे म्हटले जाते. अशा कंपन्यांमधील गुंतवणुकीचा योग्य परतावा आपल्याला मिळतात नाही. या उलट काही कंपन्यांच्या शेअर ची किंमत हि महाग असते म्हणजेच त्याचा PE रेशो जास्त असतो. पण हे शेअर वाढताना सुद्धा खूप तेजीने वाढतात अशा कंपन्यांना "हाय PE हाय ग्रोथ" कंपनी असे म्हटले जाते. अशा कंपन्यांमधील गुंतवणुकीचा परतावा सुद्धा चांगला मिळतो.

याचेच एक सोपे उदाहरण पाहूया.

समजा आपल्या कडे ABC आणि XYZ नावाच्या दोन कंपन्या आहेत.

ABC कंपनी चा पहिल्या वर्षीचा EPS २० रुपये आहे आणि त्याची शेअर प्राईस २०० रुपये आहे त्या नुसार त्याचा PE येतो १० रुपये.
ABC कंपनी चा दुसऱ्या वर्षीचा EPS २१ रुपये आहे आणि त्याची शेअर प्राईस २१० रुपये आहे त्या नुसार त्याचा PE येतो १० रुपये.
ABC कंपनी चा तिसऱ्या वर्षीचा EPS २२ रुपये आहे आणि त्याची शेअर प्राईस २२० रुपये आहे त्या नुसार त्याचा PE येतो १० रुपये.
ABC कंपनीच्या EPS मध्ये दर वर्षी फक्त ५ टक्य्यांची वृद्धी होत आहे जी खूपच कमी आहे. या कंपनी चा PE रेशो सुद्धा १० म्हणजेच कमी आहे. अश्या कंपन्यांना "लो PE लो ग्रोथ" कंपनी म्हटले जाते. अशा कंपनीचे शेअर हे जरी स्वस्त मिळत असले तरी ते जास्त वाढत सुद्धा नाहीत म्हणूनच त्यांचा PE रेशो सुद्धा कमी असतो. अशा कंपन्यांमधील गुंतवणूक आपल्या हिताची नसते.

या उलट,
XYZ कंपनी चा पहिल्या वर्षीचा EPS २० रुपये आहे आणि त्याची शेअर प्राईस ३०० रुपये आहे त्या नुसार त्याचा PE येतो १५ रुपये.
XYZ कंपनी चा दुसऱ्या वर्षीचा EPS ४० रुपये आहे आणि त्याची शेअर प्राईस १००० रुपये आहे त्या नुसार त्याचा PE येतो २५ रुपये.
XYZ कंपनी चा तिसऱ्या वर्षीचा EPS ८० रुपये आहे आणि त्याची शेअर प्राईस ३२०० रुपये आहे त्या नुसार त्याचा PE येतो ४० रुपये.
XYZ कंपनी च्या EPS मध्ये दर वर्षी १०० टक्क्यांची वृद्धी होत आहे जी खूपच जास्त आहे त्याच प्रमाणे कंपनी चा PE रेशो ४० आहे जो सुद्धा खूपच जास्त मानला जातो. त्यामुळे XYZ कंपनी हि एक "हाय PE हाय ग्रोथ" कंपनी आहे. अश्या कंपन्यांचे शेअर खूपच वेगाने वाढतात म्हणून आपल्याला अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

जर हाय ग्रोथ कंपन्यांचा PE रेशो काही कारणास्तव कमी झाला तर अशा स्टॉक ला वॅल्यू स्टॉक असे म्हटले जाते आणि गुंतवणुकीसाठी हि योग्य संधी असते. बरेच मोठे मोठे इन्वेस्टर्स, म्युच्युअल फ़ंड, फंड हाऊसेस अशा संधीची वाट पाहत असतात आणि त्यामध्ये गुंतवणूक करतात ज्याचा त्यांना चांगला परतावा मिळतो.

जर लो ग्रोथ कंपन्यांचा PE रेशो काही कारणास्तव वाढला तर त्याला ओव्हर वॅल्यूड स्टॉक असे म्हटले जाते म्हणजेच तो स्टॉक त्याच्या पात्रतेपेक्षा महाग होतो आणि त्या मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे नसते.

जर दोन्ही कंपनी एकाच सेक्टर च्या असतील आणि त्यांची ग्रोथ पण सारखीच असेल तर सामान्यपणे ज्या कंपनी चा PE कमी त्या कंपनी मध्ये गुंतवणूक केली जाते.

PE रेशो चा वापर आणखी एका प्रकारे केला जातो. सध्याच्या PE रेशो बरोबर त्याच्या ऐतिहासिक PE रेशो च्या सरासरी ची तुलना करून तो स्टॉक स्वस्त आहे हि महाग हे ठरवले जाते.

उदाहरणच द्यायचे झाले तर, ABC कंपनी चा सध्याचा PE रेशो १० आहे पण त्याच्या मागच्या १० वर्षांच्या PE रेशो ची सरासरी काढली तर ती २५ येते. जर ABC कंपनी पहिल्या सारखीच प्रगती करत असेल पण तरीही त्याचा PE रेशो १० असेल तर हि एक खूप चांगली गुंतवणूक मानली जाते.
पण जर ABC कंपनी चा सध्याचा PE रेशो ३५ असेल आणि मागील १० वर्षांची PE रेशो ची सरासरी २५ असेल आणि कंपनी ची प्रगती सारख्याच गतीने चालू असेल तर हा स्टॉक खूप महाग आहे असा त्याचा अर्थ होतो.
कोणत्याही कंपनी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनी च्या PE रेशो बरोबरच त्या कंपनी चा मागच्या काही वर्षांचा EPS सुद्धा बघितला पाहिजे. तसेच ऐतिहासिक PE रेशो सुद्धा पहिले पाहिजेत. या सर्व गोष्टींची योग्य सांगड घातलीत तर एक चांगला स्टॉक निवडण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल.

मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय?

Market capitalization
कोणत्याही कंपनी च्या एकत्रित किमतीला मार्केट कॅपिटलायझेशन असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी ची मार्केट कॅपिटलायझेशन ५.५८ लाख करोड रुपये आहे म्हणजेच हिंदुस्थान युनिलिव्हर मार्फत जेवढा पण व्यापार केला जातो त्याची किंमत ५.५८ लाख करोड रुपये आहे.
मार्केट कॅपिटलायझेशन वरून कंपनी च्या विस्ताराचा अंदाज येतो. जेवढे मार्केट कॅपिटलायझेशन जास्त तेवढी ती कंपनी मोठी असे साधे गणित आहे.

पण मार्केट कॅपिटलायझेशन चा आणि शेअर च्या किमतीचा काहीही संबंध नाही. बऱ्याच जणांना वाटते कि ज्या कंपनी चे मार्केट कॅपिटलायझेशन जास्त आहे त्या कंपनी च्या शेअर ची किंमत पण जास्त असते पण हा गैरसमज आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर, (हा लेख लिहिते वेळी) NTPC नावाच्या कंपनी चे मार्केट कॅपिटलायझेशन आहे १. १५ लाख करोड रुपये आणि शेअर ची किंम्मत आहे ११८ रुपये तर पेज इंडस्ट्रीज नावाच्या शेअर चे मार्केट कॅपिटलायझेशन आहे फक्त ३६००० करोड रुपये पण शेअर ची किंमत आहे ३२४०० रुपये म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशनचा आणि शेअर च्या किमतीचा काही संबंध नसतो.

कोणत्याही कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन काढण्यासाठी त्या कंपनी चे सध्या मार्केट मध्ये असणारे सर्व शेअर्स ( खरेदी विक्री साठी उपलब्ध असणारे + प्रोमोटर्स आणि इन्वेस्टर्स कडे असणारे) आणि शेअर ची मार्केट मध्ये असणारी किंमत यांचा गुणाकार केला जातो.

मार्केट कॅपिटलायझेशन = कंपनी कडे असणारे सर्व शेअर X शेअर ची सध्याची किंमत

म्हणजेच जर एखाद्या कंपनी च्या सर्व शेअर ची संख्या ५० करोड आहे आणि प्रत्येक शेअर ची किंमत २०० रुपये आहे तर कंपनी चे मार्केट कॅपिटलायझेशन आहे १०००० करोड (५० X २००)
मार्केट कॅपिटलायझेशन हे कधी कायमस्वरूपी नसते. शेअर च्या किमतीमध्ये चढ उतार झाला कि त्याची किंमत बदलते.
मार्केट कॅपिटलायझेशन नुसार कंपन्यांची तीन प्रकारात विभागणी केली जाते.

१. लार्ज कॅप
२. मिड कॅप
३. स्मॉल कॅप

१. लार्ज कॅप - ज्या कंपनी चे मार्केट कॅपिटलायझेशन हे १०००० करोड पेक्षा जास्त असते त्यांचा समावेश लार्जकॅप मध्ये केला जातो. स्टॉक एक्सचेंज वरील आघीडीच्या १०० कंपन्या या लार्ज कॅप कंपन्या आहेत. हे शेअर इतर शेअर च्या तुलनेत कमी व्होलाटाइल असतात. हे शेअर कमी जोखमीचे मानले जातात. त्यांची किंमत कधीच एकदम कमी किंवा एकदम जास्त होत नाही. लार्ज कॅप कंपन्या आपापल्या क्षेत्रातील आघीडीच्या कंपन्या असतातच पण त्या मार्केट मध्ये लीडर ची सुद्धा भूमिका बजावतात. लार्ज कॅप कंपन्या सहसा फेल होत नाहीत पण जर झाल्या तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. या कंपन्या जरी गुंतवणुकीसाठी सुरक्षित असल्यातरी त्यांच्याकडून फारसा चांगला परतावा मिळण्याची शक्यता तुलनेने कमी असते.

२. मिड कॅप - ज्या कंपनी चे मार्केट कॅपिटलायझेशन हे २००० करोड ते १०००० करोड यांच्या मध्ये असते त्या कंपन्यांना मिड कॅप शेअर असे म्हटले जाते. स्टॉक एक्सचेंज वरील १०१ व्या क्रमांकाच्या कंपनी पासून ५०० व्या क्रमांकांच्या कंपन्या या मिड कॅप कंपन्या असतात. या कंपन्यांमधील गुंतवणूक हि तुलनेने जास्त जोखमीची असते पण त्या पासून मिळणार परतावा सुद्धा चांगला असतो. यातील बऱ्याच कंपन्या पुढे जाऊन लार्जकॅप कंपन्या बनतात.

३. स्मॉल कॅप - ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन २००० करोड पेक्षा कमी असते त्यांना स्मॉल कॅप कंपन्या असे म्हणतात. या कंपन्या मिडकॅप पेक्षा जास्त जोखमीच्या असतात पण त्यांचे रिटर्न्स सुद्धा मिडकॅप पेक्षा खूपच जास्त असतात. स्मॉल कॅप मध्ये जास्त कालावधीसाठी गुंतवणूक फायद्याची ठरते. पण गुंतवणुकीसाठी स्मॉल कॅप कंपन्या निवडताना जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. शक्यतो कर्जमुक्त किंवा कमी कर्ज असणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य द्यावे.

फेस वॅल्यू म्हणजे काय?


कोणत्याही शेअर च्या मूळ सर्टिफिकेट वर जी शेअर ची किंमत असते तिला फेस वॅल्यू असे म्हटले जाते.

जर एखाद्या कंपनी चे भांडवल २ करोड रुपये असेल आणि त्या कंपनी ने १० रुपये एक शेअर या प्रमाणे २० लाख शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले तर त्या शेअर ची फेस वॅल्यू होते १० रुपये. फेस वॅल्यू ला पार वॅल्यू सुद्धा म्हटले जाते.

समजा ABC कंपनीच्या एका शेअरची किंमत सुरुवातीला दहा रुपये होती पण नंतर मागणी वाढल्यामुळे ती १५ रुपये झाली तर या किमतीला अबव्ह पार किंवा प्रीमियम वॅल्यू असे म्हटले जाते. या उलट, जर शेअर ची किंमत कमी होऊन ८ रुपये झाली तर या किमतीला डिस्काउंट वॅल्यू किंवा बिलो पार असे म्हटले जाते.

आणि जर शेअर ची किंमत १० रुपयेच असेल तर त्याला ऍट पार असे म्हटले जाते.

कोणताही स्टॉक खरेदी करण्यापूर्वी त्या स्टॉक ची फेस वॅल्यू जरूर पाहावी. फेस वॅल्यू मुळे स्टॉक च्या वास्तविक किमतीचा अंदाज येतो. जर एखाद्या स्टॉक ची फेस वॅल्यू दहा रुपये असेल आणि त्या स्टॉक ची किंमत २० रुपये असेल तर तो स्टॉक फेस वॅल्यू पेक्षा डबल भावाला विकला जातोय. जर तो स्टॉक आपल्याला १० रुपयांच्या आस पास मिळाला तर आपण तो घेऊ शकता पण चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक ची किंमत हि त्यांच्या फेस वॅल्यू पेक्षा कितीतरी जास्त असते आणि ती परत फेस वॅल्यू जवळ मिळण्याची शक्यता कमी असते.

कंपनी ने जर मनात आणले ती आपल्या शेअर ची फेस वॅल्यू बदलू शकते. त्या साठी कंपनी ला शेअर ची वॅल्यू स्प्लिट करावी लागते.

समजा आपल्या कडे एखाद्या कंपनी चे १०० शेअर आहेत ज्याची फेस वॅल्यू १० रुपये आहे आणि सध्याची मार्केट मधील किंमत ५० रुपये आहे. अशावेळी कंपनी आपल्या शेअर शेअर ची फेस वॅल्यू कमी करून ती ५ रुपये करू शकते. त्या मुळे आपल्या शेअर चा बाजारभाव कमी होऊन तो २५ रुपये प्रति शेअर होण्याची शक्यता आहे .

ज्या वेळी एखाद्या शेअर ची किंमत खूपच वाढते त्या वेळी तो शेअर सामान्य गुंतवणूकदारांना परवडत नाही अशा वेळी कंपनी त्याची वॅल्यू स्प्लिट करून ती कमी करू शकते म्हणजेच सामान्य गुंतवणूकदार सुद्धा तो शेअर खरेदी करू शकेल.

बुक वॅल्यू म्हणजे काय?


एखाद्या कंपनीच्या स्टॉक ची वास्तविक किंमत जाणण्याचे बरेच मार्ग आहेत. त्यापैकी एक महत्वाचा मार्ग म्हणजे बुक वॅल्यू.

जर कंपनी च्या फिजीकल ऍसेट म्हणजे जमीन, बिल्डिंग, मशीन, कॉम्पुटर यांच्यामधून जर कंपनी चे जेवढे देणे (कर्ज) आहे ते वजा केले आणि येणाऱ्या संख्येला जर कंपनी च्या एकून शेअर्स च्या संख्येने भागले तर बुक वॅल्यू प्राप्त होते. हि त्या कंपनी ची खरी वास्तविक किंमत असते.

बुक वॅल्यू = फिजिकल ऍसेट - कर्ज /कंपनीचे एकूण शेअर्स

जर एखाद्या कंपनी चे सर्व फिजिकल ऍसेट विकून त्यातून जर कर्जाची रक्कम वजा केली तर उरणारी रक्कम हि कंपनी ची बुक वॅल्यू असते.

बुक वॅल्यू काय असते हे आता एका उदाहरणाबरोबर समजूया. समजा एखाद्या कंपनी कडे १ करोड शेअर्स आहेत आणि प्रति शेअर ची किंमत १० रुपये आहे. म्हणजेच कंपनी ची सुरुवात १० करोड रुपयांपासून झाली आहे. जर एका वर्षात कंपनी ला २ करोड रुपयांचा फायदा झाला तर कंपनी ची किंमत १२ करोड होईल. जर कंपनी वर कर्ज नसेल तर या १२ करोड रुपयांना कंपनी च्या एकूण शेअर्स च्या संख्येने भागले तर १२ रुपये किंमत येते आणि हीच कंपनी ची बुक वॅल्यू असते.

सामान्यतः कोणत्याही शेअर ची किंमत हि त्याच्या बुक वॅल्यू पेक्षा जास्त असते. कारण भविष्यात चांगला परतावा मिळण्यासाठी गुंतवणूकदार वरचं स्तराला शेअर खरेदी करतात आणि कि किंमत वाढते.

जर एखाद्या कंपनी ची बुक वॅल्यू त्याच्या फेस वॅल्यू पेक्षा खूप जास्त असेल तर कंपनी बोनस शेअर देण्याची शक्यता असते. बोनस शेअर साठी आणखी हि काही घटकांचा विचार केला जातो पण त्यासाठी बुक वॅल्यू जास्त असणे बंधनकारक आहे.

कोणत्याही शेअरचा सध्याचा बाजारभाव आणि बुक वॅल्यू यांच्यातील रेशो ला BVPS रेशो म्हटले जाते म्हणजेच (बुक वॅल्यू पर शेअर). या मुळे गुंतवणूकदारांना भविष्यात शेअर वाढणार कि कमी होणार याचा अंदाज येतो. जर एखाद्या शेअर ची बुक वॅल्यू १२ रुपये असेल आणि त्याची मार्केट मधील सध्याची किंमत २४ रुपये असेल तर त्याचा BVPS रेशो २ येतो (२४/१२=२).

बॅलन्सशीट म्हणजे काय?


बॅलन्सशीट हि एक फायनान्सियल टर्म असून प्रत्येक कंपनी वित्तीय वर्षाच्या शेवटी बॅलन्सशीट बनवते आणि तिचा समावेश आपल्या वार्षिक रिपोर्ट मध्ये करते. बॅलन्सशीट मुळे आपल्याला कंपनी च्या खालील गोष्टींबद्दल माहिती मिळते.

१. ऍसेट्स - कंपनी कडे असणारी स्वतःची संपत्ती
२. लायेबिलिटीस - कंपनीने कर्जाऊ घेतलेली रक्कम
३. शरहोल्डर्स इक्विटी - गुंतवणूकदारांचे किती पैसे कंपनी मध्ये आहेत.

चला पाहूया याला बॅलन्सशीट का म्हटले जाते.
बॅलन्सशीटची साधारणतः दोन भागात विभागणी केली जाते. एका भागात ऍसेट दाखवले जातात तर दुसऱ्या भागात कर्ज आणि गुंतवणूक दाखवली जाते. या दोन्ही भागांची वॅल्यू हि कायम सामान असते म्हणून याला बॅलन्सशीट असे म्हटले जाते. जर याला एका सूत्रात बसवायचे म्हटले तर ते खालील प्रमाणे बसवता येते ज्याला बॅलन्स शीट इक्वेशन असे म्हटले जाते.

ऍसेट = इक्विटी + लायेबिलिटीस

बॅलन्स शीट बनवण्याच्या दोन पद्धती आहेत.
१. हॉरीझॉन्टल बॅलन्स शीट
२. व्हर्टिकल बॅलन्स शीट

हॉरीझॉन्टल बॅलन्स शीट हि दोन भागात विभागलेली असते. ज्या मध्ये डाव्या भागात ऍसेट दाखवले जातात आणि उजव्या भागात इक्विटी + लायेबिलिटीस दाखवले जातात.

व्हर्टिकल बॅलन्स शीट सुद्धा दोन भागात विभागलेली असते या मध्ये वरच्या भागामध्ये ऍसेट दाखवले जातात आणि खालच्या भागात इक्विटी + लायेबिलिटीस दाखवले जातात. बऱ्याच वेळा बॅलन्स शीट हि व्हर्टिकलच बनवली जाते.

ऍसेट या विभागाचे पुन्हा दोन भागात विभाजन केले जाते.
१. करंट ऍसेट
२. लॉंग टर्म ऍसेट
करंट ऍसेट मध्ये अशा गोष्टी येतात ज्यांना कंपनी येणाऱ्या एका वर्षात कॅश मध्ये बदलू शकते. या मध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेंटरी, येणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

लॉन्ग टर्म ऍसेट मध्ये अशा गोष्टी येतात ज्यांना कंपनी एक वर्षापेक्षा जास्त काळ स्वतः जवळ ठेवते. या मध्ये जमीन, बिल्डिंग, मशीनरी, फॅक्टरी, लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

इक्विटी + लायेबिलिटीस विभागात कंपनी सर्वात आधी लायेबिलिटीस ला दर्शवते आणि नंतर इक्विटी ला.

ऍसेट प्रमाणेच लायेबिलिटीस ची सुद्धा दोन भागात विभागणी केली जाते.
१. करंट लायेबिलिटीस
२. लॉन्ग टर्म लायेबिलिटीस
करंट लायेबिलिटीस मध्ये अशा सर्व लायेबिलिटीस येतात ज्यांची कंपनी ला एका वर्षात परतफेड करायची असते जसे कमी कालावधी साठी घेतलेले कर्ज, आणि काही प्रकारची देणी इत्यादी.

लॉन्ग टर्म लायेबिलिटीस मध्ये अशा सर्व लायेबिलिटीस येतात ज्यांची कंपनी ला एका वर्षानंतर परतफेड करायची असते जसे जास्त अवधी साठी घेतलेले कर्ज.

या दोन्ही लायेबिलिटीस एकत्र करून लायेबिलिटीस विभागात दाखवल्या जातात.

दुसऱ्या बाजूला इक्विटी विभागात इक्विटी शेअर कॅपिटल, इतर इक्विटी आणि जतन केलेले अर्निंग यांचा समावेश होतो.

अशा प्रकारे एकूण इक्विटी + लायेबिलिटीस आणि ऍसेट याना बॅलन्स मध्ये ठेवण्याचं आणि दाखवण्याचं काम बॅलन्स शीट मध्ये केले जाते.डिव्हिडंड म्हणजे काय?


शेअर मार्केट मध्ये प्रॉफिट दोन प्रकारे मिळवता येते.

१. कमी भावात घेतलेले शेअर्स जास्त भावात विकून
२. डिव्हिडंड मधून

जेंव्हा कोणत्याही कंपनी ला नफा होतो त्यावेळी त्या वेळी काही कंपन्या सर्व च्या सर्व नफा पुन्हा बिझनेस मध्ये गुंतवतात तर काही कंपन्या यातील काही रक्कम आपल्या गुंतवणूकदारांमध्ये वाटण्याचे ठरवतात यालाच डिव्हिडंड असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनी ला १०० करोड रुपयांचा फायदा झाला आणि कंपनी ने प्रति शेअर ५ रुपये डिव्हिडंड देण्याचे ठरवले. जर आपल्या अकाउंट मध्ये संबंधित कंपनी चे १००० शेअर असतील तर आपल्याला ५ हजार रुपयांचा डिव्हिडंड मिळतो.

चला जाणून घेऊया कोण कोणत्या कंपन्या डिव्हिडंड देतात.
ज्या कंपन्या प्रॉफिट मध्ये असतात त्याच डिव्हिडंड देऊ शकतात. लॉस मध्ये असणारी कंपनी कधीच डिव्हिडंड देत नाही.
ज्या मोठ्या कंपन्या मार्केट मध्ये बऱ्याच अवधी पासून आहेत आणि कायम प्रॉफिट करत आलेल्या आहेत अशा कंपन्याच शक्यतो डिव्हिडंड देतात.
जर कंपनी नवीन असेल तर ती आपले सर्व प्रॉफिट बिझनेस वाढवण्यासाठी वापरते त्या मुळे ती डिव्हिडंड देण्यास असमर्थ ठरते.

डिव्हिडंड द्यायचा किंवा नाही हे त्या कंपनीच्या मॅनॅजमेन्ट वर अवलंबून असते. जर कंपनी ला बिझनेस वाढवायचा असेल तर डिव्हिडंड दिला जात नाही पण जर बिझनेस स्थिर असेल तर डिव्हिडंड दिला जातो.

डिव्हिडंड आपण कसा मिळवू शकता? जर आपल्याला डिव्हिडंड मिळवायचा असेल तर आपल्याला अशा कंपनीचेच शेअर खरेदी करायला हवेत जी कंपनी सातत्याने डिव्हिडंड देते. अशा कंपन्यांची लिस्ट आपल्याला इंटरनेट वर सहज उपलब्ध होते.

डिव्हिडंड मिळ्वण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
१. रेकॉर्ड डेट - या तारखेला आपले नाव कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या यादी मध्ये सामावविष्ट असावे तरच आपण डिव्हिडंड साठी पात्र ठरता. या तारखेची घोषणा कंपनी कडून आधीच केली जाते.
२. एक्स डिव्हिडंड डेट - हि तारीख रेकॉर्ड डेटच्या फक्त एक दिवस आधीची असते. जर आपण या तारखेपर्यंत कंपनी चे शेअर घेतलेले नसतील तर आपण डिव्हिडंड मिळवण्यास असमर्थ ठरता .

एका वर्षात कंपनी कितीही वेळा डिव्हिडंड देऊ शकते. त्या आधी कंपनी रेकॉर्ड डेट जाहीर करते म्हणजे ज्यांना डिव्हिडंड पाहिजे आहे त्यांनी या डेट च्या आधी शेअर खरेदी करा असे कंपनी सांगते.

जर आपण या जाहीरनाम्यावर लक्ष ठेवले तर आपला डिव्हिडंड चुकणार नाही. कंपनी च्या वेब साईट वर किंवा मनी कंट्रोल सारख्या साईट वर या तारखा आपल्याला सहज मिळतात.

वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा डिव्हिडंड देणाऱ्या काही आघीडीच्या कंपन्या खालील प्रमाणे
1.Godrej Consumer Products Ltd.
2.Kewal Kiran Clothing Ltd.
3.Indiabulls housing finance Ltd.
4.Page Industries Ltd.
5.Nestle India Ltd.
6.Sun TV Network Ltd.
7.Trident Ltd.
8.Hinduja Global Solutions Ltd.
9.Granules India Ltd.
10.GMM Pfaudler Ltd.
11.Balkrishna Industries Ltd.
12.Vidhi Speciality Food Ingredients Ltd.
13.Infosys Ltd.
14.Manappuram Finance Ltd.
15.Symphony Ltd.
16.TCS Ltd.
17.HCL Technologies Ltd.
18.Mindtree Ltd.
19.CRISIL Ltd.
20.Computer Age Management Services Ltd.


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post