.

फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग ची संपूर्ण माहिती मराठीत | Complete futuer and option trading information in Marathi

फ्युचर आणि ऑप्शन म्हणजे काय?

Future and option trading information in Marathi


फ्युचर आणि ऑप्शन हे डेरीवेटीव्ह मार्केट चे प्रकार आहेत. आता डेरीवेटीव्ह म्हणजे काय? तर डेरीवेटीव्ह म्हणजे मूळ प्रकारापासून तयार होणारे उपप्रकार. या मध्ये इक्विटी किंवा स्टॉक हा मूळ प्रकार आहे आणि फ्युचर आणि ऑप्शन हे त्याचे उप प्रकार म्हणजेच डेरीवेटीव्ह आहेत.

जर उदाहरणच द्यायचे झाले तर, जसे दूध हा एक मूळ पदार्थ आहे आणि दही, पनीर, चीझ, श्रीखंड हे सारे पदार्थ दुधापासून बनतात म्हणजेच हे त्याचे उप प्रकार आहेत. जर मार्केट च्या भाषेत सांगायचे झाले तर दूध हे इक्विटी आहे आणि बाकीचे पदार्थ हे त्याचे डेरीवेटीव्ह आहेत.

जर आपण क्रूड ऑइल हे इक्विटी मानले तर पेट्रोल आणि डिझेल हे त्याचे डेरीवेटीव्ह आहेत म्हणजेच हे पदार्थ क्रूड ऑइल पासून बनवले जातात.

थोडक्यात काय तर, इक्विटी मार्केट मध्ये स्टॉक ची खरेदी विक्री चालते तर डेरीवेटीव्ह मार्केट मध्ये फ्युचर आणि ऑप्शन च्या लॉट ची खरेदी विक्री चालते.

स्टॉक मार्केट चे दोन प्रकार आहेत
१. कॅश मार्केट - म्हणजे आपले इक्विटी मार्केट ज्या मध्ये आपण वर्तमानातील तारखेला खरेदी किंवा विक्री करता.
२. फ्युचर आणि ऑप्शन - या मध्ये भविष्यातील तारखेला खरेदी किंवा विक्री केली जाते.
कॅश मार्केट मध्ये आपण एखादा स्टॉक कितीही संख्येमध्ये घेऊ शकता. पण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये आपल्याला लॉट साईझ ने खरेदी करावी लागते. हि लॉट साईझ प्रत्येक कंपनीची वेग वेगळी असते.
ज्या कंपन्या कॅश मध्ये लिस्टेड आहेत त्या सगळ्याच कंपन्या फ्युचर आणि ऑप्शन मध्ये लिस्टेड नसतात. म्हणजेच कॅश च्या तुलनेत फ्युचर आणि ऑप्शन मध्ये खूपच कमी कंपन्या लिस्टेड आहेत ज्यांची संख्या फक्त १६० आहे.

डेरीवेटीव्ह मार्केट चे प्रकार

डेरीवेटीव्ह मार्केट चे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
१. फॉरवर्ड मार्केट
२. फ्युचर मार्केट
३. ऑप्शन मार्केट
फॉरवर्ड मार्केट मध्ये काही त्रुटी आहेत जसे कि, बायर आणि सेलर या मध्ये कोणीही मध्यस्त नसतो. या मध्ये जर आपण बाय करणार असाल तर सेलर आपल्याला स्वतः शोधावा लागतो. याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते परस्पर सामंजस्याने ठरवावे लागते. जी पार्टी लॉस मध्ये आहे ती पार्टी कॉन्ट्रॅक्ट सोडून पळून जाऊ शकते. आणि या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे फ्युचर मार्केट.

फ्युचर मार्केट मध्ये स्टॉक एक्सचेंज किंवा कमोडिटी एक्सचेन्ज हे मध्यस्थाची भूमिका पार पडतात. या मध्ये कोणतेहि कॉन्ट्रॅक्ट घेण्यापूर्वी आपल्या कडून डिपॉझिट घेतले जाते त्या मुळे कॉन्ट्रॅक्ट सोडून कोणीही पळून जाऊ शकत नाही. आपण स्टॉक मध्ये किंवा इंडेक्स मध्ये मार्जिन मनी जमा करून फ्युचर ट्रेडिंग करू शकता.

फ्युचर ट्रेडिंग हे लॉट साईझ मध्ये केले जाते. प्रत्येक स्टॉक ची किंवा इंडेक्स ची लॉट साईझ वेग वेगळी असते. उदाहरणार्थ, SBI च्या फ्युचर ची लॉट साईझ ३००० आहे म्हणजेच SBI च्या एका लॉट मध्ये ३ हजार शेअर्स आहेत. जर SBI एक रुपयाने वर किंवा खाली गेला तर आपल्याला ३००० रुपयांचा नफा किंवा नुकसान होऊ शकते. फ्युचर मध्ये आपण एक किंवा अनेक लॉट विकत घेऊ शकतो. फ्युचर ट्रेडिंग हा एक कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग चा प्रकार आहे म्हणून त्याला एक्सपायरी म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट समाप्तीची तारीख असते जी आधीच ठरलेली असते. फ्युचर मध्ये आपण घेतलेला लॉट आपण फक्त एक्सपायरी डेट पर्यंतच ठेऊ शकतो. स्टॉक फ्युचर ची कमीत कमी एक्सपायरी एक महिन्याची असते तर जास्तीत जास्त एक्सपायरी तीन महिन्याची असते म्हणजे आपण तीन महिन्यांच्या वर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट होल्ड करू शकत नाही.

जर आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट एका महिन्यासाठी घेतले तर त्याला नियर मंथ एक्सपायरी असे म्हणतात.
जर आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट दोन महिन्यासाठी घेतले तर त्याला नेक्स्ट मंथ एक्सपायरी असे म्हणतात.
जर आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट तीन महिन्यासाठी घेतले तर त्याला फार मंथ एक्सपायरी असे म्हणतात.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी स्टॉक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ची एक्सपायरी असते. तर वीकली प्रकारात इंडेक्स फ्युचर ची एक्सपायरी आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी आणि मंथली प्रकारात महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते. जर एखाद्या गुरुवारी मार्केट ला सुट्टी असेल तर एक दिवस आधी म्हणजे बुधवारी मार्केट ची एक्सपायरी घोषित केली जाते.

फ्युचर च्या किमती मध्ये आणि स्टॉक च्या किमती मध्ये थोडासा फरक असतो. फ्युचर ची किंमत हि स्टॉक च्या किमती पेक्षा किंचित जास्त असते. फ्युचर च्या किमतीला टर्न ओव्हर असे सुद्धा म्हटले जाते. कधी कधी फ्युचर ची किंमत स्टॉक च्या किमती पेक्षा खाली जाते पण हे फार क्वचितच होते.

कुठल्याही फ्युचर ची लॉट साईझ ठरवताना त्याची एकत्रित किंमत ५ लाखांच्या वर गेली पाहिजे असा नियम आहे.
उदाहरणार्थ, SBI च्या फ्युचर ची सध्याची लॉट साईझ आहे ३००० आणि SBI च्या स्टॉक ची किंमत आहे ४०० म्हणजेच ३००० X ४०० = १२००००० असे एकत्रित बारा लाख रुपये होतात.
जर आपल्याला वाटत असेल कि SBI फ्युचर ट्रेड करण्यासाठी आपल्याकडे १२ लाख रुपये असायला पाहिजेत तर हा आपला गैर समज आहे. कारण या मध्ये आपल्याला टर्न ओव्हर किमतीच्या फक्त १० ते २० टक्के रक्कम भरावी लागते. या टक्केवारी ब्रोकर च्या हातात असतात. राहिलेले पैसे हे आपण ब्रोकर कडून उधार घेतो ज्याला लिव्हरेज असे म्हटले जाते. या रकमेच्या बदल्यात ब्रोकर आपल्याकडून ब्रोकरेज घेतो.

वरील उदाहरणाप्रमाणे, जर आपल्याला SBI चा फ्युचर चा लॉट घ्यायचा असेल तर आपल्याकडे १२ लाखाच्या १०% रक्कम म्हणजेच १.२ लाख एवढी रक्कम असणे गरजेचे आहे. बाकी ९०% रक्कम आपला ब्रोकर आपल्याला लिव्हरेज च्या स्वरूपात देतो. जर एक्सपायरी डेट पर्यंत SBI चा स्टॉक २० रुपयांनी वाढला तर आपल्याला ३०००(लॉट साईझ ) X २० म्हणजेच ६० हजार रुपयांचा नफा होईल. म्हणजेच आपण फक्त १.२ लाख रक्कम गुंतवून ६० हजार रुपयांचा नफा कमावला. फ्युचर मध्ये गुंतवणुकीचे प्रमाण जरी जास्त असले तरी त्यातून प्रॉफिट मिळण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते. फ्युचर मध्ये गुंतवणुकीचा आणखी एक फायदा म्हणजे, कॅश मध्ये आपण सेल पोझिशन होल्ड करू शकत नाही पण फ्युचर मध्ये एक्सपायरी डेट पर्यंत सेल पोझिशन होल्ड करता येते.

आपण घेतलेल्या फ्युचर मध्ये जर आपल्याला नुकसान झाले तर काय? वरील उदाहरणात आपण पहिले कि आपल्या अकाउंट मध्ये १.२ लाख रुपये आहेत. जर आपण होल्ड केलेल्या पोझिशन मध्ये आपल्याला नुकसान होऊ लागले आणि ते नुकसान जर १.२ लाखाच्या जवळपास आले तर ब्रोकर आपल्याला नोटीस पाठवून लॉस ची रक्कम भरण्यास सांगतो. जर दिलेल्या मुदतीत आपण हि रक्कम भरली नाही तर आपल्याला खूप मोठा दंड भरावा लागतो आणि ब्रोकर परस्पर आपली पोझिशन सुद्धा विकू शकतो. जर आपण शेअर मार्केट मध्ये नवीन असाल तर आपल्याला मार्केट चा चांगला अनुभव येई पर्यंत आपण फ्युचर ट्रेडिंग पासून दूरच राहावे. पण आपल्याला मार्केट चा चांगला अनुभव असेल तर आपण फ्युचर ट्रेडिंग द्वारे मोठं मोठे प्रॉफिट मिळवू शकता.

ऑप्शन म्हणजे काय?

फ्युचर प्रमाणेच ऑप्शन सुद्धा डेरीवेटीव्ह कॉन्ट्रॅक्ट चा प्रकार असल्यामुळे त्याला सुद्धा लॉट साईझ आणि एक्सपायरी असते. प्रत्येक स्टॉक आणि इंडेक्स ऑप्शन ची लॉट साईझ वेग वेगळी असते. फ्युचर प्रमाणेच स्टॉक ऑप्शन ची एक्सपायरी सुद्धा कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांची असते तर इंडेक्स ऑप्शन ची एक्सपायरी कमीत कमी एका आठवड्यापासून ते तीन महिन्यांपर्यंत असते.

कॅश मार्केट मध्ये थेट इंडेक्स वर ट्रेड करता येत नाही पण फ्युचर आणि ऑप्शन मार्केट मध्ये इंडेक्स सुद्धा लॉट मध्ये ट्रेड करता येतो. जर डेरीवेटीव्ह मध्ये निफ्टी ट्रेड करायचा असेल तर त्याची लॉट साईझ आहे ७५ आणि बॅंकनिफटी ची लॉट साईझ आहे २५.

ऑप्शन मध्ये आपल्याला शेअर ची पूर्ण किंमत न भरता फक्त प्रीमियम भरावा लागतो. ऑप्शन खरेदी करताना सर्वात प्रथम आपल्याला एक स्ट्राईक प्राईस निवडावी लागते आणि प्रत्येक स्ट्राईक प्राईस चा एक प्रीमियम ठरलेला असतो. लॉट साईझ प्रमाणे प्रीमियम भरून आपण ऑप्शन खरेदी करू शकतो.

आता याचे एक उदाहरण पाहूया. आपल्याला एखादा फ्लॅट बुक करायचा आहे आणि आपले बजेट 50 लाखांपर्यंत आहे. आपल्याकडे सध्या पन्नास लाख रुपये नाहीत पण ते पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत.

एक दिवस आपल्याला अशी माहिती मिळते की आपल्याला हवा असलेला फ्लॅट पन्नास लाखांमध्ये उपलब्ध आहे पण ही ऑफर फक्त आजच्याच दिवशी आहे आणि उद्यापासून फ्लॅटच्या किमती वाढणार आहेत अशावेळी आपण काय कराल?

अशावेळी आपण बुकिंग ऑफिसमध्ये जाता आणि तेथील एजंट आपल्याला सांगतो की तुम्ही आता फक्त 5 हजार रुपये भरून टोकन घ्या आणि पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही हा व्यवहार पूर्ण करू शकता म्हणजेच तुम्ही फक्त पाच हजार रुपये भरून फ्लॅट बुक करू शकता.

या पाच हजार रुपयांनाच प्रीमियमअसे म्हटले जाते आणि पन्नास लाख रुपयांना स्ट्राईक प्राईज असे म्हटले जाते. म्हणजे जरी तो फ्लॅट उद्या 55 लाखांचा झाला तरी आपल्याला तो पन्नास लाखांमध्येच मिळणार कारण आपण आधीच टोकन अमाऊंट देऊन तो बुक केलेला आहे. म्हणजे या व्यवहारात आपल्याला पाच लाख रुपयांचा फायदा झाला. ऑप्शन मध्ये देखील आपण अशाच प्रकारे एखाद्या स्ट्राइक प्राईस साठी प्रीमियम भरून त्यामध्ये ट्रेडिंग करू शकता.

जर आपल्याला तेवढ्याच आकाराचा फ्लॅट दुसरीकडे 40 लाख रुपयांना मिळत असेल तर आपण हा व्यवहार कॅन्सल करून दुसरीकडे फ्लॅट बुक करू शकता अशावेळी आपल्याला फक्त आपण भरलेल्या टोकन अमाऊंट चे म्हणजेच फक्त पाच हजार रुपयांचे नुकसान होते पण पुढच्या व्यवहारामध्ये आपले जवळपास दहा लाख रुपये वाचतात. म्हणजेच यामध्ये लॉस मर्यादित आहे आणि प्रॉफिट अमर्यादित आहे.

अजून एका उदाहरणामधून ऑप्शन्स समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
समजा जर रिलायन्सच्या एका शेअरची किंमत सध्या दोन हजार रुपये चालू आहे. आणि तुमच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे रिलायन्स येत्या एक-दोन दिवसात 100 ते 200 रुपयांनी वाढणार असे तुम्हाला वाटते. आता रिलायन्स चा दोन हजार स्ट्राईक प्राईज असलेला ऑप्शन तुम्ही निवडता ज्याचा प्रीमियम दहा रुपये आहे.

रिलायन्सच्या एका लॉट ची साईज 250 रुपये आहे म्हणजेच रिलायन्सचा एक लॉट खरेदी करण्यासाठी आपल्याला दोन हजार पाचशे रुपये मोजावे लागतील(10X250).

जर आपल्या अंदाजाप्रमाणे रिलायन्स शेअर 2000 रुपयांवरून 2200 रुपयांपर्यंत जर वर गेला तर आपण घेतलेल्या प्रीमियम ची किंमत सुद्धा दहा रुपयांवरून 210 रुपयांपर्यंत जाते. म्हणजेच यामध्ये आपल्याला 200 पॉइंट मिळतात त्याचा आपल्या लॉट साइज बरोबर जर गुणाकार केला (200x250) तर 50 हजार रुपयांचा आपल्याला फायदा होतो.

याउलट, रिलायन्स स्टॉक जर दोनशे रुपयांनी खाली आला तर आपल्याला 50 हजार रुपयांचा लॉस होत नाही तर आपल्याला फक्त आपण भरलेल्या प्रीमियम चा म्हणजेच फक्त 2500 रुपयांचा लॉस होतो. म्हणजेच यामध्ये लॉस मर्यादित राहतो आणि प्रॉफिट अमर्यादित होते.

कोणतेही स्टॉक ऑप्शन खरेदी करताना आपल्याला पूर्ण रक्कम भरण्याची गरज नसते त्याऐवजी थोडासा प्रीमियम भरून आपण कोणत्याही कंपनीचे महागडे शेअर्स ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता आणि त्यावर अमर्यादित प्रॉफिट मिळवू शकता.

कॉल आणि पुट ऑप्शन म्हणजे काय?


कॉल ऑप्शन म्हणजे काय?
ज्या वेळी आपल्याला वाटतं कि येणाऱ्या काही दिवसांमध्ये एखाद्या स्टॉक ची किंवा इंडेक्स ची किंमत वाढणार आहे त्यावेळी आपण त्या स्टॉक चा किंवा इंडेक्सचा कॉल ऑप्शन खरेदी करता.

जर एखाद्या शेअरची किंमत 200 रुपये चालू आहे तर आपण त्या शेअरचा 210 रुपयांचा कॉल (210 CE) खरेदी करता कारण आपल्याला असे वाटत असते की भविष्यामध्ये स्टॉक ची किंमत 210 रुपयांच्या वर जाणार आहे.

पुट ऑप्शन म्हणजे काय?
ज्यावेळी आपल्याला वाटते की येणाऱ्या काही दिवसांमध्ये एखाद्या स्टॉक ची किंवा इंडेक्स ची किंमत कमी होणार आहे त्यावेळी आपण त्या स्टॉक चा किंवा इंडेक्सचा पुट ऑप्शन खरेदी करता.

जर एखाद्या शेअरची किंमत दोनशे रुपये चालू आहे तर आपण त्या शेअरचा 190 रुपयांचा पुट(190 PE) खरेदी करता कारण आपल्याला असे वाटते कि भविष्यामध्ये स्टॉक ची किंमत 190 रुपयांच्या खाली जाणार आहे.

पुट ऑप्शन चा आणखी एक फायदा म्हणजे जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये मंदी चे संकेत मिळतात त्यावेळी आपल्या पोर्टफोलीओ चे रक्षण करण्यासाठी आपण पुट ऑप्शन खरेदी करू शकता म्हणजेच मार्केट खाली आल्यानंतर आपल्या पोर्टफोलिओ मधील शेअर्सना जो लॉस होणार आहे तो पुट ऑप्शन द्वारे भरून काढला जातो.

कॉल आणि पुट ऑप्शन मध्ये कशाप्रकारे ट्रेडिंग करता येते?
जेव्हा आपण एखाद्या स्टॉकचे कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन खरेदी करता त्यावेळी त्याची एक्सपायरी ही कमीत कमी एक महिना आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत आपण निवडू शकता. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ऑप्शन ची एक्सपायरी असते म्हणजेच आपण घेतलेले कॉल आणि पुट ऑप्शन हे महिन्याच्या शेवटच्या गुरुवार पर्यंतच व्हॅलिड असतात त्यानंतर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट समाप्त होते.

जर आपण एखाद्या इंडेक्स चा कॉल आणि पुट ऑप्शन खरेदी केला असेल तर त्याची एक्सपायरी ही कमीत कमी एक आठवडा आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत असू शकते. विकली ऑप्शन मध्ये प्रत्येक गुरुवारी ची एक्सपायरी असते तर मंथली प्रकारात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ही एक्सपायरी असते म्हणजेच त्या दिवशी आपले कॉन्ट्रॅक्ट समाप्त होते.

स्ट्राईक प्राईज म्हणजे काय?


जेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीबरोबर ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट साईंन करता त्यावेळी त्यामध्ये खालील मुख्य गोष्टींचा समावेश होतो.

वेळ मर्यादा
ऑप्शन ची प्राईज
स्ट्राईक प्राईज

कॉल ऑप्शन साठी स्ट्राईक प्राईज म्हणजे अशी किंमत ज्यावर आपण एखाद्या स्टॉक चा कॉल खरेदी किंवा विक्री करतो आणि पुट ऑप्शन साठी स्ट्राईक प्राईज म्हणजे अशी किंमत ज्यावर आपण एखाद्या स्टॉक चा पुट खरेदी किंवा विक्री करतो.

कॉल आणि पुट ऑप्शन मध्ये एका ठराविक किमतीच्या अंतराने आपण एखाद्या स्टॉक चे कॉल किंवा पुट ऑप्शन खरेदी किंवा विक्री करू शकता करू शकता. या किमतीमधील अंतराना स्ट्राईक प्राईज असे म्हटले जाते.

किमतीमधील हे अंतर प्रत्येक स्टॉकचे वेगवेगळे असते. काही स्टॉक च्या स्ट्राईक प्राईज मध्ये मध्ये दहा रुपयांचा फरक असतो तर काही स्टॉक च्या स्ट्राईक प्राईज मध्ये पन्नास रुपयांचा फरक असतो.

उदाहरणार्थ ITC नावाच्या शेअर चे दोन स्ट्राईक प्राईज मधील अंतर हे दहा रुपयांचे आहे म्हणजेच जर आयटीसी चा शेअर सध्या 195 रुपयांना असेल तर त्याच्या स्ट्राईक प्राईज 200, 210, 220 अशा असतात.

आता आता कॉल ऑप्शन ची खरेदी आणि विक्री कशी चालते ते पाहून पाहूया.
ABC कंपनीच्या स्टॉक ची सध्या ची मार्केट प्राइज 100 रुपये आहे आणि या स्टॉक ची स्ट्राईक प्राईज 95 रुपये आहे याचाच अर्थ जो हा स्टॉक विकत आहे त्याला असे वाटत आहे की हा स्टॉक भविष्यात खाली येऊ शकतो.

पण दुसर्‍या बाजूला आपल्या एनालिसिस नुसार आपणास असे वाटत आहे की हा स्टॉक एकशे वीस रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर एक्सपायरी च्या दिवसापर्यंत एबीसी कंपनीचा स्टॉक एकशे पंधरा रुपयांना गेला तर यामध्ये आपले प्रॉफिट होते आणि विकणाऱ्या चे नुकसान होते पण या उलट जर तो स्टॉक 80 रुपयांपर्यंत खाली आला तर ऑप्शन विकणाऱ्याचा फायदा होतो आणि आपले नुकसान होते.

जर एक्सपायरी च्या दिवशीसुद्धा हा स्टॉक शंभर रुपयांनाच असेल तरीसुद्धा आपले नुकसान होते कारण ऑप्शन मध्ये दर दिवशी आपला प्रीमियम थोडा थोडा कमी होत जातो यालाच प्रीमियम डीके (Premium Decay) असे म्हटले जाते.

लॉट साइज म्हणजे काय?


कॅश मध्ये किंवा इक्विटी मध्ये आपण कितीही शेअर्स बाय किंवा सेल करू शकता उदाहरणार्थ 1, 2, 3, 10, 15.

पण फ्यूचर आणि ऑप्शन मध्ये शेअर्स बाय करताना ते एका ठराविक संख्येने बाय करावे लागतात आणि त्याला लॉट साइज असे म्हणतात.

किमतीनुसार प्रत्येक स्टॉक ची लॉट साइज वेगवेगळी असते. सामान्यपणे ज्या शेअर्सची किंमत जास्त असते त्या शेअरच्या लॉटमध्ये कमी शेअर्स असतात आणि ज्या शेअर्सची किंमत कमी असते त्या शेअरच्या लॉटमध्ये जास्त शेअर असतात.

SBI च्या शेअर्सची लॉट साइज 3000 आहे म्हणजेच ज्यावेळी आपण SBI चा एक लॉट खरेदी करतो त्यावेळी आपल्याला 3000 शेअर्स हे एकगठ्ठा खरेदी करावी लागतात.

तसेच, मारुतीच्या शेअरची किंमत खूपच जास्त असल्यामुळे त्याच्या लॉट साईज मध्ये फक्त शंभर शेअर्स आहेत.

थोडक्यात काय, तर फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करताना एक किंवा दोन शेअर्स घेऊन चालत नाही तर आपल्याला लॉट साइज नुसार एक गठ्ठा शेअर्स घ्यावे लागतात. आपण जर मारुतीचा एक लॉट घेतला तर आपल्याला 100 शेअर्स खरेदी करावे लागतात त्याचप्रमाणे दोन लॉट घेतले तर 200 शेअर्स खरेदी करावे लागतील .

प्रीमियम म्हणजे काय?


जसे मागील उदाहरणांमध्ये आपण पाहिले, जर आपल्याला एखादा फ्लॅट बुक करायचा असेल आणि फ्लॅट ची किंमत 50 लाख रुपये असेल तर तो फ्लॅट बुक करण्यासाठी आपण पन्नास लाख रुपये एक रकमी देत नाही त्याऐवजी आपण फक्त पाच हजार रुपये भरून टोकन घेता म्हणजेच आपण तो फ्लॅट पाच हजार रुपयांना बुक करता.

या उदाहरणांमध्ये जर 50 लाख रुपये ही स्ट्राईक प्राईज मानली तर पाच हजार रुपये हा त्याचा प्रीमियम होतो.

ऑप्शन मध्ये ट्रेड करतानासुद्धा आपल्याला स्टॉक च्या लॉट साइज एवढी पूर्ण रक्कम भरण्याची गरज नसते त्याऐवजी आपण थोडासा प्रीमियम भरून तो स्टॉक खरेदी करू शकता.

प्रत्येक स्टॉक चा प्रीमियम हा त्याच्या स्ट्राईक प्राईज नुसार बदलत असतो.
जर आयटीसी कंपनीच्या शेअर चा सध्याचा भाव 195 रुपये असेल तर आपल्याला दोनशे रुपयांचा कॉल ऑप्शन दोनशे दहा रुपयांच्या कॉल ऑप्शन पेक्षा महाग मिळतो कारण तो सध्याच्या स्ट्राइक प्राईस च्या जवळ असतो.

ऑप्शन रायटिंग म्हणजे काय?


ऑप्शन रायटिंग चा साधा सोपा अर्थ म्हणजे ऑप्शन विकणे. आतापर्यंत आपण फक्त कॉल आणि पुट ऑप्शन खरेदी करण्यासंदर्भात चर्चा केली पण आता कॉल आणि पुट ऑप्शन हे आपण कशा प्रकारे विकू शकतो ते पाहणार आहोत.

जर आपण एखादा कॉल ऑप्शन खरेदी केला तर आपण तो तेव्हाच खरेदी करू शकता जेव्हा तो कोणीतरी विकत असेल. म्हणजे ज्यावेळी आपण अडीच हजार रुपये प्रीमियम देऊन एखादा कॉल ऑप्शन खरेदी करता त्यावेळी ऑप्शन विकणाऱ्याचा जास्तीत जास्त प्रॉफिट हा आपण दिलेला प्रीमियम म्हणजेच फक्त अडीच हजार रुपये असतो. आणि यामध्ये आपला जास्तीत जास्त लॉस हा सुद्धा अडीच हजार रुपये असतो.

पण काही कारणास्तव जर मार्केट आपल्या बाजूने गेले तर ऑप्शन विकणाऱ्या चा अमर्यादित लॉस होऊ शकतो. म्हणजेच ऑप्शन रायटिंग मध्ये प्रॉफिट हा लिमिटेड आहे पण लॉस हा अनलिमिटेड आहे. याउलट ऑप्शन बायर चा लॉस हा लिमिटेड असतो आणि प्रॉफिट अनलिमिटेड असतो.

जर एखाद्या स्टॉक ची सध्याची मार्केट प्राईज 100 रुपये आहे आणि आपल्याला असं वाटतंय की तो स्टॉक आणखी वर जाणार आहे तर आपण तो चार प्रकारे खरेदी करू शकता.

तो स्टॉक इक्विटी मध्ये खरेदी करणे
तो स्टॉक फ्युचर मध्ये खरेदी करणे
त्या स्टॉकचे कॉल ऑप्शन खरेदी करणे
त्या स्टॉकचे पुट ऑप्शन विकणे.

त्याच प्रकारे जर एखाद्या स्टॉक ची सध्याची मार्केट प्राईज 100 रुपये आहे आणि आपल्याला असं वाटतंय की तो
स्टॉक खाली जाणार आहे तर आपण तो चार प्रकारे विकू शकता.

तो स्टॉक इंट्राडे इक्विटी मध्ये विकणे
तो स्टॉक फ्युचर मध्ये विकणे
त्या स्टॉकचे पुट ऑप्शन खरेदी करणे
त्यास स्टॉक चे कॉल ऑप्शन विकणे

वरील दोन्ही प्रकारातील शेवटचे उदाहरण हे ऑप्शन रायटिंग चे उदाहरण आहे.
एखाद्या स्टॉकचे कॉल किंवा पुट ऑप्शन खरेदी करण्यासाठी आपल्या अकाउंट मध्ये फक्त प्रीमियम पुरतेच पैसे असणे गरजेचे आहे याउलट कॉल किंवा पुट ऑप्शन विकण्याकरिता आपल्या अकाउंट मध्ये कितीतरी अधिक पैसे असणे गरजेचे आहे त्याशिवाय आपण ऑप्शन रायटिंग करू शकत नाही कारण यामध्ये लॉस हा अनलिमिटेड असतो.

इन द मनी , आऊट ऑफ द मनी, ऍट द मनी म्हणजे काय?


इन द मनी (In the money) ऑप्शन म्हणजे काय?

इन द मनी या प्रकारात इन द मनी कॉल आणि इन द मनी पुट हे दोन्ही ऑप्शन येतात.

इन द मनी (In the money) कॉल ऑप्शन - कॉल ऑप्शन मध्ये ज्यावेळी एखाद्या शेअरची स्ट्राईक प्राईज ही त्याच्या सध्याच्या मार्केट प्राइस पेक्षा कमी असते तेव्हा या ऑप्शनला इन द मनी(ITM) कॉल ऑप्शन असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ, जर ITC कंपनीच्या शेअरची सध्याची मार्केट प्राईज जर दोनशे रुपये चालू असेल तर 190 रुपये स्ट्राईक प्राईज वाले ऑप्शन हे इन द मनी म्हणून ओळखले जाते.

इन द मनी (In the money) पुट ऑप्शन - पुट ऑप्शन मध्ये ज्यावेळी एखाद्या शेअरची स्ट्राईक प्राईज ही त्याच्या सध्याच्या मार्केट प्राईस पेक्षा जास्त असते त्यावेळी या ऑप्शनला इन द मनी(ITM) पुटऑप्शन असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ, जर ITC कंपनीच्या शेअरची सध्याची मार्केट प्राईज जर दोनशे रुपये चालू असेल तर 210 रुपये स्ट्राईक प्राईज वाले ऑप्शन हे इन द मनी पुट ऑप्शन म्हणून ओळखले जाते.

यामध्ये जर स्टॉक वर किंवा खाली गेला तर ऑप्शन ची प्राईस सुद्धा वेगाने खाली किंवा वर जाते.

ऍट द मनी (At the money) म्हणजे काय?

ज्यावेळी शेअर ची स्ट्राईक प्राईज ही त्याच्या सध्याच्या मार्केट प्राइस इतकेच किंवा त्याच्या जवळपास असते तेव्हा अशा ऑप्शनला ऍट द मनी (ATM) असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ, आयटीसी कंपनीची सध्या ची मार्केट प्राइज आहे 198 रुपये तर दोनशे रुपये स्ट्राईक प्राईज ऍट द मनी स्ट्राईक प्राईज म्हणून ओळखले जाते.
ऍट द मनी स्ट्राईक प्राईज कॉल आणि पुट या दोघांसाठी सारखीच असते.

यामध्ये जर स्टॉक वर किंवा खाली गेला तर ऑप्शन ची प्राईस सुद्धा वेगाने खाली किंवा वर जाते.

आऊट ऑफ द मनी (Out of the money) कॉल ऑप्शन - कॉल ऑप्शन मध्ये ज्यावेळी एखाद्या शेअरची स्ट्राईक प्राईज ही त्याच्या सध्याच्या मार्केट प्राइस पेक्षा जास्त असते तेव्हा या ऑप्शनला आऊट ऑफ द मनी (OTM) कॉल ऑप्शन असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ, जर ITC कंपनीच्या शेअरची सध्याची मार्केट प्राईज जर दोनशे रुपये चालू असेल तर 210 रुपये स्ट्राईक प्राईज वाले ऑप्शन हे आऊट ऑफ द मनी म्हणून ओळखले जाते.

आऊट ऑफ द मनी (Out of the Money) पुट ऑप्शन - पुट ऑप्शन मध्ये ज्यावेळी एखाद्या शेअरची स्ट्राईक प्राईज ही त्याच्या सध्याच्या मार्केट प्राईस पेक्षा कमी असते त्यावेळी या ऑप्शनला आऊट ऑफ द मनी पुटऑप्शन असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ, जर ITC कंपनीच्या शेअरची सध्याची मार्केट प्राईज जर दोनशे रुपये चालू असेल तर 190 रुपये स्ट्राईक प्राईज वाले ऑप्शन हे आऊट ऑफ द मनी पुट ऑप्शन म्हणून ओळखले जाते.

यामध्ये जर स्टॉक वर किंवा खाली गेला तरी ऑप्शन ची प्राईज अगदी संथ गतीने वर किंवा खाली जाते. जर आऊट ऑफ द मनी हा ऑप्शन जर खूप लांबचा असेल तर बऱ्याच वेळा स्टॉक ची प्राईज कितीही वाढली किंवा कमी झाली तरी ऑप्शन ची प्राईज तेवढीच राहते.

फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंग यांच्यामध्ये काय फरक आहे?


ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर आपण कॉल किंवा पुट बाय केला आणि मार्केट जर आपण ठरविलेल्या दिशेने गेले तर आपल्याला अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतो पण मार्केट जर विरुद्ध दिशेने गेले तर आपल्याला फक्त जेवढा प्रीमियम आपण भरला आहे तेवढाच लॉस होऊ शकतो.

जर आपण कॉल किंवा पुट सेल केला तर आपल्याला फक्त तेवढाच प्रॉफिट होऊ शकतो जेवढा प्रीमियम कॉल किंवा पुट बायर ने भरलेला आहे पण जर आपल्याला लॉस झाला तर तो अनलिमिटेड होऊ शकतो.

फ्युचर मध्ये मात्र असे नाही, फ्युचर मध्ये आपण बाय केले काय किंवा सेल केले काय, मार्केट जर आपल्या डायरेक्शन ने गेले तर आपल्याला अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतो पण मार्केट जर आपल्या विरुद्ध दिशेने गेले तर आपल्याला अनलिमिटेड लॉस सुद्धा होऊ शकतो.

यामध्ये प्रीमियम हा प्रकार येत नाही. जर फ्युचर बाय करायचे असेल तर आपल्याला जास्त पैसे लागतात याउलट ऑप्शन बाय करायचे असेल तर ते कमी पैशांमध्ये बाय करता येते.

ऑप्शन मध्ये प्रीमियम डीके नावाचा एक प्रकार असतो म्हणजेच जर ऑप्शन मध्ये आपण एखादी पोझिशन होल्ड केली असेल तर जसजसे दिवस जातात तसा तसा आपला प्रीमियम कमी होत जातो पण फ्यूचर मध्ये असा कोणताही प्रकार नाही.

फ्यूचर आणि ऑप्शन यांच्यात काय समानता आहे?
फ्यूचर आणि ऑप्शन हे दोन्ही सुद्धा डेरिव्हेटिव्हज चे प्रकार आहेत. दोघेही लॉट साईज मध्ये ट्रेड केले जातात आणि दोघांनाही कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी डेट आहे. दोघांमध्येही बाय आणि सेल पोझिशन एक्सपायरी डेट पर्यंत होल्ड करता येते.


हेजिंग म्हणजे काय ती कशी केली जाते?


जर साध्या सोप्या भाषेत हेजिंग म्हणजे काय हे जर समजून घ्यायचे असेल तर आपल्याला टर्म इन्शुरन्स चे एक उदाहरण घेता येईल.

आपण इन्शुरन्स का घेतो? तर याचे उत्तर आहे रिस्क कमी करण्यासाठी. म्हणजेच माझ्या कुटुंबा मध्ये मी जर एकुलता एक कमावता सदस्य असेल आणि उद्या जर मला काही झाले तर माझ्या कुटुंबांची पैशांची गरज ही पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून मी वर्षाला वीस हजार रुपये प्रीमियम भरून एक टर्म इन्शुरन्स घेतो म्हणजेच मी माझी भविष्यातील रिस्क कमी करतो.

स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा जेव्हा आपण एखादी पोझीशन घेता तेव्हा आपल्याला एक चिंता कायम सतावत असते आणि ती म्हणजे जर मी घेतलेल्या पोझिशन च्या विरुद्ध दिशेने मार्केट गेले तर? म्हणजेच जर आपल्या पोझिशन च्या विरुद्ध दिशेने मार्केट गेले तर आपल्याला लॉस होण्याची रिस्क आहे म्हणूनच ही रिस्क कमी करण्यासाठी हेजिंग केले जाते.

उदाहरणार्थ, मला असे वाटत आहे की रिलायन्सचा स्टॉक येणाऱ्या काही दिवसात वर जाण्याची शक्यता आहे म्हणून मी त्याच्या मध्ये बाय पोझिशन घेतली.

पण प्रत्येक वेळी माझा अंदाज बरोबर येऊ शकत नाही. मग मी रिलायन्स मधील माझ्या बाय पोझिशनला एक इन्शुरन्स देण्याचा प्रयत्न करेन म्हणजेच जर रिलायन्स स्टॉक खाली आला तरी मला जास्त लॉस होऊ नये यासाठी मी रिलायन्सचा एक पुट ऑप्शन बाय करेन किंवा फ्युचर मध्ये रिलायन्सचा स्टॉक सेल करेन म्हणजेच मी हेजिंग करेन.

तर थोडक्यात काय, आपण जर इक्विटी मध्ये एखादी बाय पोझीशन घेतली तर त्या पोझिशनला संरक्षण म्हणून आपण त्या स्टॉक चा पुट ऑप्शन खरेदी करतो किंवा फ्युचर सेल करतो यालाच हेजिंग असे म्हटले जाते. हेजिंग म्हणजेच, आहे त्या पोझिशन च्या विरुद्ध पोझिशन घेऊन आपली रिस्क कमी करणे.

स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल म्हणजे काय?


स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल या ऑप्शन ट्रेडिंग च्या दोन लोकप्रिय स्ट्रॅटेजी आहेत.

स्ट्रॅडल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी - यामध्ये एखाद्या स्टॉक चा किंवा इंडेक्सचा असा कॉल आणि पुट ऑप्शन खरेदी केला जातो ज्याची स्ट्राईक प्राईज एकच आहे. या व्यतिरिक्त कॉल आणि पुट ची एक्सपायरी सुद्धा सारखीच असावी.हे कॉल आणि पुट दोन्ही एकाच वेळी बाय केले गेले पाहिजेत. स्ट्रॅडल करताना आपण एट द मनी(ATM) या पर्यायाचा विचार करतो.

उदाहरणार्थ, ABC कंपनीचा एक स्टॉक आहे ज्याची सध्या ची मार्केट प्राइज 560 रुपये आहे. मार्केट प्राइस च्या जवळची स्ट्राईक प्राईज सुद्धा 560 आहे तर मी 560 स्ट्राईक प्राईज वर एक कॉल आणि एक पुट खरेदी करेन. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कॉल आणि पुट आपण खरेदी करणार आहात त्याची स्ट्राईक प्राईज ही एकच असायला पाहिजे.

स्ट्रॅडल मध्ये आपण सारख्या स्ट्राईक प्राईज चा कॉल आणि पुट सेल सुद्धा करू शकता.

स्ट्रँगल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी - यामध्ये एखाद्या स्टॉक चा किंवा इंडेक्स चा असा कॉल आणि पुट ऑप्शन खरेदी केला जातो ज्याची स्ट्राईक प्राईज वेगवेगळी आहे. या स्ट्रॅटेजी साठी स्ट्राईक प्राईज निवडताना आपण आऊट ऑफ द मनी(OTM) या पर्यायाचा विचार करतो. पण या दोघांची एक्सपायरी ही सारखीच असायला हवी.

उदाहरणार्थ, XYZ कंपनीचा एक स्टॉक आहे ज्याची सध्याची मार्केट प्राइस 560 रुपये आहे. आता मला जर कॉल आणि पुट खरेदी करायचा असेल तर मी आऊट ऑफ द मनी म्हणजेच 610 स्ट्राइक प्राईस चा एक कॉल खरेदी करेन आणि 580 स्ट्राइक प्राईस चा एक पुट खरेदी करेन ज्याचा LTP हा जवळपास सारखा म्हणजेच 28 रुपये आहे. LTP मध्ये थोडाफार फरक चालू शकतो.

ओपन इंटरेस्ट म्हणजे काय?


फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंग ला एक झिरो सम गेम म्हटले जाते कारण यामध्ये जेवढी खरेदीदार असतात तेवढेच विक्रेते असतात म्हणून हे व्यवहार पूर्ण होतात. बरेच ट्रेडर्स ज्या दिवशी खरेदी करतील त्याच दिवशी विकतील असे नाही ते आपली पोझिशन भविष्यात कधीही होऊ शकतात पण जोपर्यंत ही पोझिशन ते विकत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडे असणाऱ्या लॉट ला ओपन इंटरेस्ट असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ, कालच्या दिवशी ABC कंपनीच्या फ्युचर मध्ये 1000 लॉट ची खरेदी झाली त्यापैकी 700 लोकांनी कालच प्रॉफिट बुक केले आणि आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. पण राहिलेल्या तीनशे लोकांना अजूनही असे वाटत आहे की ABC कंपनीचा स्टॉक येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी वर जाईल म्हणून त्यांनी आपली पोझिशन होल्ड करून ठेवली आहे. या अशा सर्व ओपन पोझिशनला ओपन इंटरेस्ट असे म्हटले जाते. कारण यामध्ये खरेदीदार अजून अशा कारणासाठी इंटरेस्टेड आहेत की त्यांना वाटत आहे मार्केट अजून वर जाईल आणि जास्त नफा कमावता येईल.

ओपन इंटरेस्ट फक्त डेरिव्हेटिव्हज मार्केटमध्ये म्हणजेच फ्यूचर आणि ऑप्शन मध्ये वापरले जाते. इक्विटी मध्ये ओपन इंटरेस्ट वापरला जात नाही.

आता ओपन इंटरेस्ट चा वापर करून मार्केट वर जाणार किंवा खाली जाणार याचा अंदाज कशाप्रकारे लावला जातो ते पाहूया.
ओपन इंटरेस्ट ची तुलना नेहमी किमतीच्या वाढीबरोबर किंवा किंमतीच्या कमी होण्या बरोबर केली जाते. उदाहरणार्थ,

1 . जर ABC कंपनीच्या ओपन इंटरेस्ट मध्ये वाढ झाली आणि त्याच बरोबर जर ABC कंपनीच्या किमतीमध्ये वाढ झाली याचा अर्थ ABC कंपनीमध्ये खरेदीदारांना जास्त रस आहे आणि त्यामुळे ABC कंपनीची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

2 . जर ABC कंपनीच्या ओपन इंटरेस्ट मध्ये घट झाली आणि त्याच बरोबर या कंपनीच्या किमतीमध्ये सुद्धा घट झाली याचा अर्थ जे विक्रेते विक्रीच्या बाजूनी होते त्यांचा आता विक्री मधील इंटरेस्ट कमी झालेला आहे आणि येथून पुढे मार्केटमध्ये खरेदीदार येऊन मार्केटला वर घेऊन जाऊ शकतात.

3 . जर ABC कंपनीच्या ओपन इंटरेस्ट मध्ये वाढ झाली पण स्टॉकच्या किमतीमध्ये घट झाली याचा अर्थ या स्टॉक मध्ये विक्रेत्यांना जास्त इंटरेस्ट आहे आणि येथून ते मार्केट खाली घेऊन जाऊ शकतात.

4. जर ABC कंपनीच्या ओपन इंटरेस्ट मध्ये घट झाली पण स्टॉकच्या किमतीमध्ये वाढ झाली याचा अर्थ खरेदीदारांना आता या स्टॉक मध्ये फारसा इंटरेस्ट राहिलेला नाही म्हणून येथून सेलर्स ची एन्ट्री होऊन ते मार्केट खाली घेऊन जाण्याची शक्यता आहे.

डिलिव्हरी वोल्युम म्हणजे काय?


फ्यूचर आणि ऑप्शन मार्केटमध्ये रोजच्या रोज खरेदी आणि विक्री होत असते. काही ट्रेडर्स आज घेतलेले ट्रेड आजच विकून टाकतात म्हणून त्याला इंट्राडे व्हॉल्युम असे म्हटले जाते. पण काही ट्रेडर्स आज घेतलेले ट्रेड येणाऱ्या काही दिवसांसाठी होल्ड करतात.

अशा बऱ्याच ट्रेडर्सने मिळून जर आपल्या पोझिशन होल्ड केल्या म्हणजेच त्यांनी इंट्राडे मध्ये घेतलेले ट्रेड दुसऱ्या दिवशी त्यांच्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा झाले तर अशा सर्व ट्रेडर्सचे एकत्रित वोल्युम काढले जाते त्याला डिलिव्हरी वोल्युम असे म्हणतात.

डिलिव्हरी वोल्युम नुसार मार्केट वर जाणार किंवा खाली जाणार याचा अंदाज लावला जातो. जेवढ्या जास्त लोकांनी बायची डिलिव्हरी घेतली आहे याचा अर्थ त्या सर्व जणांना असे वाटत आहे की मार्केट वर जाणार आहे आणि जेवढे जास्त लोकांनी सेलची डिलिव्हरी घेतले आहे त्या सर्वांना वाटत आहे की मार्केट खाली जाणार आहे.

यामध्ये काही पर्यायांचा विचार केला जातो.

1 . जर स्टॉकची किंमत वाढली आणि डिलिव्हरी वोल्युम सुद्धा वाढले याचा अर्थ बऱ्याच जणांनी बाय पोझिशन होल्ड केली आहे त्यामुळे मार्केट वर जाण्याची शक्यता जास्त असते.

2 . जर स्टॉक ची किंमत कमी झाले आणि डिलिव्हरी वोल्युम वाढले याचा अर्थ बरेच जणांनी सेल पोझिशन होल्ड केली आहे आणि मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे.

3 . जर स्टॉक ची किंमत वाढली आणि डिलिव्हरी वोल्युम कमी झाले याचा अर्थ खरेदीदारांना स्टॉक मध्ये फारसा इंटरेस्ट राहिलेला नाही आणि येथून स्टोक खाली येऊ शकतो.

4 . जर स्टॉक ची किंमत कमी झाली आणि डिलिव्हरी वोल्युम सुद्धा कमी झाले तर याचा अर्थ सेलर्स ना तो स्टॉक विकण्या मध्ये फारसा इंटरेस्ट राहिलेला नाही आणि ते आपली पोझिशन केव्हा हि विकू शकतात याचा अर्थ मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post