स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?
स्विंग म्हणजे झोक्या प्रमाणे पुढे किंवा मागे जाणे. ज्याप्रमाणे झोका पुढे आणि मागे जातो त्याच प्रमाणे शेअर मार्केट सुद्धा वर खाली होत असते. ज्यावेळी मार्केट खाली येते त्यावेळी आपल्याला चांगले फंडामेंटल असलेले शेअर्स स्वस्तात मिळतात असे शेअर आपण खरेदी करून ज्यावेळी मार्केट वर जाते त्यावेळी ते विकून चांगला नफा मिळवता येतो या प्रक्रियेलाच स्विंग ट्रेडिंग असे म्हटले जाते.
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग चे ढोबळमानाने दोन प्रकार पाडले जातात.
इंट्राडे ट्रेडिंग
डिलिव्हरी ट्रेडिंग
डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण आज घेतलेले स्टॉक एक किंवा जास्त दिवसांपर्यंत होल्ड करू शकता आणि आपल्याला ते हवे तेव्हा विकू शकता.
स्विंग ट्रेडिंग हा डिलीवरी ट्रेडिंगचा एक प्रकार आहे. यामध्ये ज्या स्टॉक चे फंडामेंटल चांगले आहे असेच स्टॉक निवडले जातात आणि टेक्निकल चार्ट पाहून त्यामध्ये एंट्री घेतली जाते.
स्विंग ट्रेडिंग मध्ये असेच स्टॉक टारगेट केले जातात ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहे पण सध्या ते काही कारणास्तव खाली आलेले आहेत. फंडामेंटल चांगले असल्यामुळे ते स्टॉक भविष्यात नक्कीच वर जातात.
शेअर खरेदी केल्यानंतर त्याचे एक टार्गेट निश्चित केले जाते आणि ते टारगेट मिळाल्यावर तो शेअर विकला जातो. वेगवेगळ्या ट्रेडर प्रमाणे वेगवेगळे टार्गेट सेट केले जातात. कोणी 5% चे टारगेट सेट करतो तर कोणी 10% चे टार्गेट सेट करतो तर कोणी टेक्निकल चार्ट पाहून आधीच्या स्विंग हाय चे टारगेट सेट करतो. प्रॉफिट बुक करण्याचा कालावधी दोन दिवसांपासून ते तीन महिन्यांत पर्यंतचा असू शकतो.
उदाहरण द्यायचे झाल्यास, असे समजू या रिलायन्स आणि एबीसी नावाच्या दोन कंपन्या आहेत. एबीसी नावाची कंपनी तुलनेने नवीन आहे पण सध्या ती मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत आहे. तर रिलायन्स कंपनी काही कारणास्तव खाली आलेली आहे. अशावेळी आपण कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य द्याल?
जर मार्केटमध्ये एखादा नवीन ट्रेडर असेल तर तो कदाचित एबीसी नावाच्या कंपनीला प्राधान्य देईल. पण अनुभवी ट्रेडर्स हे नेहमी रिलायन्स ला प्राधान्य देतील कारण त्यांना माहित आहे रिलायन्स कंपनीचे फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहेत आणि सध्या जरी कंपनी कंपनीचा शेअर खाली आलेला असला तरी भविष्यात तो नक्कीच वर जाणार आहे. आणि हा शेअर खाली आलेला आहे म्हणजेच तो स्वस्तात मिळत आहे आणि खरेदीची ही चांगली संधी आहे.
मार्केट मध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे फंडामेंटलि स्ट्रॉंग स्टॉक निवडायचा कसा?
असे स्टॉक निवडण्याचे बरेच प्रकार आहेत पण त्यातील काही महत्त्वाचे आणि सारखेच मुद्दे आपण विचारात घ्यायला हवेत.
1. कंपनी वर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसावे किंवा असले तरी ते फार थोडे असावे.
2. कंपनीच्या प्रगतीचा आलेख हा नेहमीच चढता असावा.
3. कंपनीला मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने नफा झालेला असावा.
4. कंपनीचा EPS आणि PE रेशो हा त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत जास्त असावा.
वरील सर्व माहिती हि आपल्या फंडामेंटल एनालिसिस विभागात दिलेली आहे.
स्विंग ट्रेडिंग मध्ये फंडामेंटल अनालिसिस च्या जोडीला टेक्निकल ऍनालिसिस ची सुद्धा साथ दिली जाते.
ज्यावेळी एखाद्या फंडामेंटलि स्ट्रॉंग कंपनीचा स्टॉक काही कारणास्तव खाली येतो त्यावेळी टेक्निकल ऍनालिसिस नुसार तो एखाद्या सपोर्ट लेवल ला येण्यापर्यंत वाट पाहिली जाते.
जर असा स्टॉक एखाद्या स्ट्रॉंग सपोर्ट लेव्हल ला आला तर त्यामध्ये पुन्हा खरेदी चालू होते. मोठ-मोठे इन्वेस्टर अशा संधीची वाट पाहत असतात आणि त्यांनी आपली खरेदीचीऑर्डर आधीच सपोर्ट लेवल ला लावून ठेवलेली असते त्यामुळे स्टॉक ज्यावेळेस सपोर्ट रेषेला स्पर्श करतो तिथून तो वर जायला चालू होतो.
अशावेळी काही बुलिश कॅन्डल स्टिक पॅटर्न सुद्धा तयार होतात जसे की हॅमर, पिन बार, मॉर्निंग स्टार, दोजी, बुलिश एंगलफिंग इत्यादी. त्यानुसार टेक्निकल ऍनालिसिस प्रमाणे एक एन्ट्री पॉईंट निश्चित करून स्टॉक मध्ये खरेदी केली जाते.
वरील सर्व पॅटर्न हे आपल्या टेक्निकल ऍनालिसिस विभागात सविस्तरपणे वर्णन केलेले आहेत.
स्विंग ट्रेडिंग चे फायदे आणि तोटे कोणते?
स्विंग ट्रेडिंग चे फायदे-
1. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जे टारगेट सेट केले जाते ते त्या दिवशी मिळेलच याचा काही भरवसा नसतो कारण पण आपल्याला प्रॉफिट झाला काय किंवा लॉस झाला काय, इंट्राडे मध्ये ठरलेल्या वेळेत स्टॉक विकावा लागतो. पण स्विंग ट्रेडिंग मध्ये असे नाही. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण स्टॉक चे पूर्ण पैसे भरून डिलिव्हरी घेतलेली असल्यामुळे तो स्टॉक ठरावीक वेळेत विकण्याचे बंधन नसते आणि आपण आपले टार्गेट पूर्ण होईपर्यंत तो स्टॉक होल्ड करू शकता म्हणजे त्यामध्ये आपले टारगेट मिळण्याची शक्यता इंट्राडे च्या तुलनेत किती तरी पटींनी अधिक असते.
2. इंट्राडे मध्ये आपली एन्ट्री ऑर्डर एक्झिक्युट झाल्यानंतर आपल्याला त्या स्टॉक वर कायम नजर ठेवावी लागते. जर आपण घेतलेला स्टॉक आपल्या विरुद्ध दिशेने जाऊ लागला तर आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यामुळे आपण टेन्शन मध्ये येतो. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला स्टॉक वर नजर ठेवावी लागत नाही. आपली बाय ऑर्डर एक्झिक्युट झाल्यानंतर आपण फक्त टारगेट साठी वाट पाहता जरी मार्केट खाली आले तरी जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला लॉस होत नाही अशावेळी आपण ऍव्हरेजिंग करून तो स्टॉक होल्ड करू शकता आणि आपल्या टार्गेट लाच विकू शकता.
3. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण फक्त नसे स्टॉक निवडतो ज्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत. असे स्टॉक काही कालावधीसाठी जरी खाली आले तरी नंतर ते निश्चितच वर जातात. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण स्टॉक ची डिलिव्हरी ही पूर्ण रक्कम देऊन घेतलेली असते त्यामुळे जोपर्यंत आपले टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ते स्टॉक होल्ड करू शकता म्हणूनच स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते.
4. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला बुल रन चा पुरेपूर फायदा घेता येतो. उदाहरणार्थ, जर एखादा स्टॉक बुलिश असेल तर तो बरेच दिवसांपर्यंत वर जाण्याची शक्यता असते अशावेळी आपण बुल रन चा पुरेपूर फायदा घेऊ शकता. जर एखाद्या स्टॉक मध्ये चांगली बातमी आली तरी तो स्टॉक बरेच दिवस अपट्रेन्ड मध्ये राहतो आणि जर तो स्टॉक आपण घेऊन ठेवलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला जबरदस्त नफा होण्याची शक्यता असते.
5. जर स्टॉक मार्केटमध्ये आपण नवीन असाल तर स्विंग ट्रेडिंग आपल्यासाठी खूपच फायद्याचे ठरते कारण यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग च्या तुलनेत रिस्क जवळपास नसते किंवा खूप कमी असते. त्यामुळे जर आपण मार्केट मध्ये नवीन असाल तर आपण स्विंग ट्रेडिंग पासून सुरुवात करण्याचा सल्ला दिला जातो.
6. जर आपण बँकेत पैसे ठेवले किंवा त्या पैशांची एफडी केली तर आपल्याला वर्षाला जास्तीत जास्त सहा ते सात टक्के एवढाच व्याज दर मिळतो पण योग्य स्टॉक निवडून जर त्यात स्विंग ट्रेडिंग केले तर वर्षाला जवळपास 15 ते 20 टक्क्यांपर्यंत आपल्याला परतावा मिळू शकतो म्हणूनच स्विंग ट्रेडिंग हे फायद्याचे ठरते.
स्विंग ट्रेडिंग चे तोटे-
1. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण खरेदी केलेले शेअर्स बऱ्याच कालावधीसाठी वर जाण्याऐवजी एकाच ठिकाणी राहू शकतात त्यामुळे आपले पैसे अमर्यादित कालावधीसाठी गुंतुन राहण्याची शक्यता असते.
2. स्विंग ट्रेडिंग मध्ये संयमाला खूप महत्त्व आहे. बऱ्याच वेळा आपण खरेदी केलेले शेअर्स हे लगेच लॉस मध्ये दिसू लागतात अशावेळी उतावळेपणाने मार्केटमधून बाहेर पडल्यास आपले नुकसान होण्याची शक्यता असते.
3. स्विंग ट्रेडिंग मध्ये स्टॉक निवडणे बाबतीत जर आपला अंदाज चुकला तर आपल्याला तो शेअर बऱ्याच जास्त कालावधीसाठी होल्ड करावा लागतो त्यामुळे कमी अवधीत प्रॉफिट मिळण्याची शक्यता दुरावते.
4. फंडामेंटल अनालिसिस हा स्विंग ट्रेडिंग चा पाया आहे. जर फक्त टेक्निकल ऍनालिसिस करून स्विंग ट्रेडिंग मध्ये एन्ट्री केली तर आपले निर्णय चुकून आपले पैसे व मर्यादित कालावधीसाठी अडकून पडू शकतात त्यामुळे नाईलाजाने आपल्याला आपली पोझिशन लॉस मध्ये एक्झिट करावी लागते.
स्विंग ट्रेडिंग साठी स्टॉक कसे निवडावेत?
स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला असे स्टॉक निवडावे लागतात ज्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहे म्हणजेच स्टॉक जरी खाली आले तरी ते जास्त अवधीसाठी खाली राहत नाहीत कारण यामध्ये बरेच मोठे इन्वेस्टर, म्युच्युअल फंड्स, डोमेस्टिक आणि फोरेन इन्वेस्टर यांचा पैसा गुंतलेला असतो आणि हे लोक जोपर्यंत पैसा काढून घेत नाहीत तोपर्यंत तो स्टॉक खाली येण्याची शक्यता नसते.
फंडामेंटलि स्ट्रॉंग स्टॉक शोधण्यासाठी आपण खालील वेबसाईटचा वापर करू शकता.
https://www.screener.in/
या वेबसाईट मध्ये आपल्याला फंडामेंटल अनालिसिस शी संबंधित सर्व घटकांची माहिती मिळते.
1. सर्वात प्रथम https://www.screener.in/ या वेबसाईटवर जाऊन आपल्याला स्टॉक चे नाव टाईप करावे लागते.
2. आता आपल्या समोर या स्टॉक ची फंडामेंटल अनालिसिस संबंधित सर्व माहिती आलेली आहे ज्यामध्ये आपण PE रेशो, फेस व्हॅल्यू, मार्केट कॅप इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी पाहू शकता.
3. थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कंपनीच्या सध्याच्या कामगिरीचा आढावा खाली दाखविल्याप्रमाणे पाहायला मिळतो. यामध्ये कंपनीची कामगिरी मागील काही वर्षांच्या तुलनेत निराशाजनक राहिली आहे.
4. आणखी खाली स्क्रोल केल्यानंतर “Peer Comparison” मध्ये आपल्याला रिलायन्सच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांची माहिती पाहायला मिळते त्यानुसार कोणत्या प्रतिस्पर्धी कंपनीने त्या सेक्टर मध्ये रिलायन्स पेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे हे आपल्याला समजते.
5. त्यानंतर “Quarterly Results” या विभागात कंपनी च्या त्रैमासिक कामगिरीचा आढावा घेता येतो. त्यामध्ये कंपनीच्या मागच्या कामगिरीची आणि सध्याच्या कामगिरीची तुलना केली जाते. त्यासाठी आपण "Net Profit"नावाचा घटक पाहू शकता.
यामध्ये “Net Profit’ आणि “EPS in Rs” हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत. कंपनीचे नेट प्रॉफिट आणि ईपीएस हा मागील काही वर्षांच्या तुलनेत जर जास्त असेल तर त्यास स्टॉक चे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत असे मानले जाते आणि असेच स्टॉक आपण स्विंग ट्रेडिंग करिता निवडले पाहिजेत.
वरील उदाहरणात फक्त स्क्रीनर चा वापर करून चांगले फंडामेंटल असलेले स्टॉक कसे निवडावे हे दिलेले आहे.यामध्ये कोणताही स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही.
स्विंग ट्रेडिंग मध्ये टेक्निकल ऍनालिसिस कसे वापरतात?
जर आपण फंडामेंटलि स्ट्रॉंग स्टॉक सिलेक्ट केले असतील तर इंट्री घेण्यासाठी टेक्निकल ऍनालिसिस चा वापर केला जातो.
स्ट्रॉंग फंडामेंटल असलेले स्टॉक प्रॉफिट बुकिंग मुळे किंवा काही कारणास्तव खाली येतात पण ते फार काळ खाली राहत नाहीत कारण बरेच ट्रेडर्स ते खाली येण्याची म्हणजेच स्वस्त होण्याची वाट पाहत असतात.
टेक्निकल ऍनालिसिस प्रमाणे जर ते स्टॉक एका स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आले तर त्यामध्ये पुन्हा खरेदी चालू होते आणि तेथून ते स्टॉक पुन्हा वर जातात.
टेक्निकल ऍनालिसिस मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढण्याचे बरेच प्रकार आहेत यामध्ये चार्ट वर आडव्या रेषा मारून सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढला जातो. सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे असे पॉईंट जेथून मार्केट च्या ट्रेंडमध्ये बदल झालेला आहे.
या उदाहरणामध्ये आपण 200 EMA चा वापर सपोर्टसाठी करणार आहोत. 200 EMA हा एक स्ट्रॉंग सपोर्ट चे काम करतो. सामान्यपणे ज्यावेळी एखादा स्टॉक 200 EMA च्यावर असतो तेव्हा तो बुलिश समजला जातो आणि जर तो स्टॉक 200 EMA च्या खाली असेल तर तो बियरिष समजला जातो.
बरेच ट्रेडर्स आणि इन्वेस्टर हे स्टॉक 200 EMA पर्यंत येण्याची वाट पाहत असतात कारण तेथून स्टॉक वर जाण्याची शक्यता असते आणि आपण एका चांगल्या किमतीला स्टॉक खरेदी करू शकता.
यामध्ये आपल्याला फक्त फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या स्टॉकचे निरीक्षण करायचे आहे आणि ज्यावेळी तो स्टॉक 200 EMA च्या जवळ येतो तेव्हा एखादा बुलिश कॅन्डल स्टिक पॅटर्न शोधायचा आहे जेथून तो स्टॉक पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे.
खालील उदाहरणांमध्ये, बजाज फायनान्स चा स्टॉक दिलेला आहे. या स्टॉक चे फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहे आणि तो 200 EMA च्या जवळ आलेला आहे. 200 EMA च्या जवळ या स्टॉक ने बुलिश हॅमर नावाचा कॅन्डल स्टिक पॅटर्न तयार केला आहे आणि तेथून तो स्टॉक पुन्हा वर गेला आहे.
अशाप्रकारे फक्त 200 EMA चा वापर करून काही कॅण्डल स्टिक पॅटर्न च्या मदतीने आपण योग्यवेळी स्टॉक मध्ये एन्ट्री घेऊन चांगला नफा कमवू शकता.
स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग मध्ये काय फरक आहे?
बऱ्याच जणांना पोझिशनल ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग हे सारखेच आहे असे वाटते. पण या मध्ये एक महत्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे वेळेचा.
स्विंग ट्रेडिंग मध्ये शेअर्स हे काही दिवसांसाठी होल्ड केले जातात तर पोझिशनल ट्रेडिंग मध्ये शेअर्स काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी होल्ड केले जातात त्यामुळे पोझिशनल ट्रेडिंग हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट चा एक प्रकार आहे.
पोझिशनल ट्रेडिंग मध्ये स्टॉक सिलेक्शन, इंट्री आणि एक्झिट हे सर्व स्विंग ट्रेडिंग सारखेच असते.
ज्या ट्रेडर्स कडे स्टॉक चे एनालिसिस करण्यासाठी जास्त वेळ नसतो किंवा ज्या ट्रेडर्स ला जास्त कालावधीसाठी स्टॉक होल्ड करायचे आहेत असे ट्रेडर्स हे पोझिशनल ट्रेडिंग करतात.
जेवढ्या जास्त कालावधीसाठी स्टॉक होल्ड केला जातो तेवढाच जास्त नफा होण्याची शक्यता असते. पोझिशनल ट्रेडिंग मध्ये स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग च्या तुलनेत खूपच कमी रिस्क असते.
Post a Comment