.

शेअर मार्केट ची संपूर्ण माहिती मराठीत | Share market information in marathi

शेअर म्हणजे काय?

Stock Market in Marathi

कुठलाही व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि हे भांडवल विविध मार्गांनी उभे केले जाते. काही कंपन्या या बँकांकडून कर्ज घेतात तर काही कंपन्या आपली हिस्सेदारी शेअर्सच्या स्वरूपात विकून लोकांकडून पैसे गोळा करतात.


उदाहरणार्थ एबीसी नावाची एक मोबाईल बनवणारी कंपनी आहे. या कंपनीकडे सुरुवातीला 10 कोटी रुपये आहेत. एवढ्या भांडवलामध्ये कंपनी महिन्याला फक्त 1000 मोबाईल बनवू शकते.

जर एबीसी कंपनीला दोन हजार मोबाईल बनवण्याची ऑर्डर मिळाली तर कंपनीला आणखी दहा कोटी भांडवलाची गरज पडेल. जर कंपनीने दहा कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले तर कंपनीला त्या पैशांवर व्याज द्यावे लागते.

हे टाळण्यासाठी कंपनीकडे अजून एक पर्याय आहे तो म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करणे आणि त्या बदल्यात त्यांना आपल्या कंपनीची थोडीशी हिस्सेदारी देणे त्यामुळे कंपनीची भांडवलाची गरज तर पूर्ण होईलच शिवाय कंपनीला या रकमेवर अतिरिक्त व्याज सुद्धा द्यावे लागणार नाही. जर कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्स ची किंमत वाढते आणि ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत त्यांना सुद्धा फायदा होतो.

जसे आपण वरील उदाहरणांमध्ये पाहिले की 2000 मोबाईलची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला अतिरिक्त दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी कंपनी आपल्या समभागांचे समान भाग करते आणि ते लोकांना विकते. जर कंपनीने आपल्या एका समभागाची किंमत शंभर रुपये
ठेवली तर कंपनीची दहा कोटी रुपयांची गरज भागविण्यासाठी दहा लाख लोकांनी कंपनीचा एक शेअर खरेदी केला पाहिजे आणि ते सहज शक्य होते म्हणून भांडवल उभारण्यासाठी याहून दुसरा उत्तम पर्याय नाही.

शेअर मार्केट चे प्रकार किती आहेत?


Type of Share market in Marathi


शेअर मार्केटचे प्रमुख्याने दोन प्रकार आहेत.

1.प्रायमरी मार्केट(Primary Market)

 2.सेकंडरी मार्केट (Secondary Market)

जर एखाद्या कंपनीने आपला नवीन बिझनेस चालू केलेला असेल आणि त्या कंपनीने जर आपले शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले तर ते सर्वात प्रथम प्रायमरी मार्केटमध्ये उपलब्ध होतात. जे लोक प्रायमरी मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स खरेदी करतात त्यांच्याकडून कंपनीला फंड प्राप्त होतो आणि त्या बदल्यात कंपनी त्यांना काही प्रमाणात आपली भागीदारी देते. प्रायमरी मार्केटमध्ये इन्वेस्टर जो पैसा गुंतवतात तो थेट कंपनीकडे जातो. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज नसते.

प्रायमरी मार्केटमध्ये कंपन्या विविध प्रकारे भांडवल गोळ्या करतात त्यातील काही मुख्य प्रकार खालील प्रमाणे.

1.पब्लिक इशू (Public Issue) - याला आयपीओ असेदेखील म्हटले जाते. ज्यावेळी कुठलीही कंपनी लोकांना सर्वात प्रथम आपले शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देते त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO)असे म्हटले जाते.

2.प्रायव्हेट प्लेसमेंट(Private Placement) - या प्रकारात कंपनी काही खास इन्वेस्टरलाच आपले समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून देते. यामध्ये म्युच्युअल फंड, बँका, इन्शुरन्स कंपन्या, इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर यांचा समावेश होतो.

3.राईट इशू (Right Issue) - या प्रकारात कंपनी आपल्या आधीच्या समभाग धारकांनाच शेअर्स विकून भांडवल उभे करते.

प्रायमरी मार्केटमध्ये इन्वेस्टर शेअर्सची फक्त खरेदी करू शकतात पण ते त्यांना विकता येत नाहीत. त्यांना जर ते शेअर्स विकायचे असतील तर त्यांना ते सेकंडरी मार्केटमध्ये येण्याची वाट पाहावी लागते.

प्रायमरी मार्केट ची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तो शेअर सेकंडरी मार्केटमध्ये येतो म्हणजेच तो आपण NSE किंवा BSE लिस्टमध्ये पाहू शकतो. प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स सर्वांनाच खरेदी करता येत नाहीत पण सेकंडरी मार्केट मध्ये आल्यानंतर कोणीही तो शेअर्स आपल्या ब्रोकर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतो.

स्टॉक मार्केट एक सेकंडरी मार्केट आहे ज्यामध्ये आपण आयपीओ मध्ये खरेदी केलेले शेअर्स विकू शकतो किंवा दुसऱ्या समभाग धारकाकडून आपण ते खरेदी करू शकतो म्हणजेच सेकंडरी मार्केट हा एक शेअर चा बाजार आहे जिथे शेअरची खरेदी आणि विक्री चालते.

स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?

Stock exchange in marathi


स्टॉक एक्सचेंज म्हणजे अशी जागा जी स्टॉक खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी एक मध्यस्थाची भूमिका बजावते. स्टॉक एक्सचेंज हे एक सेकंडरी मार्केट आहे यामार्फत आपण शेअर खरेदी किंवा विक्री करू शकता.

स्टॉक एक्सचेंज मार्फत आपण एखाद्या इन्वेस्टर कडून शेअर खरेदी करू शकता किंवा एखाद्या इन्वेस्टर ला शेअर विकू शकता यामध्ये त्या कंपनीचा कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही कारण कंपनीने आपले शेअर्स प्रायमरी मार्केटमध्ये आधिच विकलेले असतात त्यानंतर फक्त खरेदी करणारे लोक आणि विक्री करणारे लोक यांच्यातच स्टॉक ची देवाणघेवाण होते.

NSE आणि BSE म्हणजे काय?

NSE and BSE in Marathi


NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange).

NSE आणि BSE हे भारतातील दोन सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत याव्यतिरिक्त सुद्धा आणखी काही स्टॉक एक्सचेंज आहेत जसे की कलकत्ता स्टॉक एक्सचेंज (CSE) पण ते जास्त लोकप्रिय नाहीत.

भारतामध्ये NSE आणि BSE मिळून सतरा स्टॉक एक्सचेंज आहेत.

BSE ची स्थापना 1875 रोजी झाली आणि हे जगातील बाराव्या नंबरचे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. दलाल स्ट्रीट मुंबई येथे असणाऱ्या या स्टॉक एक्सचेंज वर 5500 पेक्षा जास्त कंपन्या रजिस्टर आहेत.

NSE ची स्थापना 1992 ला झाली आणि हे जगातील दहाव्या नंबरचे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.NSE चे हेड ऑफिस बांद्रा, मुंबई येथे आहे.

थोडक्यात काय तर NSE आणि BSE हे दोन असे बाजार आहेत जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री चालते.

आपण दोन्हीपैकी कोणत्याही स्टॉक एक्सचेंज वर स्टॉक ची खरेदी किंवा विक्री करू शकता किंवा NSE वर घेतलेले स्टॉक BSE वर सुद्धा विकू शकता याला Arbitrage Trading असे म्हटले जाते.

शेअर्सच्या किंमती वाढण्यामागे किंवा कमी होण्यामागे कोण कोणती कारणे असतात?

Complete stock market in Marathi


शेअरच्या किमती या सप्लाय आणि डिमांड यानुसार कमी जास्त होत असतात. सप्लाय म्हणजे पुरवठा आणि डिमांड म्हणजे मागणी.

जर उदाहरण द्यायचे झाले तर आपण सोन्याची उदाहरण घेऊ. दसरा दिवाळी सारख्या सणांना किंवा लग्नसराईमध्ये सोन्याचे भाव वाढतात कारण या दिवसांमध्ये सोन्याला मागणी जास्त असते तसेच शेअर मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पडझड झाली तरी सोन्याचे भाव वाढतात कारण लोक गुंतवणुकीसाठी इतर पर्याय शोधू लागतात आणि सोन्यामधील गुंतवणूक हा पारंपारिक गुंतवणुकीचा प्रकार असल्याने सोन्याची मागणी वाढते म्हणून मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती उत्पन्न होते म्हणून सोन्याचे भाव वाढतात.

तसेच ज्या वेळी लोकांना गुंतवणुकीचे इतर पर्याय उपलब्ध असतात किंवा स्टॉक मार्केटमध्ये तेजी असते किंवा कोणताही सण किंवा लग्नसराई नसते तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात कारण मागणी कमी होते.

स्टॉकचे सुद्धा असेच आहे. जर एखादी कंपनी चांगला नफा कमवत असेल तर त्या कंपनीच्या शेअर्स ला मागणी वाढते म्हणजेच विकणारे कमी आणि घेणारे जास्त अशी स्थिती उत्पन्न होते म्हणून घेणारे मिळेल त्या भावात तो स्टॉक खरेदी करतात आणि म्हणून त्या स्टॉक ची किंमत वाढू लागते.

याउलट कंपनी जर तोट्यात गेली तर विकणार्‍यांची संख्या वाढते आणि खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होते म्हणून स्टॉक ची किंमत कमी होऊ लागते.

SEBI म्हणजे काय?

What is SEBI?


साधारणतः 1970 नंतर भारतामध्ये स्टॉक मधील गुंतवणूक वाढीस लागली पण त्याचबरोबर यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे त्यामध्ये भ्रष्टाचार वाढीस लागला आणि अवैध मार्गाने स्टॉक च्या किमती वाढवून नफे खोरी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढू लागले. काही धनदांडगे लोक एकत्र येऊन सामान्य गुंतवणूकदारांना लुटू लागले. त्याचप्रमाणे पैसे घेऊन सुद्धा स्टॉक ची डिलिव्हरी उशिरा मिळू लागली. स्टॉक एक्सचेंज चे सर्व नियम काही लोकांकडून धाब्यावर बसविले जात होते.

या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सामान्य गुंतवणूकदारांचा स्टॉक मार्केट वरील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आणि त्यातूनच 1988 मध्ये जन्माला आली सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI.

भारतामध्ये NSE आणि BSE सोडून आणखी 15 स्टॉक एक्सचेंज आहेत. या सर्व एक्सचेंज चा कारभार सेबीने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे चालतो. तसेच सर्व स्टॉक ब्रोकर ना SEBI ने आखुन दिलेल्या या नियमांचे पालन करावे लागते.

जर एखादा ब्रोकर या नियमांचे पालन करण्यास असमर्थ ठरला तर त्याचा परवाना रद्द करून त्या ब्रोकरला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जाते. जर आपल्याला आपल्या ब्रोकर बद्दल काही तक्रार असेल तर आपण सेबीच्या वेबसाईट वर ऑनलाइन तक्रार करू शकता त्यावर SEBI कडून निश्चितच ऍक्शन घेतली जाते.

कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय?

Commodity  in Marathi


शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडिंग च्या व्यतिरिक्त कानावर पडणारा आणखी एक शब्द म्हणजे कमोडिटी ट्रेडिंग.

कमोडिटीज म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू ज्यांची ट्रेडिंग कमोडिटी ट्रेडिंगमध्ये केली जाते. यामध्ये काही शेतीमाला विषयक वस्तू असतात ज्यांना ॲग्री कमोडिटी असे म्हटले जाते आणि बाकीच्या वस्तूंना नॉन ॲग्री कमोडिटी म्हटले जाते.कमोडिटी मार्केटमध्ये प्रामुख्याने चार प्रकारच्या वस्तूंचे ट्रेडिंग केले जाते.

अग्री कमोडिटीज (Agri Commodities) - कापूस, इलायची, काळी मिरी, सोयाबीन, साखर, एरंड, मका, बार्ली इत्यादी.

बेस मेटल्स - झिंक, कोपर, ॲल्युमिनियम, लेड, निकेल.

मौल्यवान धातू - सोने, चांदी

एनर्जी - क्रूड ऑइल, नॅचरल गॅस

ज्याप्रमाणे स्टॉक एक्सचेंज वर स्टॉक ची खरेदी आणि विक्री होते त्याचप्रमाणे कमोडीटी एक्सचेंज वर कमोडिटी ची खरेदी आणि विक्री होते. कमोडिटी ट्रेडिंग कॉन्ट्रॅक्ट हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतात पण त्यांचा अवधी स्टॉक च्या फ्युचर कॉन्ट्रॅक्ट पेक्षा अधिक असतो. कमोडिटी ट्रेडिंग मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर केली जाते.

ब्रोकर, ट्रेडिंग अकाउंट आणि डिमॅट अकाउंट म्हणजे काय?

Broker trading and demat account in Marathi


प्रायमरी किंवा सेकंडरी मार्केटमध्ये आपण स्टॉक डायरेक्ट खरेदी करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला गरज पडते ती एका मध्यस्थाची. जर आपल्याला स्टॉक ची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर आपली खरेदी किंवा विक्री ची ऑर्डर एक्सचेंज पर्यंत घेऊन जाणारा मध्यस्थ म्हणजेच ब्रोकर. स्टॉक ब्रोकर हा वैयक्तिक असू शकतो किंवा वा एखादी कंपनी असू शकते फक्त ती स्टॉक एक्सचेंज वर रजिस्टर असायला हवी.

स्टॉक ब्रोकर गुंतवणूकदारांच्या खरेदी किंवा विक्री च्या ऑर्डर्स स्टॉक एक्सचेंज पर्यंत पोहोचविण्याचे काम करतात आणि त्या बदल्यात ते काही रक्कम घेतात यालाच ब्रोकरेज असं म्हटलं जातं. स्टॉक मार्केट मधून स्टॉक खरेदी करण्यासाठी आपल्याला स्टॉक ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाऊंट उघडावे लागते. त्यामार्फत आपण कोणतेही शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकता. आता हे काम नेमके कसे चालते ते पाहूया.

जर आपल्याला एबीसी कंपनीचे 100 शेअर्स खरेदी करायचे असतील तर आपण आपली ऑर्डर आपल्या ब्रोकर मार्फत स्टॉक एक्सचेंज पर्यंत पोहोचवता. अशावेळी ब्रोकर अशा एखाद्या व्यक्तीचा शोध घेत असतो ज्याला एबीसी कंपनीचे 100 शेअर्स विकायचे असतील.ज्या किंमतीला आपल्याला शेअर्स खरेदी करायचे असतील आणि ज्या किमतीला त्याला शेअर्स विकायचे असतील या दोन्ही किमती जर जुळून आल्या तर आपला ब्रोकर आपली खरेदीची ऑर्डर प्रोसेस करतो आणि ते स्टॉक आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये येतात नंतर ते आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जातात आणि आपल्या ट्रेडिंग अकाउंट मधून त्या शेअरची किंमत, ब्रोकरेज आणि गव्हर्मेंट टॅक्स वजा केले जातात.

ट्रेडिंग अकाउंट> - ज्यावेळी आपण कोणत्याही ब्रोकरकडे अकाउंट ओपन करता त्यावेळी आपल्याला ट्रेडिंग आणि डिमॅट असे दोन अकाउंट ओपन करावे लागतात. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे ज्या अकाउंट मधून आपण शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकता. जर आपण इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर आपल्याला फक्त ट्रेडिंग अकाउंट ची गरज असते कारण इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आज खरेदी केलेले शेअर्स आजच विकावे लागतात त्यामुळे जर आपण इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर आपल्याला डिमॅट अकाउंट ची गरज नसते.

डिमॅट अकाउंट> - जर आपण खरेदी केलेले शेअर्स आपल्याला काही दिवसांसाठी जर ठेवायचे असतील तर ते ठेवण्यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट ची गरज पडते. डिमॅट अकाउंट हे आपल्या बँक अकाउंट सारखेच असते. जसे आपण बँकेत भरलेले पैसे आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होतात तसेच आपण काही दिवसांसाठी खरेदी केलेले शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात. जर आपल्याकडे डिमॅट अकाउंट नसेल तर आपण हे शेअर्स साठवून ठेवू शकणार नाही.

भारतामध्ये असे बरेच ब्रोकर्सआहेत ज्यांच्याकडे आपण आपले ट्रेडिंग किंवा डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. ब्रोकर्स चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

फुल सर्विस ब्रोकर - या प्रकारात ज्या बँकेत आपले अकाऊंट आहे तीच बँक आपल्याला ट्रेडिंग आणि डिमॅट ची सुविधा पुरवते याला थ्री इन वन अकाउंट सुद्धा म्हटले जाते. फुल सर्विस ब्रोकर ची फी (Brokerage) डिस्काउंट ब्रोकर पेक्षा जास्त असते पण त्यांची विश्वासार्हता सुद्धा डिस्काउंट ब्रोकर च्या तुलनेत अधिक असते. उदाहरणार्थ, ICICI Direct, Kotak, HDFC, SBI इत्यादी.

डिस्काउंट ब्रोकर - डिस्काउंट ब्रोकर आपल्याला फक्त ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट सुविधा पुरवितात त्याबदल्यात ते आपल्याकडून खूपच कमी रक्कम मोबदला म्हणून घेतात त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारां ची पहिली पसंती ही डिस्काउंट ब्रोकरलाच असते. उदाहरणार्थ Zerodha, Upstox, Fyres, Alice blue इत्यादी.

ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आपण आपल्या ब्रोकरला त्यांच्या वेबसाईटवरून संपर्क करू शकता. त्यासंदर्भात त्यांच्याकडून आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपनिंग साठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट किंवा तीन महिन्यांच्या पगाराची स्लिप यांची आवश्यकता असते. आज-काल अकाउंट ओपनिंग ची सर्व प्रोसेस ऑनलाइन केली जाते.

बऱ्याच वेळा ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट हे मोफत उघडले जाते किंवा काही ब्रोकर्स हे तीनशे रुपये पर्यंत फीस सुद्धा घेतात. अकाउंट उघडल्यानंतर आपल्याला त्याची वार्षिक मेंटेनन्स फी (AMC) सुद्धा द्यावी लागते. ही रक्कम तीनशे रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत असू शकते.

सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय?

What is Sensex and Nifty


बऱ्याच वेळा आपण ऐकले असेल की सेन्सेक्स आणि सेन्सेक्स निफ्टी यांच्यामध्ये वाढ झाली किंवा घट झाली. पण हे सेंसेक्स निफ्टी आहे तरी काय?

मागच्या लेखांमध्ये आपण पाहिले की एक्सचेंज म्हणजे असे ठिकाण जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री होते.भारतामध्ये जे प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत ते म्हणजे NSE आणि BSE.

स्टॉक मार्केट हे प्रगती कडे जात आहे की अधोगतीकडे याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक कंपनीचे रेकॉर्ड ठेवणे अशक्य आहे. म्हणूनच काही ठराविक कंपन्यांचा एक ग्रुप बनवला जातो आणि त्याच कंपन्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. या ग्रुप मध्ये प्रत्येक सेक्टरमधील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश केला जातो. या कंपन्यांचा अवरेज म्हणजेच इंडेक्स.

BSE इंडेक्स ला सेन्सेक्स असे म्हटले जाते तर NSE इंडेक्स ला निफ्टी असे म्हटले जाते.

सेन्सेक्समध्ये पाच हजार पाचशे कंपन्यांपैकी फक्त तीस कंपन्यांचा सामावेश केलेला आहे तर निफ्टी मध्ये 50 कंपन्यांचा समावेश केलेला आहे.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी?

Stock Market investment in Marathi


गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी बरेच जण हे पारंपारिक गुंतवणूक प्रकारांवर भर देतात जसे की रिअल इस्टेट, सोने चांदी किंवा मौल्यवान धातू मधील गुंतवणूक, बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये रक्कम गुंतवणे इत्यादी.

रिअल इस्टेट आणि सोन्यामधील गुंतवणूक वाढण्याची शक्यता जास्त असते पण त्याला वेळ सुद्धा तेवढाच द्यावा लागतो. जर आपण आपल्याकडील रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवली तर रक्कम सुरक्षित राहते पण त्याचा आपल्याला काहीच परतावा मिळत नाही. कसा ते पाहू या.

गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय समजल्या जाणाऱ्या फिक्स डिपॉझिट मध्ये आपल्याला आठ टक्के प्रमाणे व्याजदर मिळतो. या मिळालेल्या व्याजावर आपल्याला टॅक्स सुद्धा द्यावा लागतो. सरासरी जर आपण 20% इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये बसत असाल तर आपला टॅक्स कापला जाऊन आपल्याला सहा टक्के पर्यंत परतावा मिळतो. जर आपण महागाईदर पाहिला तर तो सुद्धा सहा टक्क्यांच्या जवळपास आहे. म्हणजे जर आपण शंभर रुपये एफडी मध्ये गुंतवले तर त्याचे 106 रुपये होतात आणि महागाई दर जर सहा रुपये पकडला तर आपल्याला एवढी मधून शून्य टक्के परतावा मिळतो पण बर्याच जणांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही आणि ते एफडी मध्ये गुंतवणूक करीत राहतात.

याउलट स्टॉक मार्केटमध्ये अशी बरीच उदाहरणे आहेत ज्याने आपल्याला एका वर्षात शंभर टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. पण हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही त्यासाठी स्टॉक मार्केटचा अभ्यास असणं जरुरी आहे. जर आपल्याला स्टॉक मार्केट विषयी काही माहित नसेल तर आपल्यासाठी गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड याविषयी आपण आपल्या म्युच्युअल फंड सेक्शनमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

तर तात्पर्य म्हणजे, बँकेमध्ये एफडी करणे म्हणजे वर्षानुवर्षे कपाटात पैसे ठेवण्यासारखे आहे ज्यावर आपल्याला कोणताही परतावा मिळत नाही. स्टॉक मार्केटमध्ये जर योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर आपली इन्वेस्टमेंट कितीतरी पटीने वाढू शकते.

यामध्ये रिस्क निश्चितच आहे पण जर आपण मोठ्या कालावधीसाठी स्टॉक मध्ये इन्वेस्टमेंट केली तर आपल्याला निश्चितच चांगला परतावा मिळतो. राकेश झुनझुनवाला, दमानी यासारखी बरीच उदाहरणे आपण ऐकली असतील ज्यांना स्टॉक मार्केटनेच करोडपती बनवले. पण स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकी पूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करावी?

how to start trading in stock market?


स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्वेस्टमेंट सुरू करण्यासाठी आपल्याला गरज असते ती एका ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ची. ट्रेडिंग अकाउंट द्वारे आपण स्टॉक खरेदी किंवा विक्री करू शकता आणि डिमॅट अकाउंट मध्ये आपण खरेदी केलेले स्टॉक ठेवू शकता.

सर्वात प्रथम आपल्याला निवडायचा आहे तो एक चांगला ब्रोकर. जर आपण नवीन असाल तर आपण डिस्काउंट ब्रोकर पासून सुरुवात करावी पण तो डिस्काउंट ब्रोकर भरवशाचा सुद्धा असला पाहिजे. भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारा डिस्काउंट ब्रोकर म्हणजे झिरोदा(Zerodha).

आपण ब्रोकरच्या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये एक बेसिक फॉर्म भरून एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर आपल्याला ब्रोकर कडून कॉल येतो आणि ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट उघडणे संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, सॅलरी स्लिप, फॉर्म 16 किंवा सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट असणे गरजेचे आहे.

अकाउंट उघडण्याची सर्व प्रोसेस ही आजकाल ऑनलाइन पद्धतीने केली जाते. वर दिलेले सर्व डॉक्युमेंट आपण आपल्या मोबाईल द्वारे स्कॅन करून किंवा त्याचा फोटो काढून अपलोड करू शकता. त्यानंतर एका व्हिडिओ कॉल द्वारे आपल्या डॉक्युमेंट्स चे आणि आपले व्हेरीफिकेशन केले जाते.

व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर साधारणतः एक ते दोन दिवसांमध्ये आपले ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट उघडले जाते. हे अकाउंट उघडल्यानंतर काही ब्रोकर POA नावाचा एक फॉर्म फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून ती कुरियर द्वारे आपल्या हेड ऑफिस ला पाठवायला सांगतात. ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी साधारणतः तीनशे रुपयांपर्यंत खर्च येतो. काही ब्रोकर्स अकाउंट ओपनिंग साठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावत नाहीत.

अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला वर्षाला त्याचे AMCचार्जेस द्यावे लागतात. हे चार्जेस साधारणतः तीनशे रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत असतात आणि हे चार्जेस सर्वस्वी त्या ब्रोकर वर अवलंबून असतात.

जर आपले ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट जर यशस्वीपणे ओपन झाले तर ब्रोकर कडून आपल्याला ई-मेलद्वारे कळवले जाते. ई-मेल मध्ये आपला युजर नेम आणि पासवर्ड दिलेला असतो त्याच प्रमाणे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची लिंक सुद्धा दिलेली असते. या युजरनेम पासवर्ड द्वारे आपण ट्रेडिंग अकाउंटला लॉगिन करू शकता.

लॉग इन केल्यानंतर जर आपल्याला शेअर खरेदी विक्री करायचे असेल तर आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करावे लागतात. आपल्या बँक अकाउंट मधून ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचे बरेच मार्ग आहेत त्यापैकी नेट बँकिंग आणि यूपीआय हे सर्वात प्रचलित मार्ग आहेत. ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आपला बॅलन्स लगेच अपडेट केला जातो आणि आपणआपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये किती रक्कम आहे ते लगेच पाहू शकता.

जर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मधील रक्कम आपल्या बँक अकाउंट वर ट्रान्सफर करायचे असेल तर त्यासाठी आपल्या ब्रोकरच्या वेबसाईटवर किंवा ट्रेडिंग टर्मिनलवर पर्याय दिलेला असतो. आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करताना ते लगेच होतात पण ट्रेडिंग अकाउंट मधून बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करताना आपल्याला एक ते दोन दिवसांचा अवधी लागू शकतो.

आपल्या ट्रेडिंग टर्मिनल लॉगिन केल्यानंतर आपण सर्च बार मध्ये आपल्याला पाहिजे तो स्टॉक सर्च करू शकता. तो स्टॉक खरेदी आणि विक्री करण्याचे ऑप्शन तेथेच आपल्याला दिसून येते त्यावर क्लिक करून आपण स्टॉक ची खरेदी किंवा विक्री करू शकता.

जर आपण इंट्राडे साठी खरेदी करत असाल तर खरेदी करतेवेळी आपल्याला इंट्राडे हे ऑप्शन निवडावे लागते. इंट्रा डे साठी ब्रोकर कडून आपल्याला काही मार्जिन दिले जाते ते प्रत्येक ब्रोकर चे वेगवेगळे असते. म्हणजे जर आपल्या अकाउंट मध्ये एक लाख रुपये असतील आणि ब्रोकरणे आपल्याला दहापट मार्जिन दिले तर आपण दहा लाख रुपयांचे शेअर्स खरेदी करु शकता. पण इंट्राडे मध्ये खरेदी केलेले शेअर्स त्याच दिवशी विकणे हे बंधनकारक असते. जर आपण ते विकले नाहीत तर आपला ब्रोकर मार्केट बंद होताना ते स्वतः विकून टाकतो आणि त्याचा प्रॉफिट किंवा लॉस आपल्या अकाउंट मध्ये दिसू लागतो.

जर आपल्याला काही दिवसांसाठी शेअर्स घेऊन ठेवायचे असतील तर आपल्याला CNC नावाचा पर्याय निवडावा लागतो. हा पर्याय निवडल्यानंतर आपण घेतलेले शेअर्स दुसऱ्याच दिवशी आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जातात जी आपण कितीही दिवसांपर्यंत होल्ड करू शकता. जर आपण CNC नावाचे ऑप्शन निवडले तर आपल्याला ब्रोकर कडून मार्जिन दिले जात नाही. पण यामध्ये काही ब्रोकर हे अपवाद आहेत.

आपण स्टॉप मध्ये ट्रेडिंग मोबाईल द्वारे किंवा कॉम्प्युटर लॅपटॉप द्वारे करू शकता. त्यासाठी मोबाईल मध्ये ब्रोकर चे ट्रेडिंग एप्लीकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे. लॅपटॉप साठी आपण वेब ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरू शकता किंवा आपल्या डेस्कटॉप वर सॉफ्टवेअर डाऊनलोड सुद्धा करू शकता. बरेचसे ब्रोकर हे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे अतिरिक्त चार्जेस घेत नाहीत. नवीन ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर ते कसे वापरायचे याचा डेमो ब्रोकर कडून मोफत दिला जातो.

आपण खरेदी केलेल्या स्टॉक वर आपल्याला ब्रोकरेज द्यावे लागते. हे ब्रोकरेज प्रत्येक ब्रोकर चे वेगवेगळे असते ते आपल्याला ब्रोकर च्या वेबसाईटवर प्राईसिंग नावाचे ऑप्शन वर करू शकते. जर आपले अकाऊंट फुल-सर्वीस ब्रोकरकडे असेल तर आपल्याला ब्रोकरेज हे जास्त द्यावे लागते पण आपले अकाऊंट जर डिस्काउंट ब्रोकर कडे असेल तर तुलनेने आपल्याला कमी ब्रोकरेज द्यावे लागते.

आपण खरेदी केलेल्या स्टॉक वर ब्रोकरेज व्यतिरिक्त काही गव्हर्मेंट टॅक्सेस सुद्धा द्यावे लागतात याला STT असे म्हणतात या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही प्रकारचे टॅक्सेस आपल्याला द्यावे लागतात.

आपण जर स्टॉक मार्केट मधून रेगुलर इन्कम करत असाल तर आपल्याला या प्रॉफिट वर इन्कम टॅक्स सुद्धा द्यावा लागतो. पण जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला तर इन्कम टॅक्स मध्ये सवलत देखील मिळते. हा पर्याय बऱ्याच कमी जणांना माहित आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण आपल्या CA शी संपर्क साधू शकता.

पुढच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? शेअर मार्केट ट्रेडिंग कशी करावी?  

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post