दादा कोंडके यांचा जीवनपरिचय| Dada Kondke biography in Marathi
दादा कोंडके यांचे सुरुवातीचे जीवन (Early Life of Marathi Dada Kondke)
दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा कोंडके. दादांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी एका सामान्य कुटुंबात गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला. त्यामुळे त्यांचे नाव कृष्णा असे ठेवले गेले. त्यांच्या कुटुंबीयांचे एक किराणा दुकान होते तसेच त्यांचे वडील हे मिलमध्ये कामगार होते.(Dada kondke family)
दादांचे पूर्ण बालपण लालबाग जवळच्या नायगाव येथे गेले. त्यांचे सध्या शालेय शिक्षण सुद्धा याच ठिकाणी झाले.दादांचे मुळगाव हे भोर तालुक्यातील इंगवली हे गाव.त्यानंतर हे कुटुंबीय रोजगारा निमित्त मुंबईमध्ये स्थायिक झाले.
तरुणपणी दादांना पैशांची चांगली चणचण भासू लागली तसेच कुटुंबाला हातभार लावण्याच्या दृष्टीने त्यांना नोकरी करणे गरजेचे होते म्हणून त्यांनी काही दिवस अपना बाजार येथे नोकरी सुद्धा केली. याच दरम्यान काही अनपेक्षित घटनांमुळे त्यांची जवळची माणसे त्यांच्यापासून दुरावली आणि दादा हे एकटे पडले.
मुळचा स्वभाव विनोदी (Dada Kondke comedy) असलेल्या दादांनी समाजातील दुखी लोकांच्या चेहर्यावर हास्य फुलवण्याची जणू जबाबदारीच घेतली. आपल्या भागातील एका बँड पथकामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांचे नामकरण "बँड वाले दादा" असे झाले. बँड पथक का मध्ये कार्यरत असताना दादांनी समाजसेवेमधे सुद्धा भाग घ्यायला सुरुवात केली.
त्यातून झालेल्या ओळखीतून त्यांना छोटी-मोठी नाटके मिळू लागली.
याच दरम्यान प्रसिद्ध लेखक वसंत सबनीस हे दादांच्या संपर्कात आले. वसंत सबनीस हे दादांच्या "खन खन पूर चा राजा" या नाटकाने बरेच प्रभावित झाले होते.वसंत सबनीस यांच्याबरोबर दादांची चांगली गट्टी जमल्यानंतर दादांनी त्यांना माझ्यावर काहीतरी नाटक लिहा अशी विनंती केली.
आपल्या मित्राच्या विनंतीस मान देऊन वसंत सबनीस यांनी दादांवर "विच्छा माझी पुरी करा" हे नाटक लिहिले आणि हेच नाटक दादांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. जबरदस्त गाजलेल्या या नाटकाचे दादांनी जवळपास दीड हजारांवर प्रयोग केले आणि दादा आहे प्रसिद्ध नाट्य कलावंताच्या रूपात नावारूपास आले. आपल्या नाटका निमित्त दादा यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
त्यांनी मराठी संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केला आणि मराठी रसिकांचे मनोरंजन करण्याचा विडाच उचलला. रसिकांच्या मनावर सर्वात जास्त प्रभाव पाडणारी गोष्ट म्हणजे दादांची संवादफेक आपल्या विशिष्ट संवाद फेकीच्या च्या जोरावर त्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केले. अगदी योग्य टायमिंग साधत हास्याचा पंच मारण्या मध्ये दादांचा हात कोणीच धरू शकत नाही.
दादा कोंडके यांचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण
दादा कोंडके यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले ते भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे. या चित्रपटाने राष्ट्रीय फिल्म अवार्ड सुद्धा पटकावला आहे. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोंगाड्या या चित्रपटाने दादांना यशाच्या शिखरावर विराजमान केले. सोंगाड्या हा चित्रपट रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन विनोदी अभिनेता मिळाला.
सोंगाड्या चित्रपट आणि बाळासाहेब ठाकरे यांचा हस्तक्षेप (Songadya Movie)
याच दरम्यान कोहिनूर चित्रपटाच्या मालकाने दादांचा सोंगाड्या हा सिनेमा रोखुन धरला होता कारण त्यांना देव आनंद यांचा "तेरे मेरे सपने" हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दादांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे धाव घेतली.
बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा मराठी माणसाच्या मदतीला धावले आणि त्यांच्या आदेशामुळे दादांच्या सोंगाड्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. बाळासाहेबांचे हे उपकार दादा कधीही विसरले नाहीत आणि शेवटपर्यंत ते कट्टर शिवसैनिक राहिले.
शिवसेनेच्या बऱ्याच प्रचार सभांमध्ये दादा हे एक मुख्य आकर्षण असायचे. निवडणुकीच्या प्रचाराची भाषणे करताना दादा विरोधी पक्षाचा खरपूस समाचार आपल्या भन्नाट शैलीत घ्यायचे त्यामुळे या सभांना प्रचंड गर्दी होत होती. आजही दादांची जुनी प्रचार सभेतील भाषणे आवर्जून ऐकली जातात.त्या आधी ते सेवादलाचे सक्रिय सदस्य सुद्धा होते.
सोंगाड्या चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त सुपरहिट झाला आणि दादांच्या नवीन कारकिर्दीस सुरुवात झाली. या चित्रपटातील "माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी" हे गाणे रसिकांना आजही मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहात नाही.
दादा कोंडके यांचा निर्मिती क्षेत्रामध्ये प्रवेश
या चित्रपटाच्या यशानंतर दादांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनी निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. दादांच्या प्रयत्नांमुळे उदयास आली ती "कामाक्षी पिक्चर्स" ही निर्मिती संस्था. या निर्मिती संस्थे मध्ये प्रमुख नायिकेच्या भूमिकेमध्ये होत्या त्या प्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण. या निर्मिती संस्थेला राम-लक्ष्मण यांच्यासारख्या कुशल संगीतकाराची साथ लाभली. या संस्थेमध्ये गायकाची जबाबदारी सांभाळली ती जयवंत कुलकर्णी आणि महेंद्र कपूर यांनी. सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात बाळ मोहिते यांनी काम पाहिले.
मराठी चित्रपट सृष्टीत द्विअर्थी संवादांची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती दादा कोंडके यांनी. त्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. आणि त्यातील मुख्य अडचण होती ती म्हणजे सेन्सॉर बोर्डाची मान्यता. चित्रपटातील द्विअर्थी संवादांमुळे दादांचे चित्रपट सेन्सॉर बोर्डावर नाकारले जात होते. दादांनी आपले राजकीय हितसंबंध वापरत या अडचणीवर सुद्धा मात केली.
दादा कोंडके यांचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Dada Kondke record)
दादांचे सलग नऊ चित्रपट हे पंचवीस आठवडे सुपरहिट ठरले होते त्यामुळे दादांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला होता. एवढे चित्रपट सलग सुपरहिट होणे हे चित्रपट सृष्टीतील एक नवीन रेकॉर्ड होते जे आजही अबाधित आहे. आज पर्यंत कोणताही निर्माता या रेकॉर्डच्या जवळपास देखील पोहोचू शकला नाही.
दादा हे खरोखरच अष्टपैलू होते. ते एक यशस्वी निर्माते होते.
ते एक कसलेले अभिनेते सुद्धा होते. बऱ्याच आघाडीच्या गायकांना लाजवेल अशी गाणी सुद्धा त्यांनी गायली.(Dada kondke che gane) ते गीतकार आणि पटकथाकार सुद्धा होते.ते एक यशस्वी दिग्दर्शक आणि नावाजलेले संगीतकार देखील होते. एकाच व्यक्तीकडे एवढे गुण असणे म्हणजे आश्चर्यच नव्हे काय!
स्वतःला सभ्य समजणाऱ्या लोकांना त्यांच्या द्विअर्थी भाषेतील चित्रपटांपासून दूरच ठेवले. पण खर्या रसिक प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले.
द्विअर्थी विनोद आणि चित्रपटातील नायिकेशी प्रमाणाबाहेर केलेली लगट या कारणांमुळे सेन्सॉर बोर्ड आणि दादा यांच्यातील वाद हे नित्याचे समीकरण बनून गेले होते. या वादामुळेच कदाचित त्यांच्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळत होती आणि ते पाहण्याची प्रेक्षकांच्या मनामधील इच्छा वाढत होती.
त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटात मध्ये सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव,आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार ,तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका (Muka ghya Muka), मला घेऊन चला (Mala gheun chala), पळवा पळवी(Palva Palvi) या चित्रपटांची आवर्जून नावे घेता येतील. (Dada kondke picture)
दादा कोंडके यांचे हिंदी आणि गुजराती चित्रपट
मराठीबरोबरच दादांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये सुद्धा आपला ठसा उमटवला. त्यांच्या हिंदी चित्रपटांची नावेच अशी होती कि ती ऐकून माणूस विचारात पडल्याशिवाय राहत नव्हता. तेरे मेरे बीच मे, अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे(Andheri raat me diya tere haath me), आगे की सोच(aage ki soch), खोल दे मेरी जुबान ही त्यातील काही नमुनेदार नावे.
दादा कोंडके यांच्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या पांडू हवालदार या सिनेमामुळे त्यांना गुजराती मध्ये नंदू जमादार हा चित्रपट बनविण्याची कल्पना सुचली. पांडू हवालदार या चित्रपटातील अशोक सराफ यांच्याबरोबरची त्यांची भूमिका खूपच गाजली. अशोक सराफ यांची कारकीर्द घडविण्यात या चित्रपटाचा मोलाचा वाटा आहे.
दादांनी मराठी चित्रपट सृष्टीवर तब्बल दोन दशके राज्य केले. (Dada kondke marathi films)
बऱ्याच जणांना त्यांचे विनोद हे अश्लील आणि पाणचट वाटत होते त्यामुळे महिलावर्ग त्यांच्या चित्रपटांपासून लांबच होता.
दादांचा विवाह आणि प्रेम संबंध (Dada Kondke wife | Dada Kondke love affairs)
दादांचा विवाह नलिनी(Nalini Kondke) यांच्या बरोबर झाला होता पण तो फार काळ टिकला नाही आणि लवकरच अंतर्गत वादाने त्याचे परिवर्तन घटस्फोटात झाले. दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटातील अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबरोबर दादांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चांना उत आला होता पण याची पुष्टी दादांनी कधीच केली नाही. दादांच्या घटस्फोटानंतर दादा आणि उषा चव्हाण हे लग्न करणार असल्याच्या अफवा सुद्धा पसरत होत्या पण शेवटपर्यंत त्या अफवाच राहिल्या.
दादा कोंडके यांचा मृत्यू (Dada Kondke's death)
दादांचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य मात्र मराठी रसिकांना जास्त काळ लाभले नाही. 14 मार्च 1998 रोजी चा तो काळा दिवस उजाडला आणि दादर येथील आपल्या रामनिवास निवासस्थाने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.(Dada Kondke cause of death) त्यांना तात्काळ सुश्रुषा नर्सिंग होम मध्ये हलविण्यात आले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती आणि नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.
त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी शोक सागरात बुडाली. याच दरम्यान त्यांचे उषा चव्हाण यांच्या बरोबरच्या "जरा धीर धरा" या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते पण हा चित्रपट अपूर्ण राहिला तो कायमचाच.
आजही दादांच्या चित्रपटातील गाणी ऐकताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याएवढा अष्टपैलू अभिनेता आजवर तरी कोणी झाला नाही.
दादांसारख्या कसलेल्या अभिनेत्याला MarathiWiki चा मानाचा मुजरा.
Post a Comment