.

गरोदरपणाची सुरुवातीची लक्षणे | Symptoms of pregnancy in Marathi

गर्भधारणा म्हणजेच प्रत्येक विवाहित महिलेचे स्वप्न. प्रत्येक महिलेला कधी ना कधी आई व्हावं असं  वाटत असतं. घरातील इतर मंडळी देखील घरात लवकरात लवकर नवीन पाहुणा  किंवा पाहुणी  यावी याची वाट पाहत असतात. आणि त्यातच गर्भधारणा झाल्याची बातमी समजताच कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहत नाही. मग येणाऱ्या बाळासाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या जातात. थोडक्यात काय तर गर्भधारणा म्हणजे आनंदाचा क्षण. 

चला तर पाहूया, गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे, गरोदर स्त्रियांनी घ्यावयाची काळजी, डॉक्टरांचा सल्ला आणि औषध उपचार. 

Symptoms of pregnancy in Marathi


गरोदरपणाचे निदान करण्यासाठीआजच्या आधुनिक युगामध्ये बऱ्याच साधनांचा उपयोग केला जातो. पण गरोदरपणामुळे शरीरामध्ये काही बदल होतात त्यामुळे तुम्ही गर्भवती आहात किंवा नाही याचे निदान केले जाऊ शकते. शरीरातील हे बदल गरोदरपण निश्चित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. 


गरोदरपणामध्ये आपल्या शरीराद्वारे काही संकेत दिले जातात. या संकेतांच्या आधारे आपल्या गरोदरपणाचे निदान केले जाते. या लक्षणांमध्ये मळमळ, शरीराचे वाढलेले तापमान, मूड बदलणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 


पण याचा अर्थ असा नाही कि वरील लक्षणे लक्षणे दिसून आल्यास आपण निश्चित गरोदर आहात कारण हि लक्षणे सामान्य अवस्थेमध्ये सुद्धा दिसून येतात. गरोदरपणाशी संबंधित लक्षणांचा अभ्यास केल्यानंतरच गर्भावस्थेची खात्री केली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊ गरोदरपणाची १५ लक्षणे कोणती आहेत ते. 


१. मासिक पाळी  चुकणे 

पाळी  चुकणे हे गर्भधारणेचे पहिले लक्षण असू शकते. पण हे लक्षण तेंव्हाच योग्य मानले जाते जेंव्हा तुमची पाळी  नियमित असते आणि ती प्रत्यके महिन्याच्या ठरलेल्या तारखेला येते. 


जर पाळी चुकली तर आपण गरोदरपणाची चाचणी करू शकता आणि हि चाचणी सकारात्मक येण्याची शक्यता जास्त असते. पण जर पाळी  नियमित नसेल तर हे लक्षण आपल्यासाठी कमी महत्वाचे ठरू शकते. 


२. गर्भधारणेनंतर होणार रक्तस्त्राव 

गर्भधारणेनंतर होणार रक्तस्त्राव मासिक पाळीच्या तुलनेत कमी असतो तसेच त्याला दुर्गंधी येत नाही आणि खाजवत हि नाही. गर्भधारणेनंतर होणाऱ्या रक्तस्रावाला प्रत्यारोपण रक्तस्त्राव किंवा इम्प्लांटेशन ब्लीडींग असे देखील म्हणतात. हा रक्तस्त्राव गर्भधारणेचे सुरुवातीचे लक्षण मानले जाते. 


प्रत्यारोपण रक्तस्त्राव मासिक पाळीच्या आसपासच्या दिवसांमध्येच दिसून येतो त्यामुळे बऱ्याच वेळा रुग्ण संभ्रमावस्थेमध्ये दिसतो. बऱ्याच रुग्णांना मासिक पाळी आणि प्रत्यारोपण रक्तस्त्राव यामधला फरक कळून येत नाही. 


प्रत्यारोपण रक्तस्रावामध्ये मासिक पाळीच्या तुलनेत, रक्तस्त्राव खूपच कमी असतो. या गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण जर रक्तस्त्राव जर जास्त असेल तर ती एक सामान्य मासिक पाळी असू शकते. पण रक्तस्त्राव जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ते गर्भपाताचे लक्षण सुद्धा असू शकते म्हणून या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. 


इम्प्लांटेशन ब्लीडींग किंवा प्रत्यारोपण रक्तस्त्राव हा मासिक पाळीचं आसपासच्या दिवसांमध्येच दिसून येतो. त्यामुळे ज्यांची गर्भधारणेची चाचणी सकारात्मक आली आहे अश्या रुग्णांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते कि गर्भधारणेनंतर सुद्धा मासिक पाळी कशी आली. पण हि एक सामान्य बाब आहे. 


प्रत्यारोपण रक्तस्त्राव किंवा इम्प्लांटेशन ब्लीडींग म्हणजे नेमकं काय?

जेंव्हा स्त्रीबीज आणि  पुरुषांच्या शुक्रजंतूंचे मिलन होते तेंव्हा निर्माण झालेला गर्भ गर्भाशयात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जेंव्हा हा गर्भ गर्भाशयात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतो तेंव्हा थोडासा रक्तस्त्राव दिसून येतो. यालाच प्रत्यारोपण रक्तस्त्राव किंवा इम्प्लांटेशन ब्लीडींग असे म्हणतात. प्रत्यारोपण रक्तस्त्राव हे गर्भधारणेचे एक सामान्य लक्षण आहे त्यामुळे त्याला घाबरून जाऊ नये. 


३. मळमळणे किंवा उलटी आल्यासारखे वाटणे

मळमळणे किंवा उलटी आल्यासारखे वाटणे हि गरोदरपणाची सामान्य लक्षणे आहेत. आणि हि लक्षणे दिवसभरात केंव्हाही जाणवू शकतात. 


या लक्षणांसाठी बाजारात विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. आपले डॉक्टर सुद्धा आपल्याला यासाठी औषधे देतात ज्यामुळे हि लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. 


जर उलटीची  लक्षणे तीव्र स्वरूपात जाणवत असतील तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. 


चला जाणून घेऊया कि गरोदरपणामध्ये मळमळ किंवा उलटी आल्याची भावना का निर्माण होते?

हे सर्व होते ते एका हार्मोन मुळे ज्याला एच सी जी बीटा हार्मोन असे म्हणतात. गरोदरपणामध्ये या हार्मोन मध्ये बदल होत असतात. जर या हार्मोनची पातळी  शरीरात वाढली तर मळमळ किंवा उलटी आल्याची भावना निर्माण होते. पण योग्य वेळी योग्य औषधांमुळे त्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. 


४. स्तनामध्ये होणारे बदल 

गरोदरपणामध्ये रुग्ण नेहमी स्तन जड होणे, स्तनामध्ये झिणझिण्या येणे यासारख्या तक्रारी करत असतो आणि हे पण हार्मोन्स मध्ये होणाऱ्या बदलांमुळे होत असते.  गरोदर पणात निप्पल च्या बाजूचा जो घेर असतो त्याचा रंग सुद्धा गडद होत जातो.  सामान्यपणे हा रंग ब्राऊन किंवा काळा होऊ शकतो आणि हे सुद्धा गर्भावस्थेचे एक सामान्य लक्षण आहे.  या लक्षणांमध्ये काही विशेष त्रास होत नसल्यामुळे औषधांची गरज भासत नाही पण तरीही जर लक्षणांची तीव्रता जास्त असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरते.


५. बद्धकोष्ठता/मलबद्धता 

गर्भावस्थेमध्ये बद्धकोष्टतेचि समस्या एक सामान्य समस्या आहे आणि त्यामागे कारण आहे प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे गर्भाच्या नाळेमधून उत्पन्न होते.  हे हार्मोन आतड्यांच्या स्नायूंना रिलॅक्स करतात बद्धकोष्टतेचे दुसरे कारण म्हणजे, जर रुग्णाला मळमळत असेल  किंवा उलटी सारखे किंवा उलटी आल्यासारखे वाटत असेल तर रुग्ण व्यवस्थित जेवण करत नाही आणि योग्य प्रमाणात पाणीही पीत नाही त्यामुळे बद्धकोष्टतेचि समस्या  उद्भवू शकते. 


६. योनी स्त्राव 

योनी स्त्राव हेसुद्धा गर्भावस्थेमध्ये आढळून येणारे एक सामान्य लक्षण आहे. यामध्ये योनीतून एक सफेद रंगाचा स्त्राव येतो आणि हे सुद्धा हार्मोन्स मध्ये होणाऱ्या बदलांमुळे होते. पण गर्भावस्थेमध्ये याची मात्रा थोडी जास्त असते. या स्रावास  कोणतीही दुर्गंधी येत नाही किंवा खाज पण सुटत नाही त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते पण या समस्ये  साठी सुद्धा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरते. 


७. वारंवार लघवी येणे 

या अवस्थे मध्ये रुग्णास वारंवार लघवीस जावे लागते आणि हे सुद्धा गर्भावस्थेचे एक सामान्य लक्षण आहे.  यामागचे कारण असे आहे की, गर्भाशय आणि मूत्राशय हे  एकमेकांच्या खूप जवळ असते. गर्भामध्ये मुल मुल जसे जसे वाढत जाते  तसे तसे त्याला जास्त जागेची आवश्यकता भासू लागते आणि  त्यामुळे मुत्राशयावर दाब निर्माण होतो  व रुग्णास वारंवार लघवीस जाण्याची इच्छा होते आणि ही आणि हे एक सामान्य लक्षण आहे.  पण जर रुग्णास ताप असेल किंवा लघवीच्या जागी जळजळ होत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. फक्त लघवीला जाण्याची इच्छा होत असेल तर ती एक सामान्य बाब आहे आणि तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यापासून हा त्रास  कमी होतो. 


८. थकवा येणे 

या अवस्थेमध्ये रुग्णास खुप लवकर थकवा येतो.  कुठलेही छोटेसे जरी काम केले तरी दिवसभर थकवा जाणवतो.  कधीकधी हलका ताप किंवा कणकणी आल्यासारखे सुद्धा वाटते आणि ही सर्व लक्षणे अगदी सामान्य आहेत जी हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे होतात आणि काही महिन्यात आपोआप नाहीशी होतात. 


९. डोकेदुखी डोके जड होणे चक्कर येणे 

गर्भावस्थेमध्ये हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे डोकेदुखी, डोके जड होणे किंवा चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.  साधारणपणे या समस्या सामान्य असतात पण काही रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाच्या समस्या सुद्धा आढळून येतात.  अशावेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. 

चला जाणून घेऊया गर्भावस्थेमध्ये डोकेदुखी किंवा चक्कर येणे या पाठीमागचे कारण काय आहे ?

गर्भावस्थेमध्ये शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात ज्यामुळे शरीरातील ग्लुकोज किंवा साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते.  आठ आठवड्यानंतर रक्तदाब सुद्धा थोडासा कमी होतो त्यामुळे डोकेदुखी किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 


१०. खाण्या-पिण्याची इच्छा न होणे किंवा अन्नावरची वासना उडणे

 या अवस्थेमध्ये रुग्ण प्रत्येक गोष्टीची दुर्गंधी येणे किंवा वास सहन न होणे अशा तक्रारी करत असतो त्यामुळे रुग्णास जेवण करण्याची सुद्धा इच्छा राहत नाही. रोजच्या जेवणाचा किंवा साधा फोडणीचा सुद्धा वास सहन होत नाही. गर्भधारणेचे हे एक सामान्य लक्षण आहे आणि तिसऱ्या महिन्यापासून त्याची तीव्रता कमी होत जाते. 

११. पाठदुखी/कंबरदुखी 

 गर्भावस्थेमध्ये  रुग्णांकडून पाठ दुखीची  तक्रार नेहमी केली जाते आणि हे एक सामान्य लक्षण आहे.  यामध्ये खासकरून कमरेच्या आसपासचा भाग हात जड होणे किंवा दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. 
चला जाणून घेऊया गर्भावस्थेमध्ये पाठ दुखी चे कारण काय आहे?
 जसजसे मुलं गर्भामध्ये मोठे होऊ लागते तसा तसा गर्भाशयाचा आकार सुद्धा वाढत जातो ज्यामुळे गर्भाशयाला आधार देणाऱ्या लिगामेंट वर जास्त प्रमाणात दाब निर्माण होतो आणि त्यांच्यामध्ये तणावाचीअवस्था निर्माण होते.  याच कारणामुळे रुग्ण कंबर दुखी किंवा पाठ दुखीची  तक्रार करतात.  भारतामध्ये बऱ्याच महिलांना गर्भावस्थेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त वेळ उभे राहून काम करावे लागते त्यामुळेसुद्धा कंबर दुखी चे समस्या उद्भवू शकते. हे खूपच सामान्य लक्षण आहे पण अधून मधून थोडासा आराम करणे गरजेचे आहे.  कारण त्यामुळे पाठदुखीची समस्या ही मर्यादित राहते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगा किंवा व्यायाम प्रकार केल्याने सुद्धा या समस्येपासून बऱ्यापैकी आराम मिळू शकतो.  जर आराम करून सुद्धा आपली पाठ दुखी किंवा कंबर दुखी बरी होत नसेल किंवा पोटामध्ये दुखत असेल आणि रक्तस्त्राव होत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

१२. मूड परिवर्तन 

गर्भावस्थेमध्ये हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे मानसिक स्थिती किंवा मूडमध्ये परिवर्तन होऊ शकते.  या मध्ये, जास्त चिडचिडेपणा, अत्याधिक भावनिक होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात आणि ही सर्व लक्षणे सामान्य आहेत. 

१३. श्वास घेण्यास त्रास होणे  

गर्भावस्थेमध्ये आईबरोबरच  तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाला सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते.  त्यामुळे आईच्या शरीराकडून ऑक्सिजनची मागणी वाढते या अवस्थेत आई द्वारे जर जड काम केले गेले तर तिला श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात किंवा लवकर दम लागतो.  आराम केला तर हि लक्षणे लवकर ठीक होतात.  पण जर थोडेसे काम केले तरी खूप वेळ पर्यंत दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यावर या समस्येवर लक्ष दिले गेले पाहिजे कारण ही लक्षणे म्हणजे फुफ्फुसांचे विकार किंवा हृदयरोगाचे  संकेत आहेत आणि यावर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. 

१४. तोंडाला चव नसणे किंवा वेगळ्या प्रकारची चव जाणवणे

 कधीकधी काहीही न खाता सुद्धा रुग्ण तोंडाला चव नसणे किंवा तोंडामध्ये एक विशिष्ट प्रकारचे चमत्कारिक जवळ जाणारीचव जाणवत असल्याची तक्रार करीत असतात आणि हे सर्व हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे होत असते.  अशी लक्षणे तिसऱ्या महिन्यांपर्यंत पाहायला मिळू शकतात त्यानंतर ती लक्षणे हळूहळू कमी होत जातात. 

गर्भावस्थेमध्ये काय करावे आणि काय करू नये?
 हे करावे 
  • पाणी जास्त प्यावे 
  • फोलिक एसिड युक्त आहार घ्यावा 
  • संतुलित आहार घेत राहावा 
  • पोटामधील आपल्या मुलाबरोबर बोलत राहावे 
  • आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा
 हे करू नये 
  • कुठल्याही प्रकारचे व्यसन टाळावे
  •  शक्यतो मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा 
  • जास्त शारीरिक मेहनतीचे काम करू नये 
  • लवकर झोपून लवकर उठावे
  •  विनाकारण जागरण करत बसू नये 
  • आपल्या डॉक्टरांपासून कुठलेही लक्षण लपवून ठेवू नये

1 Comments

Post a Comment

Post a Comment

Previous Post Next Post