.

महाराष्ट्रातील किल्ले - अशेरीगड किल्ला | Asherigad fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Asherigad Killyachi mahiti

Asherigad fort

 किल्ल्याची उंची:- १६८० फूट

किल्ल्याचा प्रकार:- गिरिदुर्ग
डोंगररांग:- पालघर
जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- मध्यम
पालघर विभागात जे अनेक लहान मोठे किल्ले आहेत त्यांच्यात दादा वाटावा असा हा अशेरिगड.  आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो.

 इतिहास:- अशेरीगड हा शिलाहार वंशीय भोज राजाने बांधला असा उल्लेख आहे त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः आठशे वर्षे आहे असे अनुमान निघते. 

 पुढे पोर्तुगीजांनी हा गड ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली पेशव्यांनी १७३७ च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व अठराशे अठरा नंतर तो इंग्रजांच्या हाती गेला.

  गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:- पठारावर उजवीकडे पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात तसेच चर  असलेले अनेक चौथरे येथे आढळतात.  बहुदा पावसाळ्यात पावसाचे पाणी किंवा सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी.  

गडावरची गुहा मध्यम आकाराची व रुंद  तोंडाची आहे परंतु ती खडकात अशा खुबीने खोदलेली आहे की भणाणणाऱ्या  वाऱ्याला व थंडीला अजिबात प्रवेश मिळु नये.  गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे मात्र येथे व बाहेर पहारेकर्यांना  झोपण्यासाठी बर्थ केलेले आहेत. 

 गावकऱ्यांकडून येथे कधीतरी पूजा होत असावी असे वाटणारी व एरवी सहसा न आढळणारी दोन जास्वंदीची झाडे गुहेच्या तोंडाशी आहेत.  गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफही दिसते.  याशिवाय आणखी दोन पण अर्धवट बांधलेली तळी आहेत.  

वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे पाहिल्यास कोहोजगड स्पष्ट दिसतो.  दुर्बिणीने त्यावरील निसर्गनिर्मित मानवी पुतळाही सहज निरखता येतो.  याच दिशेने पुढे गेल्यास कड्याला गेलेली मोठी भेग  व पुढे एक बांधीव बुरुज दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा:- गडावर जाण्यासाठी एकच वाट आहे पालघर होऊन का साया शहराकडे जाणाऱ्या एसटी बसने किंवा या महामार्गावरून धावणाऱ्या खाजगी वाहनाने निघून मस्ताना नाका या ठिकाणापासून सुमारे 10 ते 11 किलोमीटरवर असणाऱ्या खोडकोना या गावच्या स्टॉप ला उतरावे प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे महामार्गावरूनच पालघर कडे पाठ करून उभे राहिल्यास उजवीकडे अडसूळ व डावीकडे प्रचंड असा अशेरीगड दिसतो बैलगाडीची एक वाट सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते. 

 तिथे वेशीवरच वाघ देवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे.  आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष शेती व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा  शिन घालवतात.  विहिरीच्या थंड पाण्याने आपल्या बाटल्या भरून गावकर्‍यांनी दाखवलेल्या वाटेने खिंडीकडे निघायचं.  

वाट जंगलातून जात असल्याने उन्हाळ्यातही त्रास होत नाही.  साधारणतः खिंडीत पोहोचण्यास एक ते दीड तास लागतो.  वाट इथपर्यंत सोपी पण चढणीची आहे.  

खिंडीत  थोड्या वरच्या बाजूला वाघदेवाचे छोटे उघडे  देऊळ आहे.  खिंडीतून उजवीकडे वळून गडमाथ्याकडे निघायचं.  इथे एका मोठ्या खडकाला वळसा घातला की आपण दरवाजाच्या खाली येतो.  इथे दगडावर कोरलेली एक छोटी गणेश मूर्ती आहे.  दरवाजा सुरुंगाने फोडलेला आहे. 

 इथे मात्र वर चढताना काळजी घेणे आवश्यक आहे.  प्रस्तर वेडेवाकडे असल्याने अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने चढाई करणे योग्य.  शक्यतो पाठीवरचे सामान उतरवूनच चढावे.  इथून प्रस्तरारोहणाची हौस भागवून वर चढले की उजवीकडे वर जाण्यासाठी कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. 

 वाटेत खराब पाण्याचे टाके लागते.  या टाक्या वरूनच दुतर्फा खांद्यापर्यंत उंच झुडपातून गडाच्या मध्यापर्यंत जाणारी वाट आहे.  या वाटेने जाताना डाव्या हाताला पुढे खाली खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत.  यापैकी एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे . 

पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर पाच मिनिटांच्या अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते.  तिने खाली गेल्यावर पाण्याची तीन आणखी टाकी आहेत.  या टाक्या अतिशय सुंदर आहेत.  जवळच खडकात कोरलेली एक गुहा देखील आहे.

 राहण्याची सोय:- दहा ते बारा माणसे गुहेत व बाहेरच्या बांधिव  कट्ट्यांवर राहू शकतात परंतु उंदरांपासून सामानाची काळजी घ्यावी.

 जेवणाची सोय:-  गडावर जेवणाची सोय नसल्याने जेवणाची सोय स्वतः करावी.

 पिण्याच्या पाण्याची सोय:-  गडावर बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

 गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ:-  तीन तास

सूचना:- पावसाळ्यात प्रस्तरारोहण धोक्याचे ठरू शकते.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post