.

महाराष्ट्रातील किल्ले - रायगड किल्ला | Raigad fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Raigad Killyachi mahiti

Raigad fort

 

किल्ल्याचा प्रकार : - गिरिदुर्ग
किल्ल्याची उंची : - २९०० फूट
श्रेणी: - मध्यम
डोंगर रांग : - पुणे
जिह्वा : - रायगड

किल्ल्याचा विस्तार : -  रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची २८५१ फूट असून किल्ल्याची उंची २९०० फूट आहे. भौगोलिक दृष्ट्या, महाडच्या उत्तर दिशेस २५ कि.मी अंतरावर हा किल्ला स्थिरावला आहे. रायगडाच्या चारी बाजूस  घनदाट झाडी आणि लांब डोंगर रांगा आहेत. 

रायगडाच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे , तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. गडाच्या पूर्वेला लिंगाणा तर आग्नेय दिशेला राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड प्रतापगड आणि वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा भाग दिसतो. 

रायगडापासून मुंबई पुणे आणि सातारा हि शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्री डोंगर रांगांमधील हा एक महत्वाचा किल्ला आहे. रायगड हा निसर्गतः डोंगरांनी वेढलेला आहे तसेच तसेच आस पास घनदाट झाडी आहे म्हणून शत्रूच्या हल्ल्यांपासून बचावा साठी महाराजांनी रायगडाची निवड केलेली दिसते.

इतिहास:-  रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते.  युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत.  जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम.  पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता तेव्हा त्यास रासिवटा व तणस अशी दोन नावे होती. 

 त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दऱ्या खोऱ्या वरून  त्यास नंदादीप असेही नाव पडले.  निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.  मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला.  

महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याण चा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली.  त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.  रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. 

 शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे तसेच सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, राजा खास  जाऊन पाहता गड बहुत चखोटा, चौतर्फा.  गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच.  

कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथीवर चखोट गड  खरा परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा याच दुर्गदुर्गेश्वर आला 15 विविध नावांनी संबोधिले गेले आहे १.  रायगड २. रायरी ३. इस्लामगड ४. नंदादीप ५. जंबुद्वीप ६. तणास  ७. राशीवटा  ८. बडेणूर ९. रायगिरी १०.  राजगिरी ११. भिवगड १२. रेड्डी १३. शिवलंका १४. राहीर १५. पूर्वेकडील जिब्राल्टर.  

शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग.  महाराजांचा अभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना.  तारीख १९ मे १६74 रोजी राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. 

तीन मन सोन्याचे  म्हणजे 56 हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत तारीख ६ जून १६७४,  ज्येष्ठ शुद्ध 13 शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला.  तारीख २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शु ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक अभिषेक करून घेतला या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. 

 हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.  कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले.  हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे.  गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत.  सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. इ. स . १६७५,  फेब्रुवारी ४ शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५  गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. 

 सिद्धार्थ संवत्सर फाल्गुन 2 , १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले.  रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन.  शके १६०२ रुद्रानं संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले.  सभासद बखर म्हणते,  ते दिवशी पृथ्वीकंप जाहला अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर मग शु . ७ इ. स . १६८१, 16 फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. 

इ. स . १६८४ सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली.  तारीख 21 रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीनने  गडाच्या पायथ्याशी असलेली असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला.  

औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी खानाने गडास वेढा घातला.  दिनांक 5 एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. 

 पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता पण दिनांक 3 नोवेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले.  झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे.  पुढे रायगडचे नामांतर इस्लामगड असे झाले. ५ जुन १७३३  यादिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-

१.  पाचाडचा जिजाबाईंचा वाडा: -  उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाड जवळच एक वाडा बांधून दिला तोच हा मासाहेबांचा राहता वाडा.  वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती.  पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे यास तक्याची विहीर असेही म्हणतात.
२. खुबलढा बुरूज:-  गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज.  बुरुजा शेजारी एक दरवाजा होता त्या चीत  दरवाजा म्हणत  पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

३.  नाना दरवाजा:-  या दरवाजास नाणे दरवाजा असेही म्हणत.  या दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी लावला जातो ही पूर्णपणे गैरसमजूत आहे.  नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा इ. स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन आला होता.  या दरवाज्यास दोन कमानी आहेत दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत.  त्या स देवड्या म्हणतात.  दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.


४.  मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा:- चिट दरवाज्याने  गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते.  या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे.  येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे तेथे एक प्रचंड तोफही दिसते.  पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.


५. महादरवाजा:- महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत.  दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत.  श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मी होय.  महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे.  तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात.  शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात बुरुंजामंधील  दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे.  महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात.  महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

६. चोरदिंडी:-  महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे.  बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत


७. हत्ती तलाव: -  महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव.  गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होता.


८.  गंगासागर तलाव:- हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात धर्म शाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे पन्नास साठ पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव.  महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली म्हणून याचे गंगासागर असे नाव पडले.  शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.


९. स्तंभ:-  गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात यास  स्तंभ म्हणतात.  जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत.  ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात.  ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.


१०. पालखी दरवाजा:-  स्तंभांच्या पश्‍चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा.  या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.


११.  मेना दरवाजा:-  पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो.  उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात, ते आहेत राण्यांचे महाल. मेणा  दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.


१२.  राजभवन:- राणीवशाच्या समोर डाव्या हातास  मकानांचे अवशेष दिसतात यांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा  चौथारा शहाऐंशी फूट लांब व 33 फूट रुंद आहे.


१३.  रत्नशाळा:-  राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे तीच ही रत्नशाळा.  हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.


१४.  राजसभा:-  महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तीच ही राजसभा राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे . येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे.  येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते.  सभासद बखर म्हणते ' तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली'.


१५. नगारखाना:-  सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना.  हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.  नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.


१६.  बाजारपेठ:-  नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ.  तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे.  पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ प्रत्येकी 22 दुकाने आहेत मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.


१७. शिर्काई देऊळ:-  महारांजाच्या पुतळ्याच्या डाव्या बाजुस्ट जे छोटे देऊळ दिसते ते  शिर्काई चे देऊळ. शिर्काई हि गडावरील मुख्य देवता.


१८. जगदीश्वर मंदिर : - बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात.  तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे.  

मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो.  मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे.  गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.  मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे ' सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर'.  

या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो त्याचा अर्थ  'असा हा जगदीश्वराचा प्रसाद श्री छत्रपती शिवाजी राजे यांच्या आज्ञेने शके पंधराशे १५९६ मध्ये आनंद नाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला.  

या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.


१९.  महाराजांची समाधी:-  मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी.  सभासद बखर म्हणते ' 'क्षत्रिय कुलावतंस श्री महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके सोळाशे दोन चैत्र शुद्ध 15 या दिवशी रायगड येथे झाला.  देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले.  

येथे काळ्या दगडाच्या चिर्याचे जोते  अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे.  फरसबंदीच्या खाली पोकळी आहे  तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षा मिश्रा मृत्तिकारुपाने सापडतो.
दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे ते शिबंदीचे निवासस्थान असावे.  

त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो हे घर की १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते.  महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.


२०.  कुशावर्त तलाव:-  होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते.  तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते.  देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.


२१. वाघदरवाजा:- कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते.  या पत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे यांकरीता गड पाहून एक दोन तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.  

हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजा शिवाय हा दरवाजा बांधून घेतला या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो.  पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.


२२.  टकमक टोक:-  बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते.  तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात . जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो . उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कांदा आहे.  टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.


१३. हिरकणी टोक:-  गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते.  या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

 गडावर जाण्याच्या वाटा:-  १. मुंबई गोवा मार्गावरील महाड बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाड्या ही जातात. चित दरवाज्यापाशी  आल्यावर (जो आता  आता अस्तित्वात नाही) जिथे पायऱ्या सुरू होतात तेथे उतरून पायर्‍यांनी गडावर जाता येते.  जवळजवळ 1500 पायऱ्या चढून गेल्यावर दरवाजातून आपला प्रवेश होतो.


 २. नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो.  पायर्‍यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे जाऊन उजवीकडे एक पायवाट जाते त्या वाटेने गेल्यास नानादरवाजाने आपण गड चढू शकतो.
३.  रोपवे आता गडावर जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून दहा ते पंधरा मिनिटात आपण गडावर पोहोचू शकतो.

 राहण्याची सोय:-  रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत तसेच एमटीडीसीच्या बंगल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.  रायगड जिल्हा परिषद तालुका महाड जिल्हा रायगड अथवा महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र,  एक्स्प्रेस टॉवर,नरिमन पॉइंट,  मुंबई २१ यांच्याशी संपर्क केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल.  पाचाड गावी व गडावर श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. 

जेवणाची सोय:-  गडावर हॉटेल्स आहेत तेथे जेवणाची सोय होते.


 पाण्याची सोय:- बाराही महिने पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.


 जाण्यासाठी लागणारा वेळ:-  दोन तास.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post