.

भूतबाधा : एक सत्यकथा | Marathi Ghost stories | Bhutyachya goshti | True ghost stories in Marathi

 

Ghost Stories Marathi

मित्रानो, तुमचा भुताखेतांवर विश्वास आहे? ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी हि कथा आहे. हि कथा आम्हाला आमच्या एका महिला वाचकाने पाठवली आहे आणि ती सत्य आहे असा दावा देखील केला आहे. चला पाहूया हि कथा त्यांच्याच शब्दात. 


माझं  नाव सरला पण लहानपणापासून मी फक्त सरू याच नावाने प्रसिद्ध आहे. मी मूळची नाशिकची. मला एक लहान बहीण आहे. आमच्या घरात मी, आई, वडील, माझी लहान बहीण सारिका आणि आमची पारू आजी असे राहत होतो. 


आमचे आजोबा बऱ्याच वर्षांपूर्वीच वारले होते. अशाच एका मध्यरात्री शेतात पाणी द्यायला गेले ते परत आलेच नाही पण मृत्यूचे कारण अजूनही समजले नाही. लहानपणी आमची आजी आम्हाला भुताखेतांच्या गोष्टी सांगायची. गावातला अमुक माणूस इथे गेला होता आणि त्याला अमुक अनुभव आला अशा प्रकारच्या त्या गोष्टी असायच्या. 


त्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही जाम घाबरायचो आणि साधे रात्रीचे पाणी प्यायला किंवा लघुशंकेला जायचे सुद्धा धाडस होत न्हवते. गोष्टी सांगताना माझी आजी नेहमी म्हणायची ज्याचा मनुष्य गण आहे त्याला भुते दिसतात आणि झपाटतात सुद्धा म्हणून मनुष्य गण वाल्यानी अमावसेला किंवा पौर्णिमेला रात्री घराबाहेर पडू नये. 


लहानपणी  मनुष्यगण वगैरे गोष्टी काही विशेष समजायच्या नाहीत पण दुर्दैवाने माझाही गण मनुष्य गणच होता. आजी आम्हाला सांगायची कि तिच्या तरुणपणी गावात कोणाला कोणाला भूत बाधा झाली होती आणि त्यावर काय उपाय केला होता, भूताने झपाटलेला माणूस कसा वागतो, कसा ओरडतो, भूताने झपाटलेली बाई सुद्धा पुरुषाचा आवाज कसा काय काढते या गोष्टी आजीकडून आम्हाला ऐकायला मिळत होत्या आणि आम्ही त्या मनोरंजन म्हणून घेत असू. 


पण मला वैयक्तिक भूताचा अनुभव कधी आला न्हवता. कालांतराने  माझे वय देखील वाढले आणि आजी सुद्धा काळाच्या पडद्याआड गेली. आता बऱ्यापैकी समज आली होती आणि भूते हा फक्त माणसाच्या मनाचा एक आभास आहे अशी माझी पक्की समजूत झाली होती. पण मनाच्या कोपऱ्यात कोठेतरी ती सुप्त भीती होतीच. आम्हा दोघा बहिणी पैकी मीच मोठी असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर घरच्यांना माझ्या लग्नाची घाई झाली होती आणि माझ्यासाठी स्थळांच्या चर्चाना अगदी ऊत आला होता. 


कोणता मुलगा काय करतो, कोणता दारू पितो, कोणता कर्तृत्ववान आहे, कोण कोठे नोकरीला आहे, कोणाला किती शेती आहे वगैरे चर्चा दिवसभर आमच्या घरी रंगू लागल्या. शेवटी मध्यस्थामार्फत पुणे येथील एका मध्यम वर्गीय कुटुंबात माझे लग्न झाले. आमचे हे एका नामांकित कंपनीत कायमस्वरूपी कामगार होते. घरची परिस्थिती तशी चांगलीच होती. स्वतःचे घर होते, एक चारचाकी गाडी आणि एक दुचाकी होती. 


माझ्या सासरी माझे पती, सासू, सासरे आणि माझा दीर असे पाच जण राहत होतो. सासरे आणि दिराचा स्वभाव चांगला होता. सासूबाई फक्त अधून मधून घरकाम आणि स्वयंपाकावरून टोमणे मारायच्या पण मी कधी हि उलट बोलले नाही. सासू सासरे कधी गावी तर कधी पुण्यात असे राहायचे. गावाकडची शेतीवाडी माझे चुलत सासरे बघायचे. दीर कॉलेज मध्ये शिकत होता. 


संसाराचा गाडा रेटता रेटता एक वर्ष कधी निघून गेले कळलेच नाही. लग्नानंतरचं ते पाहिलं वर्ष माझ्यासाठी संमिश्र आठवणींच होतं . सुरुवातीला सतत मला माझ्या  आईची आठवण यायची पण नंतर तिच्याशिवाय राहायची सवय झाली. बघता बघता आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आला.


 लग्नाच्या वाढदिवसाची काय काय करायचे याचे प्लांनिंग एक आठवडा आधीपासूनच सुरु झाले. कोठेतरी फिरायला जाऊया असा मी सुचवलं कारण आतापर्यंत मी कधी कुठे जास्त बाहेर गेलेलेच न्हवते. लग्नाच्या वेळी सासूबाई आजारी असल्यामुळे फिरायला जाणे तर सोडाच पण, आमचा मधुचंद्र सुद्धा आमच्या राहत्या घरीच झाला होता. 

चर्चेला सुरुवात झाली ती काश्मीर, ताजमहाल, कुलू मनाली या पासून पण याना ऑफिस मध्ये मार्च एंडिंग ची कामे असल्यामुळे ते शक्य न्हवते. फक्त दोनच दिवस सुट्टी मिळेल त्यामुळे त्याप्रमाणे प्लांनिंग कर असे मला त्यांनी सुनावले. माझा हिरमोड झाला पण काही इलाज न्हवता आणि माझा स्वभाव अगदीच साधा भोळा आणि लाजाळू असल्यामुळे या विषयावर त्यांच्याशी वाद घालणे मला या जन्मात तरी शक्य न्हवते. 


शेवटी जवळच्या जवळ महाबळेश्वर ला जाऊन २ दिवस मुक्काम करू असे ठरले. त्यांनाही हि आयडिया पसंद पडली आणि घरी बाकीच्यांची सुद्धा काही हरकत न्हवती. आमची घरची गाडी असलीतरी ती आता खूपच जुनी झाली होती त्यामुळे जर मधेच बंद पडली तर प्रॉब्लेम नको म्हणून यांनी भाड्याची गाडी घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे ड्राइवर ला फोन करून गाडी सुद्धा बुक झाली. दोन दिवसांनी निघायचे होते. बरोबर काय काय घ्यायचे याची लिस्ट मी बनवत होते कोणते कपडे घालायचे वगैरे याचे प्लॅनींग सुद्धा सुरु झाले. सासर्यांनी सुद्धा महाबळेश्वरून काय काय आणायचे त्याची भलीमोठी लिस्ट माझ्या हातात ठेवली. 


दुसऱ्या दिवशी निघायचे असल्यामुळे आदल्या रात्री सगळे सामान एका मोठ्या बॅगमध्ये पॅक करून आम्ही लवकर झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ चा गजर लावला होता. ड्राइवर ला ५ ला बोलावले होते पण तो कमीत कमी अर्धा तास उशिरा येणार याची आम्हाला खात्री होती आणि झालेही तसेच. 


साधारण एक  तास उशिरा ड्राइवर आला आणि गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट झाला होता म्हणून उशीर झाला असे टिपिकल उत्तर त्याने दिले. आता जास्त उशीर न करता आम्ही बॅगा  गाडीत टाकल्या आणि गाडीत जाऊन बसलो. गाडीचं मागच्या सीट वर आम्ही दोघेच. गाडी सुरु झाली आणि मन कसं  प्रसन्न झालं. एव्हाना चांगलं उजाडलं होतं पण ती पहाट  माझ्या साठी वेगळीच होती. 


लग्न झाल्यापासून प्रथमच मी नवऱ्याबरोबर बाहेर फिरायला निघाले होते. मनात असंख्य विचार दाटून आले होते. मन कसं अगदी प्रसन्न झालं  होतं. रस्त्यात काय काय करायचं, महाबळेश्वर ला पोहोचल्यावर काय करायचं  याचा प्लांनिंग माझ्या मनात चालू झालं होतं. यांनी गाडीची खिडकी थोडी उघडली होती. त्यातून येणाऱ्या थंड वाऱ्याने खूप हायसं वाटत होतं. सकाळी लवकर उठल्यामुळे माझा कधी डोळा लागला ते कळालंच  नाही.


 मला जाग आली ती गाडी एका ठिकाणी थांबल्यावरच. गाडी नाश्त्याला थांबली होती. गाडीतून खाली उतरून आम्ही कोपऱ्यातील एक टेबल वर जाऊन बसलो. हॉटेल मध्ये जास्त गर्दी न्हवती. मेनू कार्ड आल्यावर काय  घ्यायचे याची चर्चा सुरु झाली. ड्राइवर गाडीची काच पुसत होता. त्याला यांनी आत बोलावले. तीन मिसळ पाव आणि चहा अशी ऑर्डर दिली गेली. भरपेट नाश्ता केल्यावर आम्हाला जरा बरे वाटले. 


चहात जरी दूध खूपच कमी असले तरी त्यावेळी तोच चहा आम्हाला अमृता प्रमाणे वाटत होता. चहाच्या प्रत्येक घोटागणिक आमची तरतरी वाढत होती आणि आणखी ताजे तवाने झाल्याचा अनुभव आम्हाला येत होता. बिल देऊन आम्ही गाडीत जाऊन बसलो आणि गाडी सुरु झाली. महाबळेश्वर आता जास्त दूर न्हवतं. थोडं पुढं गेल्यावर मला जोरात लघवी लागली आणि मी यांच्या कानात गाडी थांबवायला सांगा म्हणून सांगितले. 


थोडासा आडोसा बघून ड्राइवर ने गाडी थांबवली. थोडंसं  पुढं चिंचेचं एक झाड होतं त्याखाली मी लघुशंकेला बसले. अचानक माझ्या खांद्यावर एखाद्या माकडाने उडी मारावी तशी कोणीतरी उडी मारली आणि माझी मान गच्च पकडली. भीतीने तर माझी गाळणच उडाली. माझ्या तोंडून शब्द फुटेना. माझे पूर्ण शरीर घामाने भिजून गेले. माझा श्वास कोंडायला  लागला. थोड्याच वेळात माझ्या खांद्यावरचा भार  हलका झाला. पण ते माकड न्हवते ना कोणता प्राणी. ते काय होते ते मला कळलेच नाही. कशीतरी अडखळत मी गाडीजवळ पोहोचले. 


माझा घामाघूम झालेला चेहरा पाहून हे घाबरले. त्यांनी मला पाणी दिले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर मी घडलेली हकीकत त्यांना सांगितली पण त्यांनी सुद्धा तुला भास झाला असेल असे म्हणत माझी चेष्टा करण्यास सुरुवात केली. ते ऐकून ड्राइवर मोठ्याने हसत होता आणि मला अपमान झाल्यासारखे वाटत होते म्हणून मी जास्त काही बोलले नाही. पण ती घटना माझ्या मनातून जात न्हवती आणि महाबळेश्वर येई पर्यंत मी फक्त त्या एका घटनेचाच विचार करत होते. एव्हाना माझा फिरायचा मूड पूर्णपणे निघून गेला होता. 


पण एवढा खर्च करून फिरायला आलोय म्हटल्यावर  फिरणे भाग होते. रूम आधीच बुक केली असल्यामुळे आम्ही आधी रूम वर गेलो आणि फ्रेश झालो. आम्ही दोघेही मांसाहारी असल्यामुळे दुपारच्या जेवणासाठी चिकण ची ऑर्डर देण्यात आली. एव्हाना मला एक वेगळाच अशक्तपणा आला होता जो या आधी मला कधीच जाणवला न्हवता. यांनी मला थोडा झोपण्याचा सल्ला दिला आणि मी जवळपास एक तासभर झोपले. तासाभरानंतर कोणीतरी माझा गळा दाबत आहे असा स्वप्न मला पडलं आणि मी दचकून उठले. 


बरीच दुपार झाली होती आणि सूर्य डोक्यावर आला होता. जेवण सुद्धा तयार झालं होत. यांनी आणि ड्राइवरने चिकन वर यथेच्छ ताव मारला पण मला काही जेवण जाईना. तरी कसेबसे मी जेवले. आणि आम्ही पॉईंट्स बघायला बाहेर पडलो. संध्याकाळपर्यंत आम्ही बरेचसे पॉईंट बघितले आणि बोटींग सुद्धा केलं. एव्हाना माझा अशक्तपणा खूपच वाढला होता आणि मला तापाची कणकणी आल्यासारखे वाटत होते. कधी एकदा रूम वर पोहोचतोय असे मला झाले होते. शेवटी एकदाचे रूम वर पोहोचले. तो पर्यंत माझा ताप बराच वाढला होता. 


हे सुद्धा काळजीत पडले. शेवटी ४ -५ किलोमीटर फिरल्यावर आम्हाला एक डॉक्टर सापडला. दिवसभराच्या दगदगीने कणकणी आली असेल सकाळपर्यंत ठीक होईल असे तो म्हणाला आणि औषधें दिली. काही औषधे लिहून सुद्धा दिली जी आम्ही शेजारच्या मेडिकल स्टोअर मधून घेतली. 


शेवटी रूमवर आलो औषधे घेतली पण माझा ताप काही उतरेना. याना खूप काळजी वाटू लागली होती. ट्रिप ची पूर्ण वाट लागल्यात जमा होते. दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर चे राहिलेले पॉईंट्स आणि प्रतापगड करण्याचा बेत होता पण रद्द केला गेला. घरी फोन करून यांनी सासू सासर्यांना झालेल्या घटनेची माहिती दिली. 


साधा ताप असेल हे कर ते कर असे त्यांनी सुचवले. एव्हाना रात्रीचे ११ वाजले होते. रूम मध्ये आम्ही दोघेच. ड्राइवर तर जेवण करून कधीच गाडीत जाऊन झोपला होता. आमच्या दोघांनाही झोप येत न्हवती. सकाळी घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात न्हवता. माझे डोके दाबत दाबत हे सुद्धा झोपले. 


मला सुद्धा कधी झोप लागली कळले नाही. रात्री अचानक मला जाग आली ती रडण्याचा आवाज ऐकून. रूमच्या कोपऱ्यातून तो आवाज आल्यासारखे वाटत होते. याना उठवले तर ते माझ्यावरच रागावले. तुला नको तेव्हा नको ते भास होतात असे म्हणून ते पुन्हा झोपले. 

घाबरत घाबरत मी बाथरूम ला जाण्यासाठी उठले तो माझ्यामागून कोणीतरी झपकन गेल्याचा मला भास झाला. मी खूप घाबरले पण कसेबसे स्वतःला सावरले आणि पुन्हा झोपी गेले. मला जाग आली ती सकाळीच. माझा ताप पूर्णपणे उतरला होता आणि अशक्तपणा सुद्धा थोडा कमी झाला होता पण आणखी फिरण्याची ताकत माझ्यात न्हवती म्हणून आवरून आम्ही घराकडे जायचा निर्णय घेतला. 


सकाळचा नाश्ता करून आम्ही घराकडे निघालो. माझं लक्ष फक्त रस्त्यातील त्या झाडावर होतं त्याखाली मला काल वाईट अनुभव आला होता. जसं जसं झाडं जवळ येऊ लागलं तसं तसं माझी अस्वस्थता वाढली. मनात खूप भीती वाटू लागली. शेवटी ते झाड आलं  आणि निघून सुद्धा गेलं. एका हॉटेल मध्ये दुपारचं जेवण करून आम्ही शेवटी घरी पोहोचलो. अंगात अशक्तपणा असल्यामुळे मी माझ्या रूम मध्ये जाऊन झोपी गेले. पण थोड्या थोड्या वेळेला काहीतरी वाईट स्वप्न पडून मला दचकून जाग यायची. 


संध्याकाळचे ८ वाजले असतील. मला पुन्हा ताप चढायला लागला. या वेळी तो काल  पेक्षा जास्त होता. जेवण करण्याची इच्छा होईना. यांच्या आग्रहाखातर कसे बसे २ घास पोटात ढकलले आणि औषध घेतले. माझ्याबरोबर सतत कोणीतरी आहे असा मला भास होत होता. झाडाखालच्या प्रसंग, हॉटेल रूम मधून येणार रडण्याचा आवाज आणि माझ्यामागून कोणीतरी गेल्याचा मला झालेला भास सतत मला अस्वस्थ करत होता. मध्यरात्रि मला जाग आली ती सुद्धा दचकूनच. घड्याळ पहिले तर रात्रीचे २ वाजले होते. 


आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.आमच्या रूम च्या कोपऱ्यात एक ३ ते फुटांची पांढरी मानवी आकृती मला दिसली. ती आकृती जमिनीपासून साधारण पणे  १ फूट वर तरंगत होती. असे वाटत होते कि पांढऱ्या शुभ्र धुरापासून ती आकृती बनली आहे. आकृतीवरून ती स्त्री वाटत होती. एक गाऊन  घातलेली स्त्री साधारणपणे जशी दिसेल तशी ती दिसत होती. 


तिचे हात आणि पाय खूपच छोटे होते पण केस मोठे होते. त्या आकृतीमध्ये एक वेगळीच चमक होती त्यामुळे फक्त झिरो बल्ब च्या प्रकाशात ती स्पष्टपणे दिसत होती. साधारण २ ते तीन सेकंदात ती आकृती हवेमध्ये विरून गेली जसा धूर हवेमध्ये विरून जातो. भीतीने माझी गाळण उडाली होती. मोठ्याने ओरडण्याची इच्छा झाली होती पण तोंडातून शब्द फुटत न्हवते. 


हातपाय एवढे जड झाले होते कि ते हलवणे शक्यच न्हवते. हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते, डोके खूप जड झाले होते त्यानंतर माझी शुद्ध हरपली. सकाळी मला जाग आली तर माझं संपूर्ण कुटुंब माझ्याभोवती जमलं होतं. माझा अशक्तपणा खूपच वाढला होता. डोकं गरगरत होतं. माझं पोट आणि पाय खूपच दुखत होते. मी रात्रभर वेगळ्याच भाषेत काहीतरी बडबडत होते आणि किंचाळत होते असे माझ्या नवऱ्याने मला सांगितले. 


मला मोठ्या दवाखाण्यात दाखवण्याचा सल्ला माझ्या सासर्यांनी दिला. त्याच दिवशी आम्ही जवळच्या एक मोठ्या दवाखान्यात गेलो. 

तिथे माझ्या बऱ्याच टेस्ट केल्या गेल्या. त्याचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होते म्हणून आम्ही पुन्हा घरी आलो. 


जशी जशी रात्र होऊ लागली तशी तशी मला भीती वाटू लागली. ती आख्खी रात्र मी जवळपास जागून काढली. त्या रात्री मला काही अनुभव आला नाही आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. दुसऱ्या दिवशी यांनी रिपोर्ट जाऊन आणले आणि ते सगळे नॉर्मल होते. पण मला अधूनमधून ताप येत होता आणि अशक्त पणा काही कमी होत न्हवता. तसेच पोटदुखी कमी झाली होती पण पाय फारच दुखत होते. तापामुळे पाय दुखत असतील असा निष्कर्ष सर्वानी काढला होता. 


आता माझी भीती थोडी कमी झाली होती. थोडेफार जेवण सुद्धा गेले होते आणि झोप पण लागली होती. मध्यरात्री परत मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. याना उठवायला गेले तर ते माझ्यावर रागावले आणि झोपण्याचा सल्ला दिला. तो आवाज आता खूपच स्पष्ट ऐकू येत होता. आमच्या  रूम च्या ज्या कोपऱ्यात मला ती पांढरी धुरकट आकृती दिसली होती त्याच कोपऱ्यातून हा आवाज येत होता. 


माझ्या आजू बाजूला सतत कोणीतरी असण्याचा भास मला होत होता. एखाद दुसरी रात्र सोडली तर जवळपास प्रत्येक रात्री काही ना काही अनुभव मला येत होता. कधी कधी वाटत होते मला वेड तर नाही लागले?


आम्ही डॉक्टरांचा परत एकदा सल्ला घेतला आणि तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले. कोणत्या तरी मानस शास्त्रीय आजाराचे नाव घेऊन त्यांनी काही गोळ्या चालू केल्या. त्याने काही दिवस फरक पडला आणि झोप सुद्धा शांत येऊ लागली. एक दिवस असेच रात्री बाथरूम ला जाताना ती पांढरी आकृती मला परत दिसली आणि मी किंचाळून बेशुद्ध पडले. 


माझी किंचाळी ऐकून घरातीलआणि आजूबाजूचे सुद्धा आमच्या घराकडे धावले. वाईट स्वप्न पडले असे सांगून आमच्या सासर्यांनी शेजार्यांना कटवले. पण सोसायटी मध्ये माझ्या बद्दल चर्चा सुरु झाली होती. अधून मधून आमच्या घरी येणाऱ्या पिंकीला सुद्धा तिच्या आईने आमच्या कडे जाऊ नये म्हणून बाजवले होते. दार दोन ते तीन दिवसांनी मला तो रडण्याचा आवाज येत होता आणि दर ८ ते १५ दिवसांनी ती आकृती दिसत होती. डॉक्टरांनी मला गोळ्या बदलून दिल्या पण त्याने विशेष काही फरक पडला नाही. 


झालेली घटना मी माझ्या आईला सांगिलती होती आणि तिने हि वरची हवा आहे त्यामुळे औषधाने काही फरक पडणार नाही असे सांगितले. तिने एखाद्या मांत्रिकाला दाखवण्याचा सुद्धा सल्ला दिला. माझ्या सासरी मांत्रिक, बुवा याना तीव्र विरोध असल्यामुळे मांत्रिकाला दाखवण्यह  प्रश्नच न्हवता. 


शेवटी माझ्या आईने माझ्या सासूबाईंचे मन वळवले आणि मांत्रिकाला दाखवण्याचा निर्णय घेतला. आमच्या शेजारच्या सोसायटी मध्ये  राहणाऱ्या एका लहान मुलीला काही वर्षांपूर्वी बाधा झाली होती आणि तिला एका मांत्रिकाने बरे केले होते तोच मांत्रिक बोलवायचा ठरवले. दुसऱ्यादिवशी बोलावल्या प्रमाणे मांत्रिक आला. त्याने काही वस्तू आणि विधी सांगितल्या. ते विधी मध्यरात्री करायचे होते. त्याने हवन पेटवला होता. तो सतत काहीतरी मंत्र जाप करत होता आणि अधून मधून माझ्या अंगावर कसलीतरी राख फेकत होता. अधून मधून तो काही लिंबे कापून त्या पेटत्या आगीत टाकत होता. मध्यरात्री सुरु झालेला हा कार्यक्रम पहाटे पर्यंत चालला. 


आता बरे वाटेल असे म्हणून मांत्रिक निघून गेला. त्या नंतरचा आठवडा खूपच छान गेला. मला कसलाही अनुभव आला नाही. पण आठवड्यानंतर मला ती पांढरी आकृती पुन्हा दिसली आणि परत माझी शुद्ध हरपली. काही जणांनी आम्हाला  राजस्थानातील बालाजीला नेण्याचा सल्ला दिला तर काहींनी भूत बाधा काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिरात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. 


सोसायटी मधील काही जणांनी Youtube वर पाहून उत्तर प्रदेशातील "निंबूवाले बाबा" यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. पण सार्वमताने पुन्हा एकदा मांत्रिकाला दाखूया आणि जर फरक पडला नाही तर पुढचा उपाय करूया असे ठरले. मांत्रिक आल्यानंतर त्याला महाबळेश्वर च्या ट्रिप चा वृत्तांत पुन्हा एकदा सांगितला. 


मांत्रिकाने सांगितले कि झाडाखाली लघवी केल्यामुळे झाडावरील पिशाच्च शरीरात घुसले आहे आणि पिशाच्च निघेल कि नाही हे पिशाच्च्याच्या शक्तीवर अवलंबून असते. मांत्रिकाने परत एकदा तोच विधी केला पण त्याचा काही फायदा झाला नाही. ज्या झाडाखाली मला भूत बाधा झाली होती तेथे मांत्रिकाच्या सांगण्यावरून उतारा सुद्धा टाकण्यात आला . काही लोकांच्या सांगण्यानुसार आम्ही बालाजी मंदिरात सुद्धा गेलो होतो. त्यावेळी ते पिशाच्चं माझ्या अंगात संचारलं होतं आणि माझा आवाज हा प्रतिध्वनी आल्यासारखा दुहेरी येत होता.


 कोणीतरी या घटनेचा विडिओ काढून तो youtube वर सुद्धा टाकला आहे. तेथून परत आल्यानंतर एक महिना मला कोणताही त्रास झाला नाही. पण नंतर अचानक मला परत रडण्याचा आवाज येऊ लागला आणि परत ती पांढरी आकृती हे चक्र पुन्हा चालू झाले. 


या ३ ते ४ महिन्यात माझे वजन तब्बल १० किलोने कमी झाले आहे . फक्त हाडेच  काय ती उरली आहेत. अधून मधून ताप येतोच आहे. मी काही जास्त दिवस जगेल असे मला वाटत नाही. माझ्या मनात आत्महत्येचे सारखे विचार येत आहेत. पोट आणि पाय हे सतत दुखत आहेत. 


आता मला जगण्याचा कंटाळा आला आहे. सोसायटी मधील सर्वाना मला वेड लागलाय असे वाटत आहे. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे. कुटुंबाचा माझ्या कडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. माझ्यामुळे घरातील सर्वाना खूप त्रास होत आहे. कोणीतरी नुकताच घर बदलण्याचा सल्ला दिला आहे.


 पण माझी कीर्ती पंचक्रोशीत पसरल्यामुळे आमचे घर खरेदी करायला कोणी तयार नाही. माझ्या वाईट अनुभवाचा पाढा संपायला तयार नाही. इथून पुढे जर जगले वाचले तर नक्की आपल्याला लिहीनच.....पण या एका गोष्टीने मला भुताखेतांवर विश्वास ठेवायला भाग पाडले.


डिस्क्लेमर: - या लेखाचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे हा मुळीच नाही. या कथेचा सार आमच्या एका वाचकाच्या दैनंदिन डायरी मधून घेण्यात आला आहे. या कथेच्या सत्यतेला कोणतेही प्रमाण नाही त्यामुळे हि कथा फक्त मनोरंजन म्हणून वाचण्यात यावी असे आम्ही सुचवतो. मराठीwiki कधीही आपल्याला बुवाबाजी किंवा मांत्रिक यांच्या नादाला लागण्याचा सल्ला देत नाही. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post