.

महाराष्ट्रातील किल्ले - पन्हाळगड किल्ला | Panhalgad fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Panhalgad Killyachi mahiti

Panhalgad fort


 किल्ल्याची उंची:- 4040 फूट

 किल्ल्याचा प्रकार:-  गिरिदुर्ग
डोंगररांग:-  कोल्हापूर
जिल्हा:- कोल्हापूर
श्रेणी:- सोपी
महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यांच्या कारकीर्दीतील खरे सोबती म्हणजे अजिंक्य आणि बेलाग  किल्ले.  शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचे साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळगड.

 इतिहास:-  हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.  हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता.  याचे पहिले नाव पन्नग्नालय.  

अफझलवधानंतर अठरा दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८ नोव्हेंबर १६५९ ला घेतला. नंतर  किल्ला विजापुरकरांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला.  २ मार्च १६६० मध्ये किल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला.  १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला. 

पुढे १७१० मध्ये  पन्हाळा कोल्हापूर ची राजधानी झाली.  नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

 गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:- 
१.  राजवाडा:-  हा ताराबाईचा वाडा होय.  वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे.  आज यात नगरपालिका कार्यालय पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.

२.  सज्जा कोठी:-  राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते.  या इमारतीस संभाजी राजांना शिवाजी राजांनी या प्रांताचा कारभार पाहन्यास ठेवले होते.  शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत

३. राजदिंडी:- ही दुर्गम वाट गडाखाली उतरते याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले.  हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे.  याच दरवाजातून 45 मैलांचे  अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहोचले.

४.  अंबरखाना:- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला.  याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यात वरी, नागली, आणि भात असे सुमारे 25,000 खंडी धान्य मावत असे शिवाय सरकारी कचेर्‍या, दारुगोळया  आणि  टाकसाळ होती.

५. चार दरवाजा:- हा  पूर्वेकडील अत्यंत मोक्‍याचा व महत्त्वाचा दरवाजा होय.  इस १८४४ मध्ये इंग्रजांनी पाडून टाकला.  थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत.  येथेच शिवा काशीद यांचा पुतळा आहे.

६. सोमा तलाव:- गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे.  या तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे.  ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.

७. रामचंद्रपंत अमात्यांची समाधी:-  सोमेश्वर तलावापासून पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात.  त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.

८.  रेडे महाल:-  याच्याच बाजूला आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.  वस्तुत ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.

९.  संभाजी मंदिर:-  त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.

१०. धर्मकोठी:-  संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी.  सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.  

११. अंदरबाव :- तीन दरवाजाच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानी काळ्या  दगडाची वस्तू  दिसते.  ही वास्तू तीन मजली आहे.  सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे तर मधला मजला हा पेस  आहे.  त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.

१२.  महालक्ष्मी मंदिर:-  राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे.  त्याच्या बांधणीवरुन ते साधारण एक हजार वर्षापूर्वी बांधलेले असावे.  राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

१३.  तीन दरवाजा:-  हा पश्‍चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा.  दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.  १६७६  मध्ये कोंडाजी फर्जद याने अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.

१४. बाजीप्रभुंचा पुतळा:- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

 गडावर जाण्याच्या वाटा:-
१.  चार दरवाजा मार्गे:-  कोल्हापूर शहरातून एस टी बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते.

२. तीन दरवाजा मार्गे:-  गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे . राहण्याची सोय:-  किल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने हॉटेल्स आहेत.

 जेवणाची सोय:-  निवासस्थानांमध्ये होते.

 पाण्याची सोय:-  किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

 जाण्यासाठी लागणारा वेळ:-  कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने एक तास.

 जाण्यासाठी उत्तम कालावधी:- सर्व ऋतुत.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post