किल्ल्याची उंची:-
किल्ल्याचा प्रकार:- सागर किनाऱ्यावरील किल्ले
डोंगररांग:- कोकण
जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- सोपी
शिरगावचा किल्ला पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर आहे. शिरगावचा किल्ल्या पाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्र किनाराही निर्मनुष्य असतो.
इतिहास:- १७३९ झाली मराठ्यांनी हा किल्ला डहाणू, केळवे, तारापूर या किल्ल्यांबरोबर जिंकून घेतला. मराठ्यांच्या आधी या किल्ल्याचा ताबा पोर्तुगीजांकडे होता. नंतर अठराशे अठरा मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला पण इंग्रजांकडे गेला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-
शिरगावचा किल्ला साधारणतः दोनशे फूट लांब व 150 फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे. मात्र किल्ल्याची तटबंदी 35 फूट उंच व 10 फुट रुंद आहे. किल्ल्याच्या चार कोपऱ्यात चार बुरुज असून प्रवेशद्वाराजवळ सुद्धा एक बुरूज आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे.
हा चबुतरा आपल्याला रायगडावरील महाराजांच्या समाधीची आठवण करून देतो. येथील तटबंदीवर, बुरुजावर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणार्या तटबंदीच्या बाहेरून पायर्या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातून सुद्धा पायर्या केलेल्या आहेत.
अर्थात आतुन जाणार्या पायर्या सध्या वापरात नसल्या तरी बुरुजाला असलेल्या खिडक्यांमधून आपल्याला या पायऱ्या दिसतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदी त आणखी एक दरवाजा आहे. मात्र आता तो पूर्णपणे बंद केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून पश्चिमेकडे असणार्या समुद्रकिनाऱ्याचे विहंगम दृश्य दिसते.
गडावर जाण्याच्या वाटा:- पश्चिम रेल्वे कडील शेवटचे स्टेशन म्हणजे विरार. विरारच्या पुढे जाण्यासाठी मेल अथवा शटल पकडावी व पालघरला उतरावे.
पालघरला पोहोचल्यावर तेथून सातपाटी मार्गावर धावणार्या बस अर्ध्या अर्ध्या तासाने आहेत. या बस पकडून आपल्याला मशीद स्टॉप वर उतरावे लागते. हे अंतर बसने 15 मिनिटांचे आहे.
याशिवाय पालघर होऊन या स्टॉप ला यायला रिक्षा सुद्धा आहेत. मशिद स्टॉपवरून दहा मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्यापाशी येतो. किल्ल्याला लागूनच एक शाळा आहे.
राहण्याची सोय:- संपूर्ण किल्ला अर्धा-पाऊण तासातच बघून होतो. त्यामुळे राहण्याची गरज नाही. मात्र तशी गरज भासल्यास किल्ल्याला लागूनच असलेल्या शाळेमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय:- पालघरला अनेक चांगली हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय:- गडावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नाही.
Post a Comment